नवी दिल्ली - केरळमधील एका तरुणाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अवमान करणारे छायाचित्र
फेसबुकवर पोस्ट केल्या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. अटक केलेल्या तरुणाचे नाव राजीश आहे. त्याच्याविरोधात कोल्लम जिल्ह्यातील अंचल पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राजीशने फेसबुकवर तीन पोस्ट टाकल्या होत्या. त्यातील एका छायाचित्रात मोदींच्या चेहर्यावर बुटाची छाप आहे. याशिवाय त्याने मोदींविरोधात अवमानकारक शब्दांचा वापर केला आहे. पोलिसांचे म्हणणे आहे, की राजीशने याशिवाय दुसर्या एका पोस्टमध्ये धार्मिक भावना भडकावणारे वक्तव्य केले आहे. त्याच्या विरोधात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) स्थानिक कार्यकर्त्याने तक्रार दिली होती.
पोलिसांनी सांगितले, की पोस्ट केलेल्या एका छायाचित्रात मोदींच्या चेहर्यावर बुटाची छाप दाखवण्यात आली आहे. त्याने मोदींबद्दल अपशब्दांचा देखील वापर केला आहे. राजीश भारतीय कम्युनिस्ट पार्टी (मार्क्सवादी) चा कार्यकर्ता असल्याचे सांगितले जात आहे. पोलिसांनी त्याच्याविरोधात धार्मिक भावना भडकावणे आणि माहिती तंत्रज्ञान कायदा कलम 66 (A) आणि 67 नुसार गुन्हा दाखल केला आहे.