आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोपीनाथ मुंडे मृत्यूप्रकरणी टॅक्सी चालकावर निष्काळजीपणे वाहन चालवण्याचा आरोप

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - दिवंगत केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या अपघात प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाने(सीबीआय) गुरुवारी टॅक्सी चालक गुरविंदर सिंगविरुद्ध भरधाव वेगात व निष्काळजीपणे वाहन चालवण्याच्या आरोपाखाली आरोपपत्र दाखल केले आहे. याशिवाय या प्रकरणात कोणत्याही घातपाताची शक्यता फेटाळली आहे.
गुरविंदर सिंगविरोधात भादंवि कलम २७९ व ३०४अ अंतर्गत आरोप ठेवण्यात आले आहेत. या गुन्ह्यात दोषी ठरल्यास त्याला जास्तीत जास्त दोन वर्षांची शिक्षा होऊ शकते. गोपीनाथ मुंडे ३ जून रोजी बीडला निघण्यासाठी सरकारी वाहनातून विमानतळाकडे जात असताना पृथ्वीराज-तुघलक रोडवर गुरविंदरची कार त्यांच्या वाहनावर आदळली. या अपघातात मुंडे यांना गंभीर दुखापत होऊन त्यांचा मृत्यू झाला होता. मंत्र्यांच्या चालकाने सिग्नल तोडल्यामुळे अपघात झाल्याचा आरोप गुरविंदरने केला आहे. या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर प्रकरण सीबीआयकडे हस्तांतरीत करण्यात आले. सीबीआयने २७९ व ३०४ अ अंतर्गत गुन्हा दाखल केला. सीबीआयने या प्रकरणात कोणत्याही घातपाताची शक्यता याआधीच फेटाळून लावली आहे. मुंडे यांचा मृत्यू अपघातातील गंभीर दुखापतीमुळे झाल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. मुंडे यांच्या मृत्यूनंतर राज्यातील अनेक राजकीय नेत्यांनी अपघाताची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली होती.