आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • After Ncp Now Congress Leaders Are Involved In Lobbing

काँग्रेसमध्ये हालचाली सुरु : माणिकरावांना प्रदेशाध्यक्षपदावरुन डच्चू मिळणार?

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई/नवी दिल्ली- राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या पक्षाच्या सर्व मंत्र्यांचे राजीनामे घेत पक्षातंर्गत फेरबदलाचे संकेत दिल्यानंतर आता काँग्रेसच्या गोटातही वेगवान हालचाली सुरु झाल्या आहेत. राज्यातील काँग्रेसच्या काही नेत्यांनी पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेतल्याची माहिती आहे. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, राधाकृष्ण विखे-पाटील, शिवाजीराव मोघे यांच्यासह काही आमदारांनी सोनियांची भेट घेऊन चर्चा केल्याचे कळते. त्यामुळे महाराष्ट्र काँग्रेसमध्येही उलथा-पालथी होणार असल्याचे कळते. यात सर्वप्रथम प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांना डच्चू दिला जावू शकतो, असे सांगण्यात येते.

लोकसभा व राज्यातील विधानसभेच्या निवडणुका वर्ष- दीड वर्षावर आल्या असून, सत्ताधारी काँग्रेस व राष्ट्रवादीच्या विरोधात जनमत होऊ लागल्याचे चित्र आहे. त्यातच काँग्रेस व राष्ट्रवादी या दोन पक्षाची राज्यात सलग १४ वर्षे सत्ता आहे. त्यामुळे सत्ताधारी पक्षातील नेते व मंत्री मुजोरपणे वागत आहेत. अनेक मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते. काही मंत्र्यांवर थेट कारवाई करा, असे कोर्टाने बजावले होते. मात्र, सत्ताधारी पक्षांकडून फारशी साफसफाई झाली नव्हती. मात्र आता निवडणुकांचे पडघम वाजू लागल्याने व विरोधी पक्षांनी तयारी सुरु केल्याने सत्ताधारी पक्ष जागा झाला आहे. शिवसेना, भाजप व रिपाइं यांच्या महायुतीत मनसेला घेण्यासाठी प्रयत्न सुरु झाले आहेत. त्यादृष्टीने भाजपने राज्यातील सर्व विरोधी पक्षांना एकत्र आणून मोट बांधण्याची तयारी सुरु केली आहे. पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादी पक्षाला धक्का देणा-या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने भाजपच्या आमंत्रणाचा स्वीकार करताच राज्यातील राजकीय स्थिती व परिस्थिती बदलत चालल्याचे चाणाक्ष पवारांनी ओळखले. त्यामुळे पक्षातून साफसफाई करण्याचे काम हाती घेतले आहे. त्याद्वारे ते पक्षातील वरिष्ठ नेत्यांना वगळून लोकसभेच्या तयारीसाठी मोकळे करणार आहेत. तर काही ताज्या व नव्या दमाच्या चेह-यांना संधी देणार आहेत.

दरम्यान, राष्ट्रवादीतील घडामोडीनंतर काँग्रेसमध्ये जोरदार लॉबिंग सुरु झाले आहे. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण व शिवाजीराव मोघे यांनी सोनिया गांधी यांची भेट घेऊन राज्यातील पक्षीय स्थितीबाबत चर्चा केली. दरम्यान, माणिकराव ठाकरे यांना प्रदेशाध्यक्षपदावरुन डच्चू मिळणार असल्याचे कळते. तसेच पृथ्वीराज चव्हाणही ठाकरे यांना बदलण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. अशोक चव्हाण किंवा आणखी एखाद्या मराठा समाजाच्या नेत्याकडे प्रदेशाध्यक्ष सोपविण्याचा मुख्यमंत्री विचार करीत आहे. ठाकरे यांनी मुख्यमंत्री चव्हाण यांच्याविरोधात अनेक मोहिमा काढल्याने चव्हाण त्यांच्यावर नाराज आहेत. मात्र, काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी मोहन प्रकाश हे राजस्थानमधील ओबीसी समाजातील नेते असल्याने व माणिकराव ठाकरे हे ही ओबीसी घटकात मोडत असल्याने मोहन प्रकाश यांच्यामुळे त्यांची प्रदेशाध्यक्षपदाची खुर्ची मागील दोन वर्षापासून वाचत आली आहे. मात्र, आता चव्हाण यांनी डावपेच आखायला सुरुवात केली असून, लोकसभा व विधानसभेत पक्षाला यश मिळवायचे असेल तर ठाकरे यांना बदलणे कसे महत्त्वाचे या पटवून सांगण्याच्या तयारीत चव्हाण असल्याचे कळते. त्यामुळेच ठाकरे यांची खुर्ची जाण्याची शक्यता असून, त्यांच्या जागी अशोक चव्हाण, विखे-पाटील किंवा आणखी एखाद्या मराठा समाजाच्या नेत्याकडे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सोपविण्याचा विचार काँग्रेसच्या गोटात सुरु आहे.