आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुखद सोमवार : न उडता हवाई सफर घडवणारी एअरलाइन्स!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - अनेकांसाठी आजही विमान हे फक्त छायाचित्रांत कैद असलेलीच बाब आहे. हजारो फूट उंचीवरून उडण्याचा अनुभव घेणे हे एक स्वप्नच आहे. अशातच विमान प्रवासाचा ‘काही’सा अनुभव करून देण्याचा प्रयत्न दिल्लीचे निवृत्त एरोनॉटिकल इंजिनिअर बहादूरचंद गुप्ता करत आहेत. त्यांच्याकडे एक विशेष विमान आहे. त्यात ते बच्चे कंपनीसह बड्यांनाही खऱ्याखुऱ्या विमानाची अनुभूती घडवून देतात.

यासाठी गुप्ता यांनी काही वर्षांपूर्वी वडिलोपार्जित जमीन विकून सहा लाख रुपये जमवले. यानंतर त्यांनी निवृत्त म्हणजेच वापरात नसलेले एअरबस ए-३०० हे विमान विकत घेतले. त्याला नाव दिले ‘फ्लाइट टू नोव्हेअर’. म्हणजचे कुठेही न जाणारी फ्लाइट. दिल्लीबाहेरच्या परिसरात हे विमान ठेवलेले आहे. प्रवाशांना सफरीआधी बोर्डिंग पास घ्यावा लागतो. तो सुमारे ६०-६५ रुपयांचा आहे. तो विकत घेता आला तर ठीक, नाही तर नाही. आत दाखल होत सीटवर बसल्यानंतर दोन हवाईसुंदरी सीट बेल्ट, लाइफ जॅकेट आणि हवाई प्रवासाच्या पद्धतीची माहिती देतात. अगदी खऱ्याखुऱ्या विमान प्रवासासारखी. नंतर चॉकलेट आणि जेवणही वाढले जाते. यानंतर गुप्ता प्रवाशांना कॉकपिटमध्ये बोलावून विमान उडवण्याची माहिती देतात. यानंतर एमर्जन्सी स्लाइडवरून घसरत विमानातून बाहेर पडण्याच्या थराराचा अनुभव करून दिला जातो.

नोकरीत घडलेल्या एका घटनेमुळे गुप्तांना ही कल्पना सुचली. एका खेडुताला आतून विमान पाहण्याची इच्छा होती. गप्प राहण्याच्या अटीवर गुप्तांनी त्याला आत नेले. मात्र, उत्सुकतेने त्याने तोंड उघडलेच. दोघेही पकडले गेले. यातूनच कुठेही न जाणाऱ्या फ्लाइटच्या संकल्पेनचा जन्म झाला. गुप्ता म्हणतात, हे माझे विचार होते, जे मी साकारले. जेव्हा तुम्ही इतरांना आनंदित करता तेव्हा तुम्ही स्वत:ही खूप आनंदित होता. अर्थात, या सर्व सरंजामासाठी पैसा लागतोच. यामुळे हे विमान केबिन क्रूच्या ट्रेनिंगसाठी किरायाने दिले जाते.