आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुजरातच्या मुख्यमंत्र्यांची निवड अमित शहा करणार, भाजपच्या संसदीय मंडळाचा निर्णय

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - गुजरातच्या मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांचा उत्तराधिकारी निवडण्याची जबाबदारी पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्यावर सोपवण्यात आली आहे. भाजपच्या संसदीय मंडळाने बुधवारी हा निर्णय घेतला. अमित शहा गुरुवारी अहमदाबाद येथे जाणार आहेत. ते आमदारांशी चर्चा करतील. त्यानंतर शुक्रवारी भाजप विधिमंडळ पक्षाची बैठक होऊन तीत नव्या नेत्याची निवड होईल, अशी अपेक्षा आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी भाजपच्या संसदीय मंडळाची बैठक झाली. तीत नवा मुख्यमंत्री निवडण्याचे सर्वाधिकार अमित शहा यांना देण्यात आले. बैठकीतील निर्णयाची माहिती देताना ज्येष्ठ नेते एम. व्यंकय्या नायडू यांनी सांगितले की, विधिमंडळ पक्षाच्या नेता निवडीच्या बैठकीसाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि पक्षाच्या सरचिटणीस सरोज पांडे यांची केंद्रीय निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाच्या आमदारांमधूनच नव्या मुख्यमंत्र्यांची निवड होईल.

आनंदीबेन पटेल यांच्या जागी अमित शहा यांची निवड होण्याची शक्यता फेटाळून लावताना नायडू म्हणाले की, शहा यांच्या नेतृत्वाखाली पक्षाला उल्लेखनीय यश मिळाले आहे. त्यामुळे पक्षाला त्यांची राष्ट्रीय पातळीवर गरज आहे. अमित शहा हे गुजरातमध्ये आमदार आहेत. ते राज्यातील आमदारांशी चर्चा करून नवीन नेत्याचे नाव ठरवतील. शहा हेच मुख्यमंत्रिपदाचे प्रबळ दावेदार आहेत का, या प्रश्नाला उत्तर देताना नायडू म्हणाले की, शहा हे पक्षाध्यक्ष आहेत आणि पुढेही राहतील.

आनंदीबेन पटेल यांनी सादर केला राजीनामा
गांधीनगर । गुजरातच्या मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांनी बुधवारी राज्यपाल ओ. पी. कोहली यांच्याकडे पदाचा राजीनामा दिला. या वेळी राज्य मंत्रिमंडळातील काही मंत्री आणि पक्षाचे नेते उपस्थित होते.
बातम्या आणखी आहेत...