नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे निकटवर्तीय आणि भाजपचे सरचिटणीस अमित शहा यांना 'झेड-प्लस' सुरक्षा देण्यावरून चांगलेच राजकारण तापले आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने अमित शहा यांना झेड प्लस सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला आहे. कॉंग्रेसने याप्रकरणी मोदी सरकाराला स्पष्टीकरण मागितले आहे.
दुसरीकडे, आम आदमी पक्षाचे नेते प्रशांत भूषण यांनी अमित शहा यांना दिलेल्या झेड प्लस सुरक्षेबाबत खोचक टिप्पणी केली आहे. अमित शहा यांच्यासाठी 'कारागृह' हेच सगळ्यात सुरक्षित आहे, असे म्हटले आहे. यावरून चांगलीच खळबळ उडाली आहे. आता भाजपकडून अमित शहा यांचा कसा बचाव केला जातो, हे बघण्यासारखे आहे.
झेड प्लस ही सुरक्षा अतिशय महत्त्वाच्या व्यक्तींना दिली जाते. अमित शहा यांच्याकडे सध्या कोणतेही प्रशासकीय पद नाही. तरीही त्यांना ही सुरक्षा देण्यात आली आहे. यामुळे भाजपच्या या निर्णयावर चौफेर टीका केली जात आहे. यावर आपली बाजू मांडताना मात्र, भाजपने कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वढेरा यांचे उदाहरण दिले आहे. त्यांना आणि प्रियंका गांधी यांनाही झेड प्लस सुरक्षा कॉंग्रेसप्रणित संयुक्त पुरोगामी आघाडीने दिली होती.
दरम्यान, अमित शहा यांच्या जिवाला मोठा धोका असल्याचे लक्षात आल्यानंतर गृहमंत्रालयाने बुधवारी त्यांना झेड प्लस सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला. शहा यांच्या सुरक्षा पथकामध्ये निमलष्करी कमांडोंचा सहभाग असेल. तसेच त्यांच्या निवासस्थानाभोवती शस्त्रधारी सुरक्षारक्षक तैनात केले जाणार आहेत. शहा देशातील राज्यांच्या दौरा करतील तेव्हा त्यांच्या भोवती सुरक्षेचे अभेद्य कडे असेल , अशी माहिती सूत्रांनी दिली होती.
(फाइल फोटो: भाजपचे सरचिटणीस अमित शाह)
पुढील स्लाइड्सवर वाचा, अमित शहा यांची कशी असेल सुरक्षा