आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Amartya Sen Says Modi Government Wants Control Of Academic Institutions

नोबेल विजेते सेन म्हणाले- मोदी सरकारला हवा शैक्षणिक संस्थांवर ताबा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - नालंदा विद्यापीठाच्या कुलगुरु पदाच्या दुसऱ्या कार्यकाळासाठीची उमेदवारी मागे घेत नोबेल पुरस्कार विजेते अर्थतज्ज्ञ अमर्त्य सेन यांनी नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. त्यांनी 'न्यूयॉर्क रिव्ह्यू ऑफ बुक्स'साठी चार हजार शब्दांचा निबंध लिहिला असून त्यात नालंदा विद्यापीठ सोडण्याबद्दलची सविस्तर कारणमीमांसा केली आहे. त्यासोबतच मोदी सरकार शैक्षणिक संस्थांवर थेट नियंत्रण आणू इच्छित असल्याचा आरोप केला आहे. सिंगापूरचे माजी परराष्ट्रमंत्री जॉर्ज येओ नालंदा विद्यापीठाचे नवे कुलगुरु असणार आहेत. ते 17 जुलै रोजी पदभार स्वीकारतील.
मला बाहेर काढण्यात आले - डॉ. सेन
'न्यूयॉर्क रिव्ह्यू ऑफ बुक्स'मध्ये निबंध प्रकाशित होण्याआधी एका इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत डॉ. सेन यांनी केंद्र सरकार शैक्षणिक संस्थावर नियंत्रण मिळवण्यासाठी आश्चर्यकारक दखल देत असल्याचे सांगितले. सेन म्हणाले, 'मला अटी-शर्तींवर नालंदामधून बाहेर करण्यात आले.' सेन यांच्या म्हणण्यानूसार, विद्यापीठ मंडळातील अनेक सदस्य त्यांच्यासाठी लढण्याच्या तयारीत होते. मात्र मी त्या पदापासून दूर झालो. कारण मी माझा कार्यकाळ पूर्ण करण्याचा प्रयत्न केला असता तर, कदाचित विद्यापीठाच्या दर्जा काढून घेण्याची भीती होती, निधी देखील थांबवण्यात आला असता. सेन म्हणाले, 'नालंदा हे एकमेव प्रकरण नाही. असे अनेक ठिकाणी सूरु आहे. ज्या-ज्या शैक्षणिक संस्थांमध्ये सरकारची औपचारिक भूमिका असते तिथे-तिथे सरकार अधिक दखल देत आहे. आजपर्यंतच्या कोणत्याही पंतप्रधानांच्या कार्यकाळात असे झालेले नाही.'
अर्थव्यवस्थेवरुनही टीकास्त्र
डॉ. सेन म्हणाले, की भारतीय अर्थव्यवस्था खराब स्थितीत आहे. अर्थसंकल्पात आरोग्य आणि शिक्षणावरील खर्चात कपात करण्यात आली आहे. ते म्हणाले, 'मी उद्योगांच्या विरोधात नाही. मात्र देशात निरक्षरांचे आणि आजारी लोकांचे प्रमाण वाढवून उद्योग क्षेत्र मोठी उंची गाठू शकणार नाही.' डॉ. सेन यांच्या मतानूसार, बाजाराधारित अर्थव्यवस्था चांगली करण्यासाठी पब्लिक सर्व्हिस गरजेच्या असतात हे समजून घेण्यात मोदी सरकार अपयशी ठरले आहे.