आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अशोका मार्गावर जल्लोष तरीही भयाची किनार..!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - समारंभासारखे वातावरण होते. नृत्य-संगीत, मेजवानी, आतषबाजी आणि जल्लोष असे सर्वकाही. निमित्त होते भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्या फेरनिवडीचे. त्यांची निवड अविरोध झाली. त्यामुळे धूमधडाका असतानाही जणू वर किंवा वधूपक्षाकडील कुणीतरी नाराज असून बळजबरी विवाह होत असल्यासारखे वाटत होते. बंदुकीच्या धाकाने बिहारमध्ये कधीकाळी असे व्हायचे तसेच वाटत होते. सेलिब्रेशनच्या मूडला कसल्या तरी भीतीची किनार जाणवत होती. खरे तर बिहार निवडणुकीनंतर पक्षासाठी ही उत्सव साजरा करण्याची पहिलीच वेळ होती.

कधीतरी क्वचित कार्यालयात फेटफटका मारणारे व्हीव्हीआयपी यानिमित्ताने पायधूळ झाडणार होते. रेड कार्पेटवर पुरस्कार सोहळ्यासारखी त्यांची एंट्री होत होती. बाहेर कार्यकर्त्यांची गर्दी होती. काही नृत्यावर बेधुंद होते. बिहार निवडणुकीच्या निकालानंतर जल्लोष करण्यासाठी बुक केलेली हीच डान्स ट्रुप आहे ना, अशी चर्चाही रंगली होती. मागील दारात नेते बोलत होते. परंतु ढोलताशांच्या आवाजात त्यांची चर्चा ऐकू येत नव्हती. समारंभाच्या मुख्य मंडपात केवळ व्हीव्हीआयपी पाहुण्यांनाच प्रवेश करण्याची संधी मिळत होती. संसदीय मंडळाचे सदस्य, मंत्री, मुख्यमंत्री, काही स्टार नेते. ब्रीफिंग रूमच्या व्यासपीठावर निवडणूक अधिकारी आपल्या टीमसह बसलेले होते. त्यांच्या शेजारी गृहमंत्री, संरक्षणमंत्री येऊन बसले होते. नंतर प्रत्येक राज्याचे प्रमुख लवाजम्यासह उपस्थित होते. अगदी गुजरात, महाराष्ट्रापासून जम्मू-काश्मीरपर्यंत. जम्मू-काश्मीरची क्रमांक आला तेव्हा कार्यकर्त्यांनी ‘जहां बलिदान हुए मुखर्जी, वो कश्मीर हमारा है अशी घोषणा केली. आता बाहेर स्क्रीनवर व्हिडिआे आऊटपुट दाखवण्यात आला आणि तेवढ्यात मागे गाणे वाजू लागले, ‘कुछ याद उन्हे भी कर लो जो लौट के घर आएं त्यामुळे गाण्याचे अर्थ काढून कुजबुज सुरू झाली होती. त्यात अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांचे लिपसिंकही दिसले.
अचानक गाण्याला दोन आेळीनंतर बंद करण्यात आले. परिस्थिती सावरण्यात आल्यानंतर भाजपच्या मार्गदर्शक मंडळापैकी राजनाथ यांच्याव्यतिरिक्त समारंभाला काेणीही उपस्थित नव्हते. शंखनादानंतर निवडणूक अधिकारी अविनाश खन्ना यांनी अमित शहा यांची फेरनिवड झाल्याची घोषणा केली. ते १३ वे अध्यक्ष बनले. रस्त्यावर हलकीफुलकी आतषबाजी ऐकू आली. तीही दबक्या आवाजात. काही लोक मागील दाराने निघून जात होते. त्यात पहिला चेहरा होता मनेका गांधी यांचा. कार्यक्रमाला अर्थमंत्री जेटली नव्हते. सेल्फी दाखवणारे मोदीजीही नव्हते. सर्वाधिक चाहते संबित पात्रांसोबत सेल्फी घेताना दिसून आले. अमित शहा यांच्या गेल्या कार्यकाळापेक्षा या वेळी सदस्य संख्या यंदा भलेही वाढलेली असो; परंतु उत्साह, लोकप्रियता दुपटीने घटली. हे आम्ही नव्हे उपस्थित लोक बोलत होते.