आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राज्यामध्ये आगामी सरकार भाजपच्या नेतृत्वाखालीलच, अमित शहांचा विश्वास

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - महाराष्ट्रातील राजकीय हवा सत्ताधार्‍यांच्या विरोधात वाहत असून आगामी विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात भाजपच्या नेतृत्वाखाली स्वबळावर सरकार येईल, असा विश्वास भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी व्यक्त केला. शहा यांच्या विधानातून राज्यात भाजपचाच मुख्यमंत्री होणार असे संकेत मिळाल्यामुळे युतीत अस्वस्थता निर्माण होण्याची शक्यता आहे.

देशात भाजपचे सरकार आले याचा अर्थ देश काँग्रेसमुक्त झाला, असा घेऊ नका. अजूनही अनेक राज्यांत संघटना मजबूत करण्याची गरज आहे. महाराष्ट्रातील जनतेला काँग्रेस-राष्ट्रवादीपासून सुटका हवी आहे, असे शहा म्हणाले.

भाजपच्या राष्ट्रीय परिषदेने शहा यांच्या अध्यक्षपदी निवडीवर शिक्कामोर्तब केले. 13 जुलै रोजी त्यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड करण्यात आली होती. तीन महिन्यांच्या आत या निवडीवर राष्ट्रीय परिषदेचे शिक्कामोर्तब आवश्यक होते. यावेळी बोलताना जिंकण्याची सवय लावून घ्या व या वर्षी चार राज्यांत आणि पाच वर्षांत होणार्‍या 15 विधानसभा निवडणुकांसाठी तयार रहा, असे ते म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरकारच्या 60 दिवसांचा लेखाजोखा मांडताना 60 दिवसांची तुलना 60 वर्षांशी केली जात असल्याचे सांगत काँग्रेसवर टीकास्त्र सोडले. लोकसभा निवडणुकीनंतर भाजपचा हा पहिलाच राष्ट्रीय कार्यक्रम होता. त्यात पक्षाच्या नेत्यांनी संघटना, सरकार आणि विरोधकांबाबत चर्चा केली.

60 दिवसांशी होते 60 वर्षांची तुलना : मोदी
सरकारबाबत
- मोदी म्हणाले, जे 60 वर्षांत काहीच करू शकले नाहीत, ते 60 दिवसांचा हिशेब मागत आहेत. पराभव होऊनही ते व्होटबँकेचे राजकारण करतात.
- अन्य कोणत्याही पक्षाला मोजले जात नाही अशा तराजूत आम्हाला मोजले जाते; पण आमच्यासाठी ते चांगलेच आहे.
- काँग्रेसचा नाव न घेता मोदी म्हणाले, ज्या लोकांनी अन्न सुरक्षेच्या नावावर मते मागितली, त्यांनीच डब्ल्यूटीओत स्वाक्षरी केली होती.

विरोधी पक्षाबाबत
- मोदी म्हणाले, 60 दिवसांच्या अनुभवावरून सरकारची दिशा योग्य आहे, असा विश्वास मी देतो. परिस्थिती समजून-उमजून घेतली आहे.
- नवे सरकार आल्यानंतर जगाचा भारताकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. भारताचाच डंका वाजेल, असे हे नक्की.
- मोदी म्हणाले, डब्ल्यूटीओ प्रकरणात गैरसमज पसरवण्यात येत आहेत. शेतकर्‍यांचे हित लक्षात घेऊन आम्ही स्वाक्षरी करण्यास नकार दिला.
- समारोपाचे भाषण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी निघाले असताना लालकृष्ण अडवाणी, मुरलीमनोहर जोशी, पक्षाध्यक्ष अमित शहा आणि अरुण जेटली यांनी उभे राहून मोदींचे स्वागत केले.

संघटनेबाबत
- शहा म्हणाले, भाजप महाराष्ट्र, हरियाणा, झारखंड, जम्मू-काश्मीरमध्ये स्वबळावर सरकार स्थापन करेल.
- मोदी म्हणाले, दोन दिशांनी जावे लागेल. पक्षाचा विस्तार आणि कार्यकर्त्यांचा विकास करावा लागेल.
- मोदी म्हणाले, फक्त एका ‘पीएम’वर काम चालणार नाही. प्रत्येक मतदान केंद्रावर 100 ते 200 ‘पीएम’ हवे आहेत.

(फोटो : समारोपाचे भाषण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी निघाले असताना लालकृष्ण अडवाणी, मुरलीमनोहर जोशी, पक्षाध्यक्ष अमित शहा आणि अरुण जेटली यांनी उभे राहून मोदींचे स्वागत केले)