आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Advani Not Accpet Narendra Modi As Prime Minister Of BJP

नरेंद्र मोदींना पंतप्रधानपदाचे उमेदवार घोषित करण्‍यास अडवाणींचा नकार सूर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार घोषित करण्यास ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांचा विरोध अद्यापही कायम आहे. भाजप अध्यक्ष राजनाथ सिंह आणि माजी अध्यक्ष नितीन गडकरी यांनी अडवाणींची भेट घेऊन त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला खरा; पण तोही निष्फळ ठरला. त्यामुळे भाजपच्या संसदीय मंडळाच्या शुक्रवारच्या नियोजित बैठकीवर प्रश्नचिन्ह लागले आहे. मोदींच्या नावावर अडवाणी राजी झाले नाही तर स्वत: राजनाथ सिंह मोदींच्या नावाची घोषणा करतील, अशी शक्यता आहे.


मोदी यांना भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार घोषित करण्यास अडवाणी यांचा ठाम विरोध आहे. त्यांची मनधरणी करण्यासाठी बुधवारी राजनाथ त्यांच्या निवासस्थानी गेले. सुमारे 30 मिनिटे उभयतांमध्ये चर्चा झाली. पंतप्रधान पदाच्या उमेदवारीबाबत आपण संघ आणि भाजपला आपली भूमिका आधीच स्पष्ट केली आहे. त्यात बदल होणार नाही, असे अडवाणींनी राजनाथ सिंह यांना ठणकावले. त्यापूर्वी पक्षाचे माजी अध्यक्ष नितीन गडकरी यांनीही मंगळवारी अडवाणी यांची भेट घेऊन समजूत काढण्याचा प्रयत्न केला होता. मोदींच्या नावाचा प्रस्ताव अडवाणींनीच ठेवावा, अशी संघाची पहिली योजना होती. मात्र, अडवाणी त्यासाठी अजिबात तयार नाहीत. पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांच्या आधी मोदींचे नाव जाहीर करण्यात येऊ नये, असे अडवाणी यांचे म्हणणे आहे, तर 19 सप्टेंबरपूर्वीच मोदींच्या नावाची घोषणा झाली पाहिजे, असा संघाचा आग्रह आहे. त्यात भाजपचाच फायदा असल्याचे संघाचा तर्क आहे.


19 सप्टेंबरपूर्वी मोदींच्या नावाची घोषणा करण्याची संघाला घाई
अडवाणींसमोर सर्वच निष्प्रभ
1. सोमवारी सरसंघचालक मोहन भागवत यांनी अडवाणींची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.
2. मंगळवारी रात्री नितीन गडकरींकडून अडवाणींची मनधरणी. तीही निष्फळ.
3. बुधवारी राजनाथसिंह यांनीही प्रयत्न केले; परंतु अडवाणींचा हट्ट कायम.
कारण : पंतप्रधान पदाचा उमेदवार घोषित करण्यापूर्वी आपल्या शब्दाला मान दिला जाईल, असा शब्द गोवा कार्यकारिणीच्या बैठकीत देण्यात आला होता; परंतु निर्णय थोपवला जात आहे.


राजनाथ यांच्याकडे चार पर्याय
1. पंतप्रधानपदाच्या उमेदवारीची घोषणा तात्पुरती पुढे ढकलणे म्हणजे अडवाणींची नाराजी दूर होईल.
2. अडवाणींना डावलून मोदींच्या नावाची घोषणा करणे.त्यामुळे संघाचे समाधान होईल.
3. पुन्हा संघाकडे जाऊन अडवाणींची समजूत काढण्याचा आग्रह करणे.
4. संसदीय पक्षाच्या सर्व सदस्यांसोबत अडवाणींचे मन वळवण्यासाठी पुन्हा
प्रयत्न करणे.


शंका: येत्या शुक्रवारी भाजपच्या सांसदीय मंडळाची बैठक होण्याची शक्यता आहे. या बैठकीतच मोदींच्या नावावर एकमत होऊन घोषणा व्हावी, असा राजनाथ यांचा प्रयत्न राहणार आहे. परंतु अडवाणी राजी झाले नाहीत तर मुरली मनोहर जोशी आणि विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज या बैठकीत मोदींच्या नावाला पाठिंबा देतील की नाही, याबाबत शंका आहे.


आगामी निवडणूक राष्ट्रपती निवडणुकीसारखी : जेटली
थिरूवनंतपुरम । देशातील आगामी सार्वत्रिक निवडणूक राष्ट्रपती निवडणुकीसारखीच होऊ शकते, असे भाजप नेते अरुण जेटली यांनी म्हटले आहे. गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचे नाव न घेता जेटली म्हणाले की, आपल्या नेतृत्वाची क्षमता सिद्ध केलेला विरोधी पक्ष एखाद्या शक्तिशाली नेत्याचे नाव पुढे करत असेल तर त्या निवडणुकीला राष्ट्रपतींच्या निवडणुकीसारखाच रंग येतो. ही निवडणूक म्हणजे नेतृत्वावरील जनमत चाचणीही ठरणार आहे.