आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपातील त्सुनामी: हट्टाने मोठे होत गेले अडवाणी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - लालकृष्ण अडवाणी यांनी भाजपला दोनवरून 180 खासदारांवर आणले. मात्र, त्यांना पक्षात अनेक डावपेचांना सामोरे जावे लागले. आपले म्हणणे पटवून देण्यासाठी त्यांना अनेकदा वैचारिक संघर्ष करावा लागला. एवढेच नव्हे ते तापट स्वभावाचे मानले जातात. छोट्या-छोट्या गोष्टीत ते नाराज होतात. वाजपेयींसोबत त्यांचे अनेकदा मतभेद झाले. वैचारिक व भावनिक भोव-यात अडकलेले अडवाणी अनेकदा यशस्वीरीत्या बाहेर पडले. मात्र, या वेळी प्रकरण काही वेगळेच आहे.


जिद्दी राजकारणात हातखंडा
स्वत:ला भाजपचे भीष्म पितामह मानणा-या अडवाणी यांच्यावर आज ही वेळ आली असेल तर त्यासाठी ते स्वत:च जबाबदार आहेत. जसे पेराल, तसे उगवेल असे म्हणत कॉँग्रेसने या प्रकरणावर टिप्पणी केली आहे. अडवाणी यांच्या चुकांचा पाढा पाहा...
*1989 मध्ये अडवाणी यांनी सोमनाथ ते अयोध्येपर्यंतच्या रथयात्रेची योजना आखली. देशात हिंदुत्वाची लाट आणणे हा त्यामागचा उद्देश. अटलजींनी विरोध केला. मात्र, अडवाणींनी ऐकले नाही. 25 डिसेंबर 2009 रोजी अडवाणी यांनीच हे सांगितले. ते म्हणाले होते, अटलजींच्या लोकशाहीवादी प्रतिमेशी मी सहमत नव्हतो.
*1992 मध्ये बाबरी मशिदीचे पतन झाले. त्या वेळी अडवाणींसह संपूर्ण भाजप मूक आनंद साजरा करत होते. अटलबिहारी वाजपेयी तेव्हा एकटे पडले. त्या वेळी संसदेत या शब्दात आपले दु:ख व्यक्त केले : या वयात मी पक्ष सोडून जाऊ शकत नाही. आज पक्ष जिंकला परंतु मी पराभूत झालो.
* अटलजींना अडवाणी यांनीच भावी पंतप्रधान जाहीर केले होते. पडद्याआडून सत्तेत लक्ष घालण्याची त्यांची इच्छा होती. त्यासाठी त्यांनी संघामार्फत दबाव टाकला आणि 1999 मध्ये उपपंतप्रधानपदी नियुक्त झाले.
* 2002च्या गुजरात दंगलीनंतर पंतप्रधान वाजपेयी मोदींवर नाराज होते. मोदींना हटवण्याची अनेक नेत्यांची इच्छा होती. असे केल्यास कॉँग्रेसच्या हातून प्रत्येक मुद्दा निसटून जाईल आणि देशाचेही विभाजन होणार नाही. मात्र अडवाणी आडवे आले. मोदींना कोणत्याही स्थितीत हटवले जाणार नाही, असे ते म्हणाले. यामुळे पक्ष संपुष्टात येईल. अटलजींचे ऐकले नाही. आपल्याला वाटले तसेच केले.
* 2004ची घटना. अटलबिहारी वाजपेयींचे आजारपण सुरू झाले. अडवाणी यांची पुढे येण्याची इच्छा होती. त्यासाठी अडवाणी यांना प्रमोद महाजन, सुषमा स्वराज, वेंकय्या नायडू, अरुण जेटली यांची मदत हवी होती. यांची मदत घेण्यासाठी अडवाणींनी उमा भारतींची साथ सोडली. कारण संबंधित चार नेते उमा भारतींना पक्षातून काढू इच्छित होते. त्यांना अडवाणींची व अडवाणींना त्यांची आवश्यकता होती. शेवटी उमा भारतींना पक्षातून काढले. तेव्हा अटलजींना लिहिलेल्या पत्रात उमा यांनी म्हटले होते, एक विमानचालक (अटलजी) आहे आणि पाच विमान अपहरणकर्ते.
* 2013 मध्ये लालकृष्ण अडवाणींनी मनातील गोष्ट सांगितली. अडवाणींनी गोवा बैठकीदरम्यान ब्लॉग लिहिला. महाभारतातील अनेक प्रसंगांचा दाखला दिला. पक्षाला द्रौपदी, स्वत:ला भीष्म पितामह आणि संघाला धृतराष्‍ट्र संबोधले. एक किस्साही ऐकवला. त्यात त्यांनी स्वत:ला पोप व मोदी-राजनाथ यांना हिटलर-मुसोलिनी म्हटले. विरोधी पक्षांनी संधी साधत म्हटले, आपण मोदींना का वाचवले याचाच पश्चात्ताप आता अडवाणी यांना होत असेल.


घटनाक्रमाची क्षणाक्षणाची माहिती
2.00 : अडवाणी यांचा पक्षाच्या संसदीय बोर्ड, राष्‍ट्रीय कार्यकारिणी आणि निवडणूक समितीच्या पदावरून राजीनाम्याची बातमी सार्वजनिक करण्यात आली.
2.01 : राजनाथसिंह यांनी सांगितले की, अडवाणी पक्षात असून यापुढेही कार्यरत राहतील. त्यांचा राजीनामा नामंजूर
2.21 अडवाणी यांची भेट घेण्यासाठी वेंकय्या नायडू गेले
2.27 : एनडीएचे संयोजक असलेल्या शरद यादव यांनी सांगितले की, अडवाणी यांच्या राजीनाम्यामुळे धक्का बसला.
2.35 : भाजप नेते अनंतकुमार अडवाणी यांची घरी पोहोचले
2.40 राजनाथसिंह यांनी सांगितले की, अडवाणी यांचे मन वळवण्याचे प्रयत्न सुरू, वरिष्ठ नेत्यांशी चर्चा सुरू
2.44 राजनाथ यांनी अडवाणी यांच्या कुटुंबीयांशी चर्चा केली
2.55 राजनाथसिंह यांनी अडवाणी यांना पत्र लिहून राजीनामा नामंजूर करण्यात येत असल्याचे सांगितले.
2.59 भाजप नेत्या सुषमा स्वराज आणि एएस अहुलवालिया अडवाणी यांच्या घरी पोहोचले.
3.00 बलबीर पुंज आणि व्ही. के मल्होत्रा अडवाणी यांच्या घरी पोहोचले.
3.02 अडवाणी यांच्या राजीनाम्यावर राजनाथसिंह आणि नरेंद्र मोदी यांच्यात चर्चा झाली
3.13 अडवाणी यांच्या राजीनाम्यावर संघाने दु:ख व्यक्त केले.
3.15 भाजप प्रवक्ते श्रीकांत शर्मा म्हणाले, अडवाणी यांना कोणत्याही परिस्थितीत समजून घ्यायला हवे.
3.22 भाजपचे माजी अध्यक्ष नितीन गडकरी मंगळवारी दिल्लीत जाऊन अडवाणी यांची भेट घेणार असल्याचे समजले.
3.35 अकाली दलाचे नेते सुखबीर बादल यांनी सांगितले की, हा भाजपचा अंतर्गत प्रश्न आहे. आमचा पक्ष भाजपसोबत.
3.36 गडकरी मंगळवारी अडवाणी यांची भेट घेणार. दरम्यानच्या काळात गडकरी, राजनाथसिंह आणि जेटली यांची चर्चा.
3.37 पक्षाच्या प्रवक्त्यांना काहीही बोलण्यास निर्बंध.
3.58 भोपाळहून उमा भारती यांचे अडवाणी यांना राजीनामा मागे घेण्याचे आवाहन. मंगळवारी त्यांची भेट घेणार.
4.20 शिवसेना नेते संजय राऊत यांनी सांगितले, अडवाणींविना एनडीएचे नेतृत्व अपूर्ण असून ते पक्षाचे मोठे नेते आहेत. त्यांची समजूत काढली पाहिजे.
5.07 नरेंद्र मोदी यांच्या जवळचे समजले जाणारे भाजप महासचिव अमित शाह राजनाथसिंह यांच्या घरी पोहोचले.
5.13 राजनाथसिंह यांच्या निवासस्थानी अरुण जेटली, श्याम जाजू, वेंकय्या नायडू आणि विजय गोयल यांची बैठक संपली.
5.14 राजनाथसिंह आणि अमित शाह यांची बैठक सुरू होती.
5.32 सुषमा स्वराज अडवाणी यांच्या घरून निघून नक्षलवादावरील बैठकीला जाण्यासाठी निघाल्या.
5.45 अडवाणी यांची भेट घेतल्यानंतर राजनाथसिंह यांच्या घरी रामलाल आणि अनंतकुमार पोहोचले. तिथे शाह होते.
6.02 गडकरी यांनी अडवाणी यांच्याशी फोनवरून चर्चा केली.
7.03 अडवाणी यांच्या भेटीसाठी रविशंकर प्रसाद पोहोचले.
7.10 नरेंद्र मोदी यांनी राजनाथसिंह यांच्याशी फोनवर चर्चा केली.त्यानंतर मोदींनी ट्विट करून म्हटले की, सध्या दिल्लीला जाणे अवघड असून संसदीय बोर्डाच्या बैठकीत जो निर्णय होईल तो मंजूर असेल.
7.25 राजनाथ यांच्या निवासस्थानी पोहोचले अरुण जेटली.
7.38 सुषमा स्वराज राजनाथसिंह यांच्या निवासस्थानी पोहोचल्या.
9.00 राजीनाम्यावर राजनाथ यांच्या घरी बैठक संपली.
9.15 राजनाथ यांच्या बैठकीनंतर अडवाणी यांचा राजीनामा नामंजूर करण्यात आल्याचे सांगण्यात आले.


भाजपचे निर्णायक चेहरे
मोदी गट
अरुण जेटली
अडवाणींच्या नाराजीला महत्त्व देण्याची बाब जेटलींनी नाकारली. ते म्हणाले, ‘मला काही ठाऊक नाही. प्रसारमाध्यमे विनाकारण महत्त्व देत आहेत.’ नेत्यांसह कार्यकर्त्यांचेही मोदींच्या नावावर जवळपास एकमत आहे. प्रत्येक निवडणुकीच्या वेळी पक्षाने योग्य डाव टाकायचा असतो, भाजप अध्यक्षांनी तेच केले आहे, असे जेटली म्हणाले.
राजनाथसिंह
आपल्या राजकीय जीवनातील हा सर्वात महत्त्वाचा निर्णय असल्याचे राजनाथसिंह म्हणाले. हाच यशाचा योग्य मार्ग असून देशासाठी काहीतरी केल्याचा आनंद आणि समाधान मिळाल्याचे त्यांनी सांगितले. संपूर्ण जग आदर राखेल, असे नेतृत्व भाजप कार्यकर्त्यांना दिले असल्याचे राजनाथसिंह यांनी सांगितले.
मनोहर पर्रीकर
मोदींच्या बाजूने उघडपणे बोलणारे गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी सुमारे दोन वर्षांपूर्वी अडवाणींना बुरसटलेले जुनाट लोणचे म्हटले होते. जनतेचा कल पाहता, मोदी हेच भाजपचा चेहरा आहेत. त्यांच्या पंतप्रधानपदाच्या उमेदवारीबाबत सांगता येत नाही, पण आगामी निवडणुकीत तेच भाजपचा चेहरा असल्याचे पर्रीकर म्हणाले.
अमित शाह
अमित शाह यांना उत्तर प्रदेशचे प्रभारी पद देण्यामागे मोदी असल्याचे वृत्त राजनाथ यांनी फेटाळले होते, पण सोहराबुद्दीन एन्काउंटर प्रकरणातील आरोपी शाह मोदींच्या खास गटातील आहेत. 12 जून रोजी प्रथमच लखनऊस जात असलेले शाह मोदी यांच्या सांगण्यावरूनच आपल्याला भेटण्यास येत असल्याचे कल्याणसिंह यांनी सांगितले आहे.
स्मृती इराणी
भाजपच्या राष्‍ट्रीय उपाध्यक्ष अभिनेत्री स्मृती इराणी यांनी गोव्यात मोदींच्या नावाची औपचारिक घोषणा होण्यापूर्वी म्हटले होते की, ‘भारताला कोण (मोदी) हवे, हे आम्ही जाणतो. भाजप केडरला काय हवे, हे आम्हास ठाऊक आहे. मोदी हे तरुणांना संधी देणारे नेते आहेतच, शिवाय नव्या विचारांचे स्वागत करणारे नेते आहेत. पंतप्रधानपदासाठी तेच योग्य आहेत.


मोदीविरोधी गट
सुषमा स्वराज
लोकसभेतील विरोधी पक्षनेत्या व पंंतप्रधान पदाच्या शर्यतीत गेल्या आठवड्यापर्यंत असलेल्या सुषमा स्वराज आत्तापर्यंत अडवाणींना पीएमपदाचे उमेदवार सांगत होत्या. पक्षाने उमेदवार म्हणून अडवाणींचे नाव नाकारलेले नाही. मोदी सर्वाधिक लोकप्रिय आहेत, हे राजनाथसिंह यांचे वैयक्तिक मत असू शकते, पण पक्षात इतर कोणी लोकप्रिय नेता नाही, असा याचा अर्थ मुळीच नसल्याचे त्या म्हणाल्या होत्या.
यशवंत सिन्हा
भारतीय संस्कृतीच्या मूल्यांनुसार माझा अडवाणींना पाठिंबा आहे. कुटुंबातील ज्येष्ठांचा आदर राखावा असे आपली संस्कृती सांगते. याच आधारावर मी म्हटले होते की, जर लालकृष्ण अडवाणी स्वत: या पदासाठी इच्छुक असतील, तर त्यानंतर पक्षातून नेतृत्वासंदर्भात कोणताही प्रश्न उपस्थित व्हायला नको, असे सिन्हा म्हणाले.
अनंतकुमार
अडवाणी यांच्या गटातील प्रमुख नेत्यांपैकी एक. अनंतकुमार यांनीच सर्वप्रथम अडवाणी यांच्या घरी जाऊन समजूत घालण्याचा प्रयत्न केला.
जसवंतसिंह
गोवा अधिवेशनाला अनुपस्थित भाजपचे ज्येष्ठ नेते आणि खासदार जसवंतसिंह हे साधारण अडवाणी यांच्याच वयाचे. अडवाणी यांचे निकटवर्तीय मानले जात असलेले जसवंतसिंह या प्रकरणी गप्प असून माध्यमांपासून अंतर राखून आहेत. अडवाणींनी राजीनामा दिल्यानंतरही जसवंतसिंह आतापर्यंत मीडियासमोर आलेले नाहीत.
उमा भारती
हा वाद निरर्थक आहे. मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांचे कौतुक करताना अडवाणी यांनी भाजपच्या इतर कोणत्याही मुख्यमंत्र्याला वाइट म्हटले नाही. मोदी त्यांना मुलाप्रमाणे आहेत. त्यांनीच मोदींना गुजरातच्या मुख्यमंत्रीपदावर बसवले. संपूर्ण पक्ष सध्या त्यांची समजूत काढतो आहे. मी अडवाणींना मुलीप्रमाणे आहे. मी स्वत: दिल्लीत जाऊन त्यांचे मन वळवेल. ते माझे नक्की ऐकतील.
ऌभाजपने आपल्या पातळीवर अडवाणी यांचे मतपरिवर्तन करावे अशी संघाची इच्छा आहे. अडवाणींचा निर्णय मात्र दुर्दैवी आहे राम माधव
*नेते वैयक्तिक इच्छेला महत्त्व देत असल्याचे अडवाणी म्हणतात. त्यांची पंतप्रधान होण्याची इच्छा सार्वजनिक हिताची आहे का? -सुहेल सेठव
*नरेंद्र मोदी यांना पद देणे ही काळाची मागणी आहे. अडवाणी ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी असे करू नये. - बाबा रामदेव
ऌअडवाणी व मोदी यांच्यात फरक नाही. पण अडवाणींचे युग संपले आहे. -लालू यादव
*या राजीनाम्यावरूनच पक्षाची स्थिती लक्षात येते. काहीतरी काळेबेरे आहे.
शरद पवार
*पक्षबांधणीत अडवाणींनी मोठे योगदान दिलेले आहे. - कल्याणसिंह
ऌपार्टी आदर्शांवरून ढळल्याचे अडवाणींच्या आत्ता लक्षात आले. - शंकरसिंह वाघेला
*अडवाणींच्या अनुभवाचा फायदा घेण्याऐवजी पक्षाने त्यांना नाकारले आहे. हा नियतीने केलेला न्याय आहे. अडवाणींनी देश आणि जनतेचे मोठे नुकसान केले आहे. -आझम खान
*अडवाणींची मनधरणी करण्याचे पुरेपूर प्रयत्न करायला हवेत. अन्यथा भाजपसाठी हे मोठे नुकसान असेल. ते पक्ष सोडून गेल्यास, इतर समविचारी नेतेही पक्ष सोडून जातील.
मा. गो. वैद्य
*मी श्रीलंकेतून सायंकाळी 6.15 ला दिल्लीत पोहोचलो. तेव्हा मला याबाबत समजले. ते मोठे नेते आहेत. ते असतील तरच भाजपचे अस्तित्व आहे, अन्यथा नाही. - रविशंकर प्रसाद
*कालपर्यंत ज्यांच्या मताला फार महत्त्व नव्हते, त्याचा राजीनामा आज संकट का?
उमर अब्दुल्ला
*असे नेते भाजपमध्ये नाहीतच, देशातही नाही. - संजय राऊत
*अडवाणींचा निर्णय दुर्दैवी आहे. पण वरिष्ठ लोकांनी किती दिवस काम करायचे? नव्या चेह-यांनी पुढे यायला हवे. - अशोक सिंघल


अखेर अडवाणींनी असे का केले ?
आपले... जे परके झाले
नरेंद्र मोदी : एकेकाळी अडवाणींचे सर्वात प्रिय होते, इतके की मोदींसाठी अडवाणी यांनी संपूर्ण भाजपच नव्हे तर अटलजींशीदेखील वाद घातला. मात्र जिना प्रकरणात मोदींनी साथ दिली नाही, तेव्हापासून अडवाणी नाराज झाले.
उमा भारती : अडवाणी यांना पितृतुल्य मानत होत्या. मात्र जेव्हा त्यांना 10 नोव्हेंबर 2004 शिस्तभंगाची कारवाई करून त्यांना पक्षातून काढण्यात आले, तेव्हा उमाजींचा संयम सुटला. त्या म्हणाल्या, मी तिरंग्याच्या प्रतिष्ठेसाठी राजीनामा दिला आणि पक्षाने मलाच काढून टाकले.
गोविंदाचार्य : हेसुद्धा कधीकाळी अडवाणींच्या गटात होते. मात्र जिना प्रकरणात तेही परके झाले. 25 नोव्हेंबर 2008 रोजी गोविंदाचार्य म्हणाले होते, आवाणी हिंदुत्व आंदोलनासाठी योग्य नेते नाहीत. भावी पंतप्रधान म्हणून त्यांची निवड भाजपसाठी सर्वोत्तम असेल, देशासाठी नाही. त्यांच्या कथनी आणि करणीत नेहमीच अंतर असते.
सुषमा स्वराज : अडवाणींच्या खूप जवळच्या नेत्या. अनेक वेळा त्यांनी सुषमाजींचे कौतुक केले. लोकसभेत त्यांना विरोधी पक्षनेत्या बनवण्यात अडवाणींची भूमिका महत्त्वपूर्ण.
मदनलाल खुराणा : भाजपने यांना पक्षातून काढले होते. ते आडवाणी गटातील सर्वात विश्वासू मानले जात. आज खुराणा म्हणाले,


‘ही तर अडवाणींची चाल आहे’.
पहिले कारण
शेवटची आशाही मावळली
अडवाणींनीच भाजपच्या जागा दोनवरून 180 पर्यंत वाढवल्या. मात्र पंतप्रधान बनले अटलजी. 2009 मध्ये जेव्हा संधी होती, तेव्हा पक्ष पराभूत झाला. अडवाणी 84 वर्षांचे आहेत, त्यांना यंदा सर्वोच्च पदाची आशा होती. मात्र पक्षाने मोदींना पुढे केले. पुढील निवडणुकीपर्यंत तर त्यांचे वयही साथ देणार नाही.
दुसरे कारण
निष्ठावंतांनी साथ सोडली
अडवाणी स्वत: गोव्यात गेले नाहीत, मात्र मोदींना रोखण्यासाठी त्यांनी सुषमा, अनंत, व्यंकय्या व मुरली मनोहर जोशी यांच्यामार्फत दबाव टाकण्याची रणनीती बनवली. तसे झाले नाही तर आपण राजीनामा देऊ, अशी धमकीही दिली. मात्र गोव्यात हे सगळेच गप्प बसले.
तिसरे कारण
संघानेही पाठ फिरवली
‘आरएसएस’ साथ देईल, अशी आशा अडवाणींना होती. मात्र तसे झाले नाही. संघाने सुरेश सोनी यांना गोव्यात संदेश घेऊन पाठवले की, ‘राजनाथ यांना सांगा, अडवाणी येवो न येवो, मोदींच्या नावाची घोषणा करा.’
चौथे कारण
‘एनडीए’चेही दुर्लक्ष
‘एनडीए’तील मित्रपक्षांच्या दबावामुळे मोदींचे नाव जाहीर होणार नाही, असे अडवाणींना वाटत होते. तरीही घोषणा झाली. मोदींशी नाराज असलेल्या अकाली दल-शिवसेनेनेही स्वागत केले. जेडीयूने हा भाजपचा अंतर्गत मामला असल्याचे सांगितले.
पाचवे कारण
वक्तव्यांनी मनाला ठेच
अडवाणींविरोधात दोन आक्रमक वक्तव्ये झाली. पक्ष प्रवक्ता शाहनवाज हुसेन म्हणाले, 200- 400 लोकांच्या बैठकीला एक- दोन लोक आले नाहीत तर काही मोठी गोष्ट नाही. तर मोदी म्हणाले, ‘मन मोठं करणं काय असतं हे राजनाथजींकडून शिकावं. बाहेर बसणा-यांना (आडवाणी) हे काय माहीत? ज्याचं मन मोठ असतं तोच ख-या अर्थाने मोठा असतो.’


गोव्यापासून गोव्यापर्यंत
तेव्हा अटलजी नाराज होते, आज अडवाणी
हा विचित्र योगायोग आहे, की 2002 मध्ये गोव्यातील राष्‍ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत अडवाणींनी अटलजींचा विरोध झुगारून मोदींचा बचाव केला होता. त्यामुळे अटलजी व अडवाणींमध्ये दुरावा निर्माण झाला होता. आता 2013 मध्ये राजनाथ यांनी अडवाणींना नाराज करून केवळ मोदींचा राज्याभिषेकच केला नाही, तर ‘या निर्णयामुळे मला आयुष्यात सर्वाधिक आनंद मिळाला,’ अशी प्रतिक्रियाही दिली.

मोदी, अडवाणी आणि चर्चेची चावडी
भाजप, काँग्रेस, अडवाणी आणि मोदी यांची पुढील राजकीय खेळी काय असेल, हे वेगळ्या पद्धतीने समजून घेण्यासाठी प्रश्नोत्तरे अशी असतील जणू चावडीवरील लोकांच्या गप्पा. एक जण मोदी विरोधक आणि काँग्रेसच्या बाजूने झुकलेला आहे. तर दुसरा भाजपचा समर्थक.
पहिला : अडवाणींनी राजीनामा देऊन मोदींचा अश्वमेधाचा घोडा रोखला आहे.
दुसरा : अडवाणी त्या घोड्याला बांधून ठेवू शकतील का? मला तर वाटते, मोदींच्या नियुक्तीला होकार दिला असता तर मोठे नेते म्हणून राहिले असते. राजीनाम्याचे राजकारण करून राहिलासाहिला मानही ते गमावून बसले. कार्यकर्त्यांच्या आणि लोकांच्या नजरेतूनही उतरले.
पहिला : परंतु 50 वर्षांपासून अडवाणी राजकारणात आहेत. काही ना काही समर्थक असतील ना? आता ते मोदींसाठी काम करतील ? ..आणि जर पक्ष अशा त-हेने फुटला तर कोणीही उत्साहाने कसे काम करणार ? मी तर सांगेन, भाजपची जी ताकद आहे, त्यापैकी 20-30 टक्के कमी होईल.
दुसरा : असे बिलकुल नाही. जेव्हा नेतृत्व बदल होतो, विशेषत: राजकारणात तर निष्ठा बदलण्यास
वेळ लागत नाही. इतिहास पाहा - जे राजनारायण कधीकाळी चौधरी चरणसिंग यांना राम आणि स्वत:ला हनुमान म्हणवून घ्यायचे, तेच राजनारायण, त्याच चरणसिंग यांना ‘चेअर सिंग’ म्हणत त्यांच्यावर टीका करू लागले होते.
पहिला : ठीक आहे. सत्ता आणि नेतृत्वासोबत निष्ठा बदलतात, हे मान्य. परंतु मोदींच्या त्या स्वभावाचे काय, ज्यामुळे ते आपले विरोधक, ज्येष्ठांना मुळासकट नष्ट करतात. गुजरातमध्ये त्यांनी हेच केले. एकेका विरोधकाला संपवले. त्यांच्या या सवयीची भीती त्यांनाही असेल, जे त्यांच्यासोबत आहेत.
दुसरा : ठीक आहे. पण हाच स्वभाव इंदिरा गांधी यांचाही होता ना. त्यादेखील पक्षातील आपल्या विरोधकाला कायमच्या हटवत असत. त्यांना काँग्रेसमधून विरोधाला सामोरे जावे लागले होते. मोरारजी आणि त्यांच्या आजूबाजूच्या लोकांनी त्यांना गूंगी गुडिया म्हटले होते. वेगळा पक्षही स्थापन केला होता. पण इंदिराजींनी राष्ट्रपती पदावर आपला उमेदवार उभा करून तो निवडून आणला होता.
पहिला : चला हेदेखील मान्य की ही अडचणही दूर होईल. परंतु संपूर्ण देश म्हणजे गुजरात आहे? तीन वेळा मुख्यमंत्री राहिलेले आणखीही व्यक्ती आहेत. मग ते सर्व देशाचे नेतृत्व करू शकतील ? देशात पक्षाला विजय मिळवून देतील ? मोदी असा चमत्कार करतील ?
दुसरा : ठीक आहे. इतर मुख्यमंत्रीदेखील आहेत. पण मोदींची गोष्टच वेगळी आहे. त्यांचे बोलणे, शैली देशातील तरुण, महिला आणि पन्नाशीतील लोकांना आवडणारे आहे. कार्यकर्त्यांनाही मोदींच्या भाषेत मजा वाटू लागली आहे. मोदी हाच एकमेव पर्याय
आहे. सत्ता मिळेल न मिळेल, हे तर भविष्यातच कळेल. मात्र मोदींचे नाव जाहीर होताच काँग्रेस अडचणीत सापडली आहे हे नक्की.