आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘रांधा, वाढा, उष्टे काढा’मुळे महिलांच्या करिअरचा बळी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - भारतीय महिला पुरुष सहका-यांच्या तुलनेत करिअरमधील प्रगती साधण्यासाठी खूपच कमी वेळ देतात. परिणामी त्यांच्या पदोन्नतीच्या संधी हुकतात. घर आणि संसाराच्या रगाड्यात महिलांना त्यांच्या करिअरचा बळी द्यावा लागतो, असे एका नव्या पुस्तकात म्हटले आहे.


महिला अधिकारासाठी काम करणा-या वकील कीर्ती सिंग यांच्या ‘भारतातील विभक्त आणि घटस्फोटित महिला : आर्थिक अधिकार व हक्क’ या पुस्तकात महिलांच्या आर्थिक अधिकार आणि कायदेशीर उपेक्षेबाबत सांगोपांग चर्चा करण्यात आली आहे. साचेबद्ध भारतीय समाजात पत्नीचा जास्तीत जास्त वेळ घराची देखभाल आणि घरकामात जास्तीत जास्त वेळ खर्ची घालावा लागतो. घरातच जास्तीत जास्त शक्ती खर्ची घालावी लागत असल्यामुळे नोकरीमध्ये ती स्पर्धा करण्याची आणि काही मिळवण्याची क्षमताच हरवून बसते, असे सिंग यांनी या पुस्तकात म्हटले.


देशातील चार विविध प्रदेशांतील 400 महिलांच्या सर्वेक्षणाच्या आधारावर लिहिण्यात आलेले हे पुस्तक सेज पब्लिकेशनने प्रकाशित केले आहे. विभक्त आणि परित्यक्ता महिलांची दयनीय आर्थिक स्थिती आणि कोणताही न्याय मिळवण्यासाठी पार करावे लागणारे लांबलचक कायदेशीर अडथळे याबाबत या पुस्तकात चर्चा करण्यात आली आहे.


विषमतेला खतपाणी
तिचे घरकाम आणि देखभालीच्या कामाची दखल घेतली जात नाही. त्याचा परिणाम लैंगिक भेदभाव आणि विषमतेला खतपाणी मिळण्यात होत आहे, असे कीर्ती सिंग यांनी या पुस्तकात नमूद केले आहे.


प्रॉपर्टीतही योगदान दुर्लक्षितच
वैवाहिक जीवनात संपत्ती किंवा मालमत्ता मिळवण्यासाठी महिलांनी आर्थिक किंवा बिगर आर्थिक योगदान देऊन मदत केलेली असते. मात्र, भारतातील कोणताही कायदा महिलांना या संपत्ती किंवा मालमत्तेत मालकी हक्क प्रदान करत नाही. त्यामुळे सर्व महिलांना वैवाहिक जीवनातील मालमत्तेत कायदेशीर हक्काची तरतूद करणे आवश्यक असल्याची सूचना या पुस्तकात करण्यात आली आहे.


अनेकींच्या मनात खदखद : नवरा आणि समाज आपल्याला चांगली वागणूक देत नाही, अशी खंत अनेक महिलांनी व्यक्त केली. आपली मुस्कटदाबी केली जात असल्याची भावना मनात खोलवर घर करून बसल्याचे सांगितले. या कौटुंबिक मुस्कटदाबीतून मुक्तता करण्यासाठी तत्काळ कायदेशीर पावले उचलली पाहिजेत, असे अनेकींना वाटते.


कामाची व्याख्याच तकलादू
उत्पादक कामाची पारंपरिक व्याख्याच तकलादू असल्याचे सांगत त्या व्याख्येलाच या पुस्तकात आव्हान देण्यात आले आहे. महिलांच्या घरकामालाही उत्पादक काम म्हणूनच मान्यता मिळाली पाहिजे, असा आग्रह कीर्ती सिंग यांनी धरला आहे. भारतीय महिलांचे घरकामातील योगदान कायद्याच्या दृष्टीने स्वेच्छेने निरपेक्ष भावनेने केलेले काम समजण्यात येते. घरामध्ये महिलांना समान जोडीदार म्हणून वागणूक दिली जात नाही. त्यामुळे ती जेव्हा विभक्त होण्याचा किंवा घटस्फोट घेण्याचा विचार करते तेव्हा तिला विषमतेच्या दृष्टिकोनातून वागवण्यात येते, असे कीर्ती सिंग म्हणतात.