आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भाजपच्या अध्यक्षपदासाठी अमित शहांच्या नावावर RSSचे शिक्कामोर्तब

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाईल फोटो- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे निकटवर्तीय अमित शहा.)
नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे निकटवर्तीय आणि लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपला उत्तर प्रदेशात घवघवीत यश मिळवून देणारे अमित शहा यांच्या नावावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने अखेर शिक्कामोर्तब केले आहे. भाजपचे नवीन अध्यक्ष म्हणून त्यांच्या नावाची 28 जून रोजी घोषणा होण्याची शक्यता आहे.
भाजपमधील सूत्रांनी माहिती दिली, की बुधवारी रात्रीच्या सुमारास नरेंद्र मोदी, भाजपचे विद्यमान अध्यक्ष राजनाथसिंह, केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची बैठक झाली. यावेळी भाजपच्या नवीन अध्यक्षावर चर्चा झाली. यादरम्यान सर्वांनी अमित शहा यांच्या नावावर सहमती दर्शवली आहे.
भाजपला मजबूत करण्यासाठी दिली जबाबदारी
प्रथम भाजपचे विद्यमान अध्यक्ष राजनाथसिंह पक्षातील पदाचा राजीनामा देतील. त्यानंतर अमित शहा यांच्या नावाची औपचारिक घोषणा केली जाईल. या पदासाठी अमित शहा यांच्या व्यतिरिक्त जे. पी. नड्डा आणि ओ. पी. माथूर यांच्या नावावर चर्चा सुरू होती. यातील नड्डा यांनी सरचिटणीसपदावर कायम राहण्याची इच्छा व्यक्त केली होती. तर माथून यांच्या नावावर आमसहमती झाली नव्हती. याशिवाय पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांचे मत आहे, की शहा यांनाच पक्षाची जबाबदारी सोपवायला हवी. भाजपमधील प्रमुख नेते केंद्र सरकारमध्ये गेले असल्याने पक्षाला दमदार नेत्याची गरज आहे. अशा वेळी शहा योग्य पद्धतीने पक्ष सांभाळू शकतील. शिवाय मोदींचे विश्वासू असल्याने मोदींची पक्षावर असलेली पकड सैल होणार नाही.
उत्तर प्रदेशातील श्रमाचे फळ
उत्तर प्रदेशात अमित शहा भाजपचे प्रभारी होते. त्यांच्या नेतृत्वात लोकसभा निवडणुका लढविण्यात आल्या होत्या. या निवडणुकांमध्ये त्यांनी भाजपला घवघवीत यश मिळवून दिले होते. त्यामुळे त्यांची केंद्र सरकारमध्ये वर्णी लावण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. परंतु, त्यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश करण्यात न आल्याने भाजपचे अध्यक्षपद मिळण्याची दाट शक्यता होती. अखेर संघानेही त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे.