आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लोहपुरुष वितळला, नेत्यांची मनधरणी फळाला; अडवानींचा ना\'राजीनामा\' मागे!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- भारतीय जनता पक्षाचे लोहपुरुष म्हणून ओळखले जाणारे लालकृष्ण अडवानी यांनी काल दिलेला राजीनामा मागे घेतला असल्याचे पक्षाध्यक्ष राजनाथ सिंह यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले. लोकसभेतील विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज यांनी सर्व काही ठिक होईल असे म्हटले होते. त्यानुसार अडवानींची समजूत घालण्यात भाजपच्या नेत्यांना यश आले. सुषमा स्वराज, उमा भारती, पक्षाध्यक्ष राजनाथ सिंह, नितीन गडकरी यांच्यासह पक्षातील वरिष्ठ नेते अडवानींच्या निवासस्थानी पोहचले होते. तसेच राजीनामा मागे घेण्यासाठी मनधरणी करीत होते. अखेर अडवानींच्या नाराजीनाम्यावर तोडगा तयार करीत त्यांना दुर्लक्षित केले जाणार नसल्याचे वचन पक्षाध्यक्ष राजनाथसिंग यांनी दिले. मात्र मोदींची प्रचार समितीच्या अध्यक्षपदी झालेली निवड कायम राहणार असल्याचे पक्षाने म्हटले आहे. निवड ज्यांच्यामुळे अडवानी यांनी राजीनामा दिला आहे असे नरेंद्र मोदी मात्र गुजरातमध्येच तळ ठोकून आहेत. तर त्यांचे समर्थक अरुण जेटली परदेशात निघून गेले आहेत.

अडवानी यांनी माघार घ्यावी, यासाठी संघानेही प्रयत्न केल्याचे सांगण्यात येते. नितीन गडकरींच्या माध्यमातून संघाने अडवानींशी चर्चा केली होती. आज सकाळी पहाटेच्या विमानाने गडकरी दिल्लीत पोहचले. त्यानंतर त्यांनी थेट अडवानींचे घर गाठले. त्यावेळी गडकरींनी अडवानींशी तीन तास चर्चा केली होती. त्यावेळी सरसंघचालक मोहन भागवत यांनीही अडवानींशी फोनवर चर्चा केली होती. याचदरम्यान, गडकरी सतत राजनाथ सिंहांच्या संपर्कात होते. राजनाथ सिंह राजस्थान दौ-यावर गेले होते. आज सायंकाळी ते दिल्लीत दाखल होताच थेट अडवानींच्या निवासस्थानी पोहचले. त्याआधी अडवानी गटाच्या नेत्यांनी त्यांची भेट घेऊन राजीनामा मागे घेण्याची विनंती केली. उमा भारती यांनीही अडवानींशी चर्चा करीत राजीनामा मागे घेण्याबाबत चर्चा केली. अखेर सायंकाली साडेसहा वाजता राजनाथ सिंह यांनी पत्रकार परिषद घेऊन अडवानींनी राजीनामा मागे घेतल्याचे सांगितले. यावेळी राजनाथ यांच्यासोबत सुषमा स्वराज, नितीन गडकरी, उमा भारती, अनंतकुमार आदी नेते होते.

दरम्यान, भाजपने अडवानींची नाराजी दूर करण्यासाठी एक तोडगा काढला असून, त्यानुसार अडवानींना सर्वोच्च व मार्गदर्शक नेते मानले जाईल व त्यांचा प्रत्येक निर्णयात सल्ला घेतला जाईल, असे पक्षाने त्यांना वचन दिले आहे. दरम्यान, गडकरी यांनी अडवानींशी तीन तास चर्चा केल्याने संघ वर्तुळातूनही अडवानींनी माघार घ्यावी, यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले होते. याबाबत सांगितले जात आहे की, अडवानी हे मोदी यांच्यापेक्षा संघावरच जास्त नाराज होते. त्यामुळे संघाने गडकरींच्या माध्यमातून शिष्टाई करीत अडवानींचा राजीनामा मागे घेण्यास भाग पाडले. अडवानी यांच्या खास समर्थक सुषमा स्वराज यांनीही सर्व काही ठिक होईल, असे सांगितले होते त्यानुसार अडवानी राजीनामा मागे घेतला असल्याचे पक्षाध्यक्ष राजनाथ यांनी जाहीर केले.