आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुन्हा दुष्काळाचीच छाया, देशात ८८ टक्केच पाऊस; हवामान खात्याचा अंदाज

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - आधीच देशातील शेतीचे संकट आणि शेतक-यांच्या आत्महत्येची समस्या गंभीर बनलेली असतानाच मंगळवारी भारतीय हवामान खात्याने यंदा ‘अपुरा’ पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त केल्याने या वर्षीही देशावर भीषण दुष्काळाचे ढग घोंगावण्याचे संकेत आहेत.
‘सुधारित अंदाजाप्रमाणे यंदा देशात ८८ टक्केच पाऊस पडेल. त्यात ४ टक्के कमी-अधिक होण्याची शक्यता आहे, हे मला जड अंत:करणाने सांगावे लागत आहे,’ असे केंद्रीय विज्ञानमंत्री हर्षवर्धन यांनी सांगितले. यंदा सरासरीच्या ९५ टक्के पाऊस पडेल, असा अंदाज यापूर्वी एप्रिलमध्ये हवामान खात्याने वर्तवला होता. मात्र, हवामानातील बदल आणि त्याचा नैऋत्य मोसमी पावसाच्या वाटचालीवर झालेला परिणाम पाहता मंगळवारी हवामान खात्याने जाहीर केलेल्या सुधारित अंदाजात ‘अपुरा’म्हणजेच ८८ टक्केच पाऊस होणार असल्याचे सांगितलेे.
हवामान खात्याचा अंदाज अचूक असावा, या दृष्टीने आम्ही काम करत आलो आहोत. परंतु हवामान खात्याचा सुधारित अंदाज खरा ठरू नये, अशी देवाकडे प्रार्थना करूया, असे डॉ. हर्षवर्धन म्हणाले. दुष्काळ पडेल काय, असे विचारले असता माझा विभाग फक्त हवामानाचा अंदाज व्यक्त करताे, असे सांगत त्यांनी भाष्य करण्यास नकार दिला.

भीती : यंदा देशभर सरासरीपेक्षा अपुरा पाऊस
>हवामानाच्या अंदाजानुसार मध्य भारतात (महाराष्ट्रासह)सरासरीच्या ९० टक्के, दक्षिणेकडे ९२ टक्के, उत्तर भारतात ८५ टक्के आणि नैऋत्य भागात ९० टक्के पाऊस होईल.
>यंदा मान्सून केरळमध्ये ३० मे रोजीच येण्याचा अंदाज होता पण पाच दिवसांनी आगमन लांबले. आता ५ जूनला येण्याचा अंदाज.
>अंदमान-निकोबारच्या बेटांवर नेहमीपेक्षा दोन दिवस लवकर पोहाेचलेल्या मान्सूनचा प्रवास रखडला. २८ मेपासून मान्सून श्रीलंकेच्या पुढे सरकला नाही.
>अल- निनोचा प्रभाव हे कमी पावसाचे कारण आहे. भारताच्या आसपास अल-निनो प्रभावी होत आहे. २००९ मध्येही अल-निनोच्या प्रभावामुळे देशात २२ % कमी पाऊस पडला होता.

स्कायमेटच्या मते १०२% पाऊसमान
स्कायमेट या खासगी संस्थेच्या अंदाजानुसार मात्र यंदा देशात १०२ टक्के पाऊस होईल. स्कायमेटच्या मते देशात यंदा पावसासाठी अनुकूल स्थिती आहे. मागील दोन दिवसांत तापमानात झालेली घट चांगली आहे. दक्षिण भारतात विशेषत: केरळात मान्सूनपूर्व सर्व हालचाली योग्य होत अाहेत. यंदा सरासरीइतका पाऊस होईल. त्याचे प्रमाण १०२ टक्के राहील, असा अंदाज आहे.

चिंता वाढली : देशातील ६०% जनता शेतीवर अवलंबून. फक्त ४०%ओलिताची शेती. कमी पावसामुळे २०१४-१५ मध्ये अन्नधान्य उत्पादन २५१.१२ दशलक्ष टनांवर घसरले. गेल्या वर्षी ते २६५.०४ दशलक्ष टन होते. कृषी विकासदर ०.२ टक्क्यांवर थांबला.
पुढे, वाचा राज्यात कृत्रिम पावसाची तयारी