आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Akhilesh Yadab Meet Narendra Modi, News In Marathi

उत्तर प्रदेशसह देशभरात महिला अत्याचार सुरूच; अखिलेश यांचा राजीनामा मागितला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुरादाबाद/लखनऊ/ नवी दिल्ली- उत्तर प्रदेशासह देशभरात महिलांवरील अत्याचाराने कळस गाठला आहे. गेल्या 24 तासांत देशात नोंदवलेल्या अत्याचाराच्या एकूण 10 गुन्ह्यांपैकी उत्तर प्रदेशातील चार घटनांचा समावेश आहे. मुरादाबादमध्ये विद्यार्थिनीवर अत्याचार करून तिला फासावर चढवण्यात आल्याचा आरोप आहे. हरियाणा, पंजाब, राजस्थान, गुजरात आणि तामिळनाडूमध्ये लैंगिक हिंसाचाराची प्रकरणे दाखल झाली आहेत.

उत्तर प्रदेशची स्थिती दिवसेंदिवस बिघडत चालली आहे. गुरुवारी मुरादाबादमध्ये एका मुलीची हत्या करून मृतदेह झाडाला लटकावण्यात आला. बलात्कारानंतर मुलीची हत्या केल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे. या घटनेत बळी पडलेली विद्यार्थिनी मुरादाबादच्या ठाकूरद्वारा भागातील राजीपूर मिलक गावची रहिवासी होती. तिने या वर्षी दहावीची परीक्षा दिली होती. तिचे वडील हिमाचल प्रदेशात नोकरी करतात. घरी आई व भाऊ असतात. त्यांनी सांगितले की, बुधवारी रात्री आठ वाजता घराबाहेर पडलेली मुलगी परत आली नाही. तिचा रात्रभर शोध घेतला, मात्र काहीच ठावठिकाणा लागला नाही. गुरुवारी सकाळी तिचा मृतदेह गावातील एका मंदिराजवळ झाडाला टांगलेल्या अवस्थेत दिसून आला. बहिणीची हत्या करूनच आत्महत्येचा दिखावा करण्यात आला आहे. भावाने गावातील संजीव नावाच्या व्यक्तीवर हत्येचा आरोप ठेवला. त्याआधी बदायूं आणि बहराइचमध्येही महिलांना अत्याचारानंतर झाडाला लटकावण्यात आले होते.
युपीत सर्व आलबेल मुख्यमंत्री अखिलेश
राज्यात सगळे काही आलबेल आहे. उलट इतर राज्यांपेक्षा उत्तर प्रदेशातील कायदा व सुव्यवस्था उत्तम असल्याचा दावा मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी गुरुवारी केला.उत्तर प्रदेशात उद्योजकांनी गुंतवणूक करावी यासाठी नवी दिल्लीत परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.त्यावेळी पत्रकारांनी महिला अत्याचाराबद्दल विचारले असता अखिलेश म्हणाले,राज्यात आलबेल असल्यामुळेच गुंतवणूकदार या ठिकाणी मोठय़ा संख्येने आले आहेत.

सीबीआयचे पथक बदायूंला जाणार
बदायूं 2 उत्तर प्रदेशच्या बदायूंमध्ये सामूहिक बलात्कारानंतर हत्या प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे सोपवण्यात आली आहे. उपमहानिरीक्षकाच्या नेतृत्वाखालील सीबीआयचे 20 सदस्यांचे पथक शुक्रवारी बदायूंमध्ये जाऊन आढावा घेईल. या प्रकरणी खटला दाखल करण्यात आला आहे. पथकामध्ये फॉरेन्सिक तज्ज्ञ आहेत.

दिल्लीत धावत्या कारमध्ये बलात्कार
राजधानी दिल्लीमध्ये धावत्या कारमध्ये 25 वर्षांच्या तरुणीवर तिघांनी सामूहिक बलात्कार केला. पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. जितेंद्र, जय भगवान आणि अजय अशी आरोपींची नावे आहेत.

केंद्रीय मंत्र्यास नोटीस
मोदी सरकारमधील रसायन व खत राज्यमंत्री निहालचंद मेघवाल यांना बलात्कार प्रकरणात बाजू मांडण्यासाठी राजस्थानच्या न्यायालयाने नोटीस पाठवली आहे. मेघवाल राजस्थानमधील
श्र‍ीगंगानगरचे खासदार आहेत.

हमीरपूरमध्ये पतीला सोडवण्यासाठी पोलिस ठाण्यात गेल्यावर आपल्यावर ठाणे अंमलदार व तीन पोलिस शिपायांनी बलात्कार केल्याचा आरोप महिलेने केला आहे. मात्र, वैद्यकीय अहवालात बलात्काराला दुजोरा मिळाला नाही. दुसरीकडे बरेलीमध्ये एका महिलेने सासरा व दोन दिरांवर बलात्काराचा आरोप केला. अत्याचाराची आणखी चार प्रकरणे दाखल करण्यात आली आहेत. यादरम्यान उत्तर प्रदेशच्या मुख्य सचिवांनी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेऊन अहवाल सादर केला. अत्याचाराच्या घटनांमुळे राष्ट्रीय महिला आयोगाने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांचा राजीनामा मागितला आहे.