आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ajmal Kasab Said, Zaki Chacha Encourage To Attack On Mumbai

क्रूरकर्मा कसाब म्हणाला होता, झकी चाचानेच मुंबई हल्ल्यासाठी भडकवले!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - मुंबईवर झालेल्या २६/११च्या हल्ल्यात जिवंत पकडण्यात आलेला एकमेव आरोपी अजमल कसाब याने चौकशीदरम्यान झकी-उर-रहमान लख्वीचा स्पष्ट उल्लेख केला होता. पोलिसांना त्याने लख्वीबद्दल सविस्तर माहिती दिली होती. ‘झकी चाचा म्हणायचा, हे अल्लाचे काम आहे. तुझे नाव होईल, कुटुंबातही प्रतिष्ठा मिळेल, प्रचंड पैसा कमावशील...तुम्हाला पुरस्कारही मिळेल,’ असे कसाबने जबाबात नमूद केले होते. नंतर अबू जिंदाल आणि डेव्हिड हेडलीच्या चौकशीतूनही लख्वीचे नाव अनेकदा आले होते.

मुंबई हल्ल्याच्या वेळीही लख्वी सॅटेलाइट फोनवरून सर्व दहा अतिरेक्यांच्या संपर्कात होता. कुणीही मोबाइल कट करू नका, तुम्ही काय करता आहात ते लाइव्ह कळायला हवे, असे तो प्रत्येक अतिरेक्याला सांगत होता. एवढेच नव्हे, ताज हॉटेलसह इतरत्र ओलीस ठेवलेल्या लोकांना खाली बसवून पाठीत गोळ्या घालण्याची सूचनाही त्याने फोनवर अतिरेक्यांना केली होती. जास्तीत जास्त लोकांना मारत राहा, असेही तो वारंवार सांगत होता. ही माहिती नंतर टॅप केलेल्या संभाषणातून उघडकीस आली होती.

१९९९ मध्ये पहिल्यांदा गरळ ओकली...
लख्वी १९९९ मध्ये सर्वप्रथम प्रकाशझोतात आला. पाकिस्तानात कट्टरवाद्यांनी आयोजित केलेल्या एका तीनदिवसीय संमेलनात त्याने भारताविरुद्ध इतकी गरळ ओकली की स्थानिक माध्यमांमध्ये तो एकदम चमकला. भारताला अद्दल घडवण्याची वेळ आली असल्याचे त्याचे तेव्हाचे फुत्कार नंतर २६/ ११ च्या मुंबई हल्ल्यापर्यंत सुरू होते. आता पुन्हा एकदा तो मोकाट सुटणार आहे.

झकी-उर-रहमान लख्वी आहे कोण?
-लष्कर-ए-तोयबा या अतिरेकी संघटनेचा कमांडर.
-मुंबईवर २६ नोव्हेंबर २००८ रोजी झालेल्या (२६/११) हल्ल्याचा मास्टरमाइंड.
-या हल्ल्याची पूर्ण योजना लख्वीने तयार केली होती.
-मुंबई धुमाकूळ घालणा-या कसाबसह सर्व अतिरेक्यांना लख्वी सॅटेलाइट फोनवरून निर्देश देत होता.
-या हल्ल्यासाठी कराचीमध्ये नियंत्रण कक्षात बसून दिल्या जात होत्या अतिरेक्यांना सूचना.
-७ डिसेंबर २००८ रोजी पाकव्याप्त काश्मीरमध्ये मुजफ्फराबादमध्ये अटक.
-लख्वीला भारताच्या स्वाधीन करण्याची मागणी पाकने फेटाळली होती.
-यानंतर पाकने मुंबई हल्ल्याचा खटला पाकिस्तानातच चालवण्याचा निर्णय घेतला.
-२७ नोव्हेंबर २००९ रोजी लख्वीसह सात जणांवर आरोप निश्चित करण्यात आले. {सध्या लख्वी रावळपिंडी तुरुंगात कैद आहे.

पाकचा दुटप्पी चेहरा
‘चांगला तालिबान किंवा क्रूर तालिबान’ असूच शकत नाही, असा दावा करणा-या पाकिस्तानी सरकारचा दुटप्पी चेहरा लख्वीला मिळालेल्या जामिनामुळे समोर आला आहे. रावळपिंडीत अडियाला तुरुंगात बंदिस्त असलेल्या लख्वीला दहशतवादविरोधी न्यायालयानेच जामीन मंजूर केल्याने दुटप्पीपणा अधिक स्पष्टपणे जगासमोर आला.

सात आरोपींच्या होत्या याचिका
मुंबई हल्ल्यासंदर्भात अटकेत असलेल्या लख्वीसह सात आरोपींनी जामिनासाठी विशेष न्यायालयात याचिका दाखल केलेल्या होत्या. यात लख्वीसह अब्दुल वाजिद, मजहर इक्बाल, हमद आमीन सादिक, शाहीद जमील रियाझ, जमिल अहमद आणि युनूस अंजुम यांचा समावेश होता. यावर बुधवारीच सुनावणी होणार होती. मात्र, पेशावरमध्ये लष्कराच्या वतीने चालवल्या जाणा-या शाळेवर मंगळवारी झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ सार्वत्रिक बंद पुकारण्यात आल्याने बुधवारी ही सुनावणी होऊ शकली नाही. गुरुवारी सुनावणीदरम्यान एकट्या लख्वीला जामीन मंजूर करण्यात आला.