आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

याकूबला फाशीचीच शिक्षा! सुप्रीम कोर्टाने पुनर्विलोकन याचिका फेटाळली

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- मुंबईतील १९९३ च्या बॉम्बस्फोट मालिकेतील दोषी याकूब मेमन याच्या फाशीच्या शिक्षेवर मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाने त्याची पुनर्विलोकन याचिका फेटाळून शिक्कामोर्तब केले. फाशीपासून वाचण्यासाठी त्याच्याकडे हा अखेरचा कायदेशीर मार्ग होता.
या प्रकरणात याकूब एकमेव दोषी आहे. त्याला ३० जुलै रोजी फाशी दिली जाणार आहे. सध्या तो नागपूर तुरुंगात आहे. दरम्यान, आणखी एक पर्याय म्हणून याकूबने मंगळवारी सायंकाळी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्यामार्फत राष्ट्रपतींकडे दया अर्ज दाखल केला. राष्ट्रपतींनी २०१४ मध्येच त्याची दया याचिका फेटाळली आहे.

या याचिकेत म्हटले होते की, आपण १९९६ पासून स्किझोफ्रेेनियाने ग्रस्त असल्यामुळे फाशीचे रूपांतर जन्मठेपेत करावे. एकाच गुन्ह्यासाठी दोन शिक्षा (जन्मठेप आणि फाशी) होऊ शकत नाही, असा युक्तिवादही त्याच्यातर्फे झाला. पण सरन्यायाधीश एच. एल. दत्तू यांच्या नेतृत्वाखालील न्यायपीठाने त्याचे सर्व युक्तिवाद फेटाळले. न्यायालयाने म्हटले आहे की, सर्वोच्च न्यायालयाने निश्चित केलेल्या निकषांनुसार याचिकेतील युक्तिवाद बसत नाहीत. त्यामुळे ती फेटाळण्यात येत आहे. सर्वोच्च न्यायालयाने २१ मार्च २०१३ ला याकूबच्या फाशीच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब केले होते. मुंबईत १२ मार्च १९९३ ला एकापाठोपाठ एक १३ बॉम्बस्फोट झाले होते. त्यात ३५० पेक्षा जास्त लोक ठार तर १२०० पेक्षा जास्त जण जखमी झाले होते.

कायद्यापेक्षाश्रेष्ठ कोणीही नाही हे दाऊदने समजून घ्यावे : निकम
टाडान्यायालयात खटला चालवणारे सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी हा निकाल ऐतिहासिक असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले, दोषींना माफी नाहीच, असा संदेश सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालामुळे देश आणि सीमेपलीकडील लोकांना जाईल. कोणीही कायद्यापेक्षा श्रेष्ठ नाही हे दाऊद इब्राहिम आणि टायगर मेमन यांनी समजून घ्यावे.
बातम्या आणखी आहेत...