आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Agusta Westland Deal BJP Asks For Names Congress Says We Blacklisted Agusta

‘ऑगस्टा’त सोनिया गांधींचे नाव; वादंग! स्वामींच्या वक्तव्याने गदाराेळ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इटलीतील मिलान कोर्टाने दिलेल्या निर्णयात चारवेळा सिग्नोरा (सोनिया) गांधी आणि दोनवेळा डॉ. मनमोहनसिंग यांच्या नावाचा उल्लेख आला आहे. - Divya Marathi
इटलीतील मिलान कोर्टाने दिलेल्या निर्णयात चारवेळा सिग्नोरा (सोनिया) गांधी आणि दोनवेळा डॉ. मनमोहनसिंग यांच्या नावाचा उल्लेख आला आहे.
नवी दिल्ली- राज्यसभेतील भाजपचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर लाच प्रकरणात काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांचे नाव घेतल्यामुळे काँग्रेस खासदार संतप्त झाले. सत्ताधारी अन् विरोधी खासदारांनी आक्रमक भूमिका घेतल्यामुळे राज्यसभेचे कामकाज स्थगित करणे भाग पडले. दरम्यान, आरोपात काहीही तथ्य नसल्यामुळे आपण कोणालाही घाबरत नाही, असे सोनियांनी स्पष्ट केले आहे.

आक्रमक काँग्रेस खासदारांमुळे सभागृहात एकवेळ मार्शल्सना बोलावण्याची वेळ आली. काँग्रेस खासदारांनी स्वामी यांचा उल्लेख सीआयएचे एजंट म्हणून केला. यावर भाजपच्या खासदारांनी तीव्र आक्षेप नोंदवला. सत्ताधारी-विरोधी खासदारांच्या आक्रमक पवित्र्यामुळे राज्यसभेतील कामकाज अनेकदा स्थगित करण्याची वेळ आली. राष्ट्रपती नियुक्त सदस्य म्हणून सुब्रमण्यम स्वामी यांनी मंगळवारी शपथ घेतल्यानंतर बुधवारी शून्य प्रहरात ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर लाच प्रकरणाचा मुद्दा उचलून धरला. ३६०० कोटी रुपयांच्या हेलिकॉप्टर व्यवहारात मध्यस्थ ख्रिश्चियन मिशेलच्या अहवालाचा संदर्भ देत स्वामी यांनी आरोप केले. स्वामी यांनी सोनिया यांच्यावर आरोप करताच काँग्रेसच्या खासदारांनी अध्यक्षांसमोर गोंधळ घालण्यास सुरुवात केली. वाढत्या गदारोळात काही मार्शल्सनी सत्ताधारी आणि विरोधी खासदारांमध्ये भिंत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. यावर उपाध्यक्ष पी. जे. कुरियन यांनी दहा मिनिटांसाठी कामकाज तहकूब केले. कामकाजाला पुन्हा सुरुवात झाल्यानंतर कुरियन यांनी जो सदस्य स्वत:चा बचाव करू शकत नाही, त्याच्या नावाचा उल्लेख करू नये, अशी सूचना केली. सभागृहातील तुमचे पहिले भाषण असल्यामुळे मी तुम्हाला सूचना देत नाही; परंतु कामकाजातून नाव काढले जाईल, असे कुरियन यांनी स्वामींना सांगितले. यावर नाराज काँग्रेस खासदारांनी पुन्हा हौद्यात प्रवेश केला आणि स्वामींविरोधात घोषणाबाजी केली. यानंतर उपाध्यक्षांनी पुन्हा कामकाज तहकूब केले. कामकाजाला सुरुवात झाल्यानंतर काँग्रेसच्या खासदारांनी स्वामींकडे इशारा करत सीआयएचे एजंट इथे बसले असल्याचा उल्लेख केला. स्वामींनी वक्तव्य मागे घेईपर्यंत त्यांना बोलण्याची परवानगी देऊ नये, अशी मागणी विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी केली.

सोनिया यांनी आरोप फेटाळले
ऑगस्टा वेस्टलँड प्रकरणात स्वत:वरील पक्षावरचे आरोप निराधार असल्याचे सोनिया गांधी यांनी स्पष्ट केले. सरकारने गेल्या दोन वर्षांत चौकशी का केली नाही? आपण या मुद्द्यावर घाबरत नसल्याचे सोनिया यांनी सांगितले. आमच्यावर केले जाणारे आरोप निराधार असल्याचे सोनिया यांनी संसद परिसरात पत्रकारांना सांगितले.

ऑगस्टा वेस्टलँडला ब्लॅकलिस्ट कधी केले : पर्रीकर
व्हीव्हीआयपीहेलिकॉप्टर कराराशी संबंधित कंपनी ऑगस्टा वेस्टलँडला काळ्या यादीत टाकल्याचा काँग्रेसचा दावा फेटाळत संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी यासंदर्भातील आदेश आणि त्याची तारीख काँग्रेसने सांगावी, असे जाहीर आव्हान काँग्रेसला दिले आहे. कराराशी संबंधित प्रश्नांवर संसदेत उत्तर दिले जाईल, असे पर्रीकर म्हणाले.

मोदी-इटलीच्या पंतप्रधानांची बैठक नाही : जेटली
गुलाम नबी आझाद यांच्या प्रश्नावर अरुण जेटली म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या इटलीतील समपदस्थांमध्ये बैठक झाल्याचे वृत्त चुकीचे आहे. मोदी यांनी गांधी कुटुंबाच्या माहितीच्या बदल्यात इटालियन खलाशांची सुटका करण्याची ऑफर दिल्याचे वृत्त आहे. या पार्श्वभूमीवर जेटलींनी वरील विधान केले. संरक्षण करार करताना लाच देण्यात आली हा मुख्य मुद्दा असल्याचे ते म्हणाले.
# भाजपच्या आरोपावर काय म्हणाल्या सोनिया
- सोनिया गांधी म्हणाल्या, 'माझे नाव घेऊ द्या, घाबरण्याचे काहीच कारण नाही, कारण लपवण्यासारखे माझ्याकडे काहीच नाही. हे सरकार दोन वर्षांपासून सत्तेत आहे, त्यांनी आतापर्यंत चौकशी का केली नाही ?'

#राज्यसभेत काय झाले
- राज्यसभेत विरोधीपक्ष नेते गुलाम नबी आझाद यांनी या प्रकरणी भाजपवरच आरोप केले.
- त्यांनी प्रश्न उपस्थित केला, की दोन्ही देशांच्या पंतप्रधानांची भेट झाली आहे का ? त्यांच्यामुळे डील अडकली का ?
- 'यूपीए सरकारने या प्रकरणी थेट कारवाई केली. सीबीआय, ईडीला चौकशी करुन कारवाई करण्यास सांगितले. त्याचवेळी व्यवहार देखिल रद्द केला.'
- आझाद म्हणाले, 'त्यावेळी सरकार कोर्टात गेले आणि पूर्ण अॅडव्हान्स रक्कम परत मिळविली. जे तीन हेलिकॉप्टर आले होते ते देखिल परत केले नाही, आणि ऑगस्ट वेस्टलँडला ब्लॅक लिस्टेड केले.'
- मागील सरकारने ब्लॅक लिस्टेड केलेल्या या कंपनीला मोदी सरकारने का मेक इन इंडियात सहभागी करुन घेतले, असा सवाल आझाद यांनी उपस्थित केला.

# सरकारने काय दिले उत्तर
- राज्यसभेत अर्थमंत्री जेटली म्हणाले, 'काँग्रेस ज्या प्रकारची मिटिंग झाली असे म्हणत आहे तशी कोणतीही मिटींग झाली नाही. त्यामुळे त्या पद्धतीचा जो रिपोर्ट आला आहे, तो चुकीचा आहे.'
- मुख्य मुद्दा संरक्षण खात्यातील भ्रष्टाचाराचा आहे. तिथे लाच घेतल्याचा आरोप झाला आहे.
- लाच देणारा दोषी ठरला आहे. जेव्हा चर्चा सुरु झाली आहे, तेव्हा त्यावर चर्चा केली पाहिजे.
- लाच स्विकारणारे कोण होते, हे समोर आले पाहिजे.

1# काय आहे प्रकरण
- यूपीए-1 सरकारच्या काळात 2010 मध्ये भारताशी झालेल्या ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर खरेदी व्यवहारात भ्रष्टाचार झाला होता, असा निकाल इटलीतील एका न्यायालयाने दिला आहे.
- डील 3,600 कोटी रुपयांची होती. एकूण डीलच्या 10% हिस्सा लाच म्हणून देण्यात आला होता. त्यानंतर यूपीए सरकारने 2010 मध्ये डील रद्द केली.
- या व्यवहारातील 3 हेलिकॉप्टर भारतात आले होते, मात्र भ्रष्टाचाराचा मुद्दा उपस्थित झाल्यानंतर त्यांचा वापर बंद झाला. आजही दिल्लीतील पालम विमानतळावर हे तिन्ही हेलिकॉप्टर उभे आहेत.
- हवाई दलाचे तत्कालीन प्रमुख एस. पी. त्यागी यांनी तेव्हा लाच घेतली होती, असा स्पष्ट उल्लेख करून सिग्नोरा गांधींसह अनेक नावांचा निकालात स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे.
2# का होत आहे चर्चा
- मिलान कोर्ट ऑप अपील्सने सोमवारी दिलेल्या एका निर्णयात हेलिकॉप्टर डीलमध्ये भ्रष्टाचार झाला आणि त्यात भारतीय हवाई दलाचे माजी चीफ एस.पी. त्यागी सहभागी असल्याचे म्हटले.
- 90 ते 225 कोटी रुपयांची लाच भारतीय अधिकाऱ्यांना देण्यात आली असल्याचे म्हटले आहे.
- कोर्टाने व्हीव्हीआयपी हेलिकॉप्टर देणारी कंपनी ऑगस्ट वेस्टलँडचे माजी सीईओ गियोसेप्पी ओरसी यांना दोषी ठरविले आहे. त्यांना साडेचार वर्षांच्या तुरुंगावासाची शिक्षा सुनावली आहे.

3# काँग्रेस का आरोपीच्या पिंजऱ्यात
- इटलीच्या मीडिया रिपोर्टनुसार, कोर्टाने आपल्या जजमेंटमध्ये म्हटले आहे, की हा करार व्हावा म्हणून कंपनीने काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार एम. के. नारायणन् आणि पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्याकडेही लॉबिंग केले होते.
- एनडीटीव्हीच्या वृत्तात दावा करण्यात आला की 225 कोटी रुपयांच्या लाचेच्या रकमेपैकी 52% हिस्सा नेत्यांना देण्यात आला. 28% ब्यूरोक्रॅट्सला देण्यात आला, 20% रक्कम एअरफोर्सच्या अधिकाऱ्यांना लाच म्हणून देण्यात आली.

4# सोनिया-मनमोहनसिंगांचे कसे घेतले नाव
- मिलान कोर्टच्या जजमेंटमध्ये सोनिय गांधी आणि मनमोहनसिंग यांच्या नावाचा उल्लेख आहे, मात्र त्यांनी काय चुकीचे केले याचा उल्लेख नाही.
- मार्च 2008 मध्ये या प्रकरणातील मुख्य मध्यस्थ ख्रिश्चियन मिशेलने ऑगस्टा वेस्टलँडचे भारतातील हेड पीटर ह्युलेट यांना पत्र लिहिले होते. यात सिग्नोरा गांधींची मुख्य भूमिका असल्याचे म्हटले होते.
- 2013 मध्ये ऑगस्टा वेस्टलँडचे सीईओ गियोसेप्पी ओरसीने तुरुंगातून एक पत्र लिहिले होते. त्या पत्रात म्हटले होते की, इटलीचे पंतप्रधान किंवा ज्येष्ठ नेत्याने पंतप्रधान मनमोहनसिंग यांची भेट घ्यायला हवी.
- एनडीटीव्हीच्या वृत्तात दावा केला गेला की हेलिकॉप्टर डीलमध्ये मध्यस्थाच्या पत्रात 'एपी' हा उल्लेख सोनिया गांधींचे राजकीय सल्लागार अहमद पटेल यांच्यासंबंधीचा आहे. तर, दुसरीकडे हवाई दलाचे माजी प्रमुख एस. पी. त्यागी यांच्या कुटुंबीयांसाठी "एफएएम' (फॅमिली ऑफ एअर मार्शल) असा उल्लेख होता.
5# भाजप का सक्रिय
- संसदेच्या अर्थसंकल्पिय अधिवेशनाचा दुसरा टप्पा सोमवारपासून सुरु झाला, तेव्हापासून काँग्रेसने उत्तराखंड मुद्यावरुन सरकारला दोन्ही सभागृहात घेरले आहे.
- त्यात आता ऑगस्टा वेस्टलँड प्रकरणात इटलीच्या न्यायालयाने भ्रष्टाचार झाल्याचा निर्णय दिल्याने भाजपला काँग्रेसवर शरसंधान साधण्यासाठी मुद्दा मिळाला आहे.
- हा मुद्दा समोर आल्यानंतर भाजपाध्यक्ष अमित शहा आणि अर्थमंत्री अरुण जेटलींची वरिष्ठ नेत्यांसोबत बैठक झाली. यात स्ट्रॅटजी ठरविण्यात आली.
- भाजपचे राष्ट्रीय सचिव श्रीकांत शर्मा म्हणाले, या प्रकरणी आता काँग्रेस अध्यक्षांनी स्पष्टीकरण दिले पाहिजे.
5# भाजपचे काँग्रेसला आव्हान
इटलीतील न्यायालयाच्या निकालानंतर दूरसंचार मंत्री रविशंकर प्रसाद यांनी तत्कालीन संरक्षण मंत्री ए. के. अँटनी यांनी लाचखोरांची नावे जाहीर करावीत, असे आव्हान दिले. दरम्यान, काँग्रेस नेते आनंद शर्मा यांनी सोनिया गांधी मनमोहनसिंग यांच्यावरील आरोप फेटाळले. ऑगस्ट वेस्टलँड हेलिकॉप्टरसाठी 3565 कोटी रुपयांचा हा करार झाला. यात मध्यस्थांना लाच दिल्याच्या आरोपानंतर सीबीआय ईडीमार्फत याची चौकशी सुरू आहे.
पुढील स्लाइडमध्ये,
>> त्यागी कसे अडकले
>> निकालातील मुख्य मुद्दे