आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकरी अात्महत्या कर्जाने नव्हे, प्रेमभंग-नपुंसकतेमुळे; केंद्रीय कृषिमंत्र्याचे अजब उत्तर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- शेतकरी आत्महत्यांसारख्या संवेदनशील विषयावरही राजकीय नेते किती असंवेदनशीलतेचा कळस गाठू शकतात, याची प्रचिती शुक्रवारी राज्यसभेत आली. केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह यांनी देशातील शेतकरी कर्जबाजारीपणामुळे नव्हे तर प्रेमभंग आणि नपुंसकतेसारख्या कारणांमुळे आत्महत्या करत असल्याचे राज्यसभेत लेखी उत्तरात सांगितले. कृषिमंत्र्यांच्या या उत्तराने विरोधी पक्ष सरकारवर भडकले. मंत्र्यांना शेतकऱ्यांच्या घरी जाऊन त्यांची स्थिती पाहायला सांगा, असा सल्ला काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिला आहे.

मागील वर्षी देशातील किती शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या व त्याची कारणे काय होती, असा लेखी प्रश्न राज्यसभेत विचारला होता. त्यावर लेखी उत्तरात कृषिमंत्री राधामोहन सिंह म्हणाले की, गेल्या वर्षी देशभरातील १४०० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमागे कर्जबाजारीपणा नव्हे तर प्रेमभंग, नपुंसकता, नशाखोरी आणि हुंडा ही कारणे प्रमुख आहेत. याखेरीज कर्ज व नापिकी अशीही कारणे आहेत.

कृषिमंत्र्यांनी दिलेल्या या उत्तरावर विरोधी पक्ष चांगलेच भडकले. शेतकऱ्यांच्या घरी जाऊन त्यांची काय स्थिती आहे हे जरा उघड्या डोळ्यांनी पाहायला तुमच्या मंत्र्यांना सांगा, असा सल्लाच राहुल गांधी यांनी दिला. कृषिमंत्र्यांनी असे सांगून संसदेची दिशाभूल केली आहे. आम्ही त्यांच्याविरुद्ध हक्कभंगाचा प्रस्ताव दाखल करू, असे जदयूचे खासदार के. सी. त्यागी म्हणाले, तर राधामोहन सिंह यांनी देशातील शेतकऱ्यांची माफी मागावी, अशी मागणी सपचे खासदार नरेश अग्रवाल यांनी केली.

पण अर्थ राज्यमंत्री म्हणतात शेतीवरील संकट हेच कारण कृषिमंत्र्यांनी राज्यसभेत प्रेमभंग आणि नपुंसकतेसारख्या कारणांमुळे शेतकरी आत्महत्या करत असल्याचे सांगून रोष ओढवून घेतलेला असतानाच केंद्रीय अर्थ राज्यमंत्री जयंत सिन्हा यांनी मात्र लोकसभेत शेतीवरील संकट हेच शेतकरी आत्महत्येचे कारण असून गेल्या तीन वर्षांत देशातील ३, ३१३ शेतकऱ्यांनी त्यामुळे आत्महत्या केल्याचे सांगितले. गुन्हे नोंदणी ब्युरोच्या अहवालानुसार कर्जबाजारीपणा, नापिकी, दुष्काळ आणि सामाजिक- आर्थिक स्थिती ही आत्महत्येची कारणे असल्याचे ते म्हणाले.

३ वर्षांत ३३१३ आत्महत्या
देशात २०१२ मध्ये १०६६, २०१३ मध्ये ८९० आणि २०१४ मध्ये १३५७ अशा एकूण ३३१३ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची माहिती अर्थ राज्यमंत्री जयंत सिन्हा यांनी लोकसभेत दिली.