फोटो : त्रिवेंद्रम येथून पद्मनाभस्वामी मंदिरातून दर्शन घेऊन येताना भाजप अध्यक्ष अमित शाह
कन्नूर - येथे सोमवारी संघाच्या दोन नेत्यांवर अज्ञातांनी केलेल्या बॉम्ब हल्ल्यात एकाचा मृत्यू झाला आहे. ईकेटी मनोज असे मृताचे नाव आहे. तर जखमी व्यक्तीचे नाव मनोज आहे. राजकीय वादातून ही हत्या झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. पोलिसांनी मात्र अद्याप तपास सुरू असल्याचे म्हटले आहे.
आरएसएसने या घटनेचा निषेध करण्यासाठी मंगळवारी कन्नूर जिल्ह्यात बंद पुकारला होता. विशेष म्हणजे अमित शाह सोमवारीच केरळला पोहोचले होते. पक्षाची ताकद वाढवण्यासाठी या दौ-याचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान तणावाची परिस्थिती पाहता परिसरात मोठ्या प्रमाणावर सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.
माकप कार्यकर्त्यांचा हात
कन्नूर जिल्ह्याच्या थलासेरी उपनगर परिसरातील ही घटना आहे. मनोज आरएसएसमध्ये प्रमुख शारिरीक शिक्षक होते. सकाळी 11 वाजेच्या सुमारास मनोज आणि प्रमोद कारने जात होते. त्यावेळी त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. पोलिसांना अद्याप हल्लेखोरांची ओळख पटलेली नाही. पण या प्रकारामागे माकप कार्यकर्त्यांचा हात असल्याची शंका व्यक्त करण्यात येत आहे. गेल्या आठवड्यात भारतीय मजदूर संघाच्या एका कार्यकर्त्याची हत्या करण्यात आली होती. त्यावेळीही माकप कार्यकर्त्यांवर आरोप लागले होते.