आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रेमाच्या शोधातच आयुष्याची वाटचाल, अभिनेते सईद जाफरी यांचे लंडनमध्ये निधन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई/नवी दिल्ली- ‘गांधी’ चित्रपटात सरदार पटेल यांची भूमिका साकारणारे ‘शतरंज के खिलाडी’ सईद जाफरी (८६) यांचे निधन झाले. नाटक, टीव्ही आणि भारतीय तसेच ब्रिटिश चित्रपटांवर आपला अमीट ठसा उमटवणारे जाफरी यांनी कारकीर्दीची सुरुवात आकाशवाणीपासून केली. ‘ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर’ने गौरवण्यात आलेले पहिले भारतीय अशी नोंद त्यांच्या नावे आहे. त्यांंनी सुमारे १०० हिंदी चित्रपटांत काम केले. पण १९७७ मध्ये आलेल्या सत्यजित रेंच्या ‘शतरंज के खिलाडी’ने त्यांना ओळख दिली. त्यांनी मेहरुनिमाशी लग्न केले, पण १० वर्षांनी घटस्फोट झाला. आयुष्यभर त्यांना हे खटकत होते. त्यांनी डायरीत तसे लिहूनही ठेवले. सईद यांचा कबुलीजबाब त्यांच्याच शब्दांत...

मी १९ वर्षांचा होतो तेव्हा मेहरुनिमाशी (मधुर) विवाह झाला. ती १७ वर्षांची होती. मला ब्रिटिश संस्कृती आवडायची. अस्खलित इंग्रजी बोलणे, महागडे सूट घालण्याचा शौक होता. शिष्टाचार तर धाब्यावर बसवला होता. मेहरुनिमा त्याउलट होती. आज्ञाधारी पत्नी, उदार आई, चांगली गृहिणी. पण माझी तशी इच्छा नव्हती. मी सुचवूनही ती बदलली नाही. या प्रयत्नात आम्ही दूर गेलो आणि अखेर विभक्त झालो. दरम्यान मला जेनिफर आवडू लागली. नंतर आम्ही लग्नही केले. पण जेनिफरला माझी फिकीर नाही हे ६-७ महिन्यांतच मला जाणवले. ती महत्त्वाकांक्षी होती. आता मला मेहरुनिमाची आठवण यायला लागली. मी कधीही मेहरुनिमा आणि मुलांकडे साधे वळूनही पाहिले नव्हते. सात वर्षांनी मी शेफ मधुर जाफरीशी संबंधित लेख वाचला. त्या महिलेचे छायाचित्र पाहताच मला धक्काच बसला. ती मेहरुनिमाच होती. तिने दुसरे लग्न केले होते. तेव्हा ती अमेरिकेत होती. मला भेटण्यास तेव्हा तिने नकार दिला. मुलेही फक्त एकदाच बोलली. मुले म्हणाली, ‘खरे प्रेम काय असते हे आमच्या नवीन वडिलांना माहीत आहे. त्यांनी आईमध्ये बदल घडवला नाही. जसे आहे तसेच स्वीकारले. त्यामुळेच आई स्वयंपूर्ण होऊ शकली.’ खुलेपणामुळेच त्यांचा विवाह टिकू शकला हे मला तेव्हा कळले. माझ्या स्वार्थामुळे तिचे व्यक्तिमत्त्वच हरवले होते. म्हणून आमचे नाते तुटले. मी फक्त स्वत:वरच प्रेम केले आणि जे स्वत:वरच प्रेम करतात ते इतरांवर प्रेम करू शकत नाहीत.’