आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमित शहा यांची फेरनिवड निश्चित; आज घोषणा होण्‍याची शक्‍यता

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- दीड वर्षांपुर्वी भारतीय जनता पक्षाची धुरा सांभाळणारे अमित शहा यांची रविवारी पुन्हा तीन वर्षांसाठी अध्यक्षपदी फेरनिवड होत असल्याची माहिती भाजपच्या उच्चस्तरीय सूत्रांनी दिली. १८ महिन्यांच्या काळात शहांना अनेक चांगल्या-वाईट गोष्टींचा सामना करावा लागला. त्यांचा पहिला कार्यकाळ शनिवारी संपला आहे.

अमित शहा यांनी त्यांच्या कार्यकाळात मिस्ड कॉल द्वारा भाजपच्या सदस्यांची नोंदणी असा अभिनव उपक्रम सुरू केला होता. त्यानुसार भाजपला ११ कोटींपेक्षा अधिक मिस्ड कॉल आलेत. शहा यांनी महासंपर्क अभियान ही भाजपची शक्ती असल्याचे सांगितले; परंतु त्याचे विपरीत परिणाम पाहायला मिळाले आहेत. भाजपकडे सध्या तरी अमित शहा यांच्याशिवाय दुसरा पर्याय नाही. रविवारी शहा हे अर्ज सादर करतील. दुसऱ्या कोणी त्‍यांच्‍या विरोधात अर्ज सादर करू नये याचीही भाजप काळजी घेत आहे. रविवारी हजारो महत्त्वाचे नेते, मंत्री भाजप मुख्यालयात असणार आहेत. भाजप प्रणीत राज्यांतील मुख्यमंत्री, सर्व राज्यांतील प्रदेशाध्यक्ष हजर राहणार आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शनिवारी रात्री उशिरा दिल्लीत दाखल झाले आहेत.
राजनाथ सिंह हे देशाचे गृहमंत्री झाल्यानंतर एक व्यक्ती – एक पद या नात्याने त्यांच्याकडील अध्यक्षपद पंतप्रधान नरेंद्र मोदींचे अत्यंत विश्वासू अमित शहांकडे देण्यात आले. आता त्यांना पुढील तीन वर्षांसाठी दुसरा कार्यकाळ दिला जात आहे.

लोकसभा निवडणुकांमध्ये ते उत्तरप्रदेशचे प्रभारी असताना भाजपने तिथे खेचून आणलेल्या विजयाचे संपूर्ण श्रेय शहा यांना देण्यात आले. २०१४ मध्ये महाराष्ट्र, हरियाणा आणि जम्मू-काश्मिर मधील भाजपचा विजय ही शहांच्या जमेची बाजू ठरली. परंतु दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत दारुण पराभवाचे खापर शहांसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही फोडण्यात आले. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजपचा अालेख घसरला. त्यात गुजरात, उत्तरप्रदेश व मध्यप्रदेशही सुटले नाही. बिहार निवडणुकीमध्ये दिल्ली निकालाची पुनरावृत्ती झाल्याने भाजपातील ज्येष्ठ आणि श्रेष्ठांचा एक समुह मोदी-शहा यांच्या विरोधात गेला.त्यामुळे शहा यांची गच्छंती हाेणार याला उधाण आले होते. भाजपच्याच नेत्यांना शहा नको होते. त्यांच्या ठिकाणी राजनाथ किंवा नितीन गडकरींना आणावे यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून प्रयत्न करण्यात आले होते. पण ते ही जबाबदारी स्वीकारण्यास उत्सूक नसल्याने पुन्हा शहांकडेच जबाबदारी सोपवली जात आहे.