आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानवी दिल्ली - गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार घोषित करण्यास ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांचा विरोध अद्यापही कायम आहे. भाजप अध्यक्ष राजनाथ सिंह आणि माजी अध्यक्ष नितीन गडकरी यांनी अडवाणींची भेट घेऊन त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला खरा; पण तोही निष्फळ ठरला. त्यामुळे भाजपच्या संसदीय मंडळाच्या शुक्रवारच्या नियोजित बैठकीवर प्रश्नचिन्ह लागले आहे. मोदींच्या नावावर अडवाणी राजी झाले नाही तर स्वत: राजनाथ सिंह मोदींच्या नावाची घोषणा करतील, अशी शक्यता आहे.
मोदी यांना भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार घोषित करण्यास अडवाणी यांचा ठाम विरोध आहे. त्यांची मनधरणी करण्यासाठी बुधवारी राजनाथ त्यांच्या निवासस्थानी गेले. सुमारे 30 मिनिटे उभयतांमध्ये चर्चा झाली. पंतप्रधान पदाच्या उमेदवारीबाबत आपण संघ आणि भाजपला आपली भूमिका आधीच स्पष्ट केली आहे. त्यात बदल होणार नाही, असे अडवाणींनी राजनाथ सिंह यांना ठणकावले. त्यापूर्वी पक्षाचे माजी अध्यक्ष नितीन गडकरी यांनीही मंगळवारी अडवाणी यांची भेट घेऊन समजूत काढण्याचा प्रयत्न केला होता. मोदींच्या नावाचा प्रस्ताव अडवाणींनीच ठेवावा, अशी संघाची पहिली योजना होती. मात्र, अडवाणी त्यासाठी अजिबात तयार नाहीत. पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांच्या आधी मोदींचे नाव जाहीर करण्यात येऊ नये, असे अडवाणी यांचे म्हणणे आहे, तर 19 सप्टेंबरपूर्वीच मोदींच्या नावाची घोषणा झाली पाहिजे, असा संघाचा आग्रह आहे. त्यात भाजपचाच फायदा असल्याचे संघाचा तर्क आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.