आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • मोदींचे खासदारच ओबामांना ताजमहाल पाहू देणार नाहीत, करणार रास्ता रोको!

मोदींचे खासदारच ओबामांना ताजमहाल पाहू देणार नाहीत, करणार रास्ता रोको!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आज भारत दौ-यावर येत आहेत. त्यामुळे भारताच्या सर्व सरकारी यंत्रणा त्यांचा दौरा यशस्वी व सुरळित पार पडावा यासाठी जीवापाड मेहनत घेत आहेत. तर दुसरीकडे, केंद्रातील सत्ताधारी भाजपचे एक खासदार चौधरी बाबूलाल हे ओबामा यांच्या गाड्याचा ताफा रोखण्यासाठी वकिलांना मदत करीत आहेत.
वकिलांनी म्हटले आहे की, आम्ही लोक ओबामांना ताजमहाल पाहू देणार नाही. वकिलांची मागणी आहे की केंद्र सरकारने आग्रा येथे हायकोर्टाचे एक खंडपीठ उभारावे. फतेहपुर सीकरीचे भाजप खासदार चौधरी बाबूलाल पूर्वी आरएलडी पक्षात होते. आता ते भाजपात येऊन खासदार बनले आहेत. दरम्यान, सुरक्षेच्या कारणास्तव ओबामा यांनीच ताजमहाल पाहण्याचा कार्यक्रम रद्द केल्याचे समोर येत आहे. आग्रा जिल्हा प्रशासनानेही याला दुजोरा दिला आहे.
एका इंग्रजी वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, चौधरी बाबूलाल यांनी 17 जानेवारी रोजी आग्रा सिव्हील कोर्टाच्या वकिलांच्या बैठकीत सहभाग घेतला. यात यूपीतील 17 जिल्ह्यातील प्रतिनिधी सहभागी झाले होते. या बैठकीत बाबूलाल यांच्या परवानगीनंतर वकिलांनी स्थानिक प्रशासनाला प्रस्ताव दिला की जर केंद्र सरकारने आमची मागणी मान्य केली नाही तर 27 जानेवारी रोजी ओबामा यांच्या आग्रामधील ताजमहाल भेटीवेळी रास्ता रोको आंदोलन करतील. या बैठकीत बाबूलाल यांनी या प्रस्तावाचे समर्थन केले होते. तसेच जेथे वकिलांचा घाम गळला आहे तेथे रक्त सांडू अशी भाषणबाजी ठोकली. उत्साहित वकिलांनीही आता निर्णय घेतला आहे की, ओबामा यांचा रास्ता रोको मोहिमेचे नेतृत्त्व खुद्द बाबूलाल चौधरी यांनीच करावे.
मात्र, जेव्हा या वेबसाईटने बाबूलाल यांच्याशी संपर्क साधला तेव्हा ते याबाबत थोडे कन्फ्यूज दिसून आले. बाबूलाल म्हणाले, होय मी आग्रा येथे हायकोर्टाचे खंडपीठ करण्याच्या मागणीला जरूर समर्थन दिले आहे. मात्र, ओबामांच्या दौ-याचा याच्याशी संबंध नाही. आग्र्यातील वकिल 27 जानेवारीला ताजमहलकडे जाणा-या रस्त्यावर आंदोलन करणार असल्याचे लक्षात आणून दिले असता बाबूलाल म्हणाले, जेव्हा हे वकिल आग्रामध्ये रास्ता रोको करतील तेव्हा ओबामा ताजमहाल पाहून दिल्लीला पोहचलेले असतील. या रास्ता रोको आंदोलनाला माझा पाठिंबा आहे कारण हे क्षेत्र माझ्या लोकसभा मतदारसंघात आहे व त्यांची मागणी रास्त असल्याने त्यांना तशी परवानगी दिली आहे.
प्रशासनाने दिला इशारा- ओबामा यांच्या दौ-यादरम्यान किंवा त्यांच्या ताफ्यातील गाड्यांना जर वकिलांनी रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केला तर वकिलांवर कडक कारवाई केली जाईल असा इशारा आग्रा जिल्हा स्थानिक प्रशासनाने दिला आहे. वकिलांनी आम्ही आमच्या निर्णयावर ठाम असल्याचे म्हटले आहे. वकिल व प्रशासन यांच्यात जोरदार खडाजंगी सुरु आहे.