आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

39 नव्या ऑडिओ टेप्स जारी, नरेंद्र मोदी पुन्हा अडचणीत येण्याची शक्यता

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली, अहमदाबाद -गुजरातचे मुख्यमंत्री आणि भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांचे विश्वासू सहकारी अमित शहा यांच्या इशार्‍यावरून झालेल्या एका महिला वास्तुविशारदाच्या हेरगिरी प्रकरणाने मंगळवारी नवीन वळण घेतले. gulail.com या संकेतस्थळाने या हेरगिरीच्या 39 नवीन टेप्स जारी केल्या असून गुजरात पोलिसांनी राज्याच्या सीमा ओलांडून बंगळुरूमध्येही त्या तरुणीची हेरगिरी केल्याचा दावा या संकेतस्थळाने केला आहे.
त्या महिला वास्तुविशारदाचे मोबाइल संभाषण चोरून ऐकण्यासाठी खासगी मोबाइल कंपन्यांच्या अधिकार्‍यांनीही गुजरात पोलिसांशी हात मिळवणी केली होती. गुजरातच्या गृहसचिवांची परवानगी न घेताच त्या तरुणीचा फोन टॅप करण्यात आल्याचे पुरावेही या संकेतस्थळाने दिले आहेत. नव्या ऑडिओ टेप्समध्ये गुजरातमधील आयपीएस अधिकारी जी. एल. सिंघल आणि अन्य एक आयपीएस अधिकारी ए. के. शर्मा यांच्या संभाषणाचा समावेश आहे. सिंघल हे इशरत जहाँ बनावट चकमक प्रकरणात आरोपी आहेत तर त्या वेळी गुप्तचर विभागाच्या महानिरीक्षकपदावर असलेले शर्मा सध्या अहमदाबादमध्ये गुन्हे शाखेचे सहआयुक्त आहेत.
कर्नाटकातही पिच्छा : गुलैलने हस्तगत केलेल्या मोबाइल संभाषणाच्या 39 नव्या ऑडिओ टेप्सने या प्रकरणात धक्कादायक खुलासे केले आहेत. 2009 मध्ये गुजरातच्या गृह खात्याने कर्नाटक सरकारशी संपर्क साधून त्या महिला वास्तुविशारदाचे मोबाइल संभाषण ऐकू देण्याची परवानगी मागितली होती.
महिलेच्या खासगी जीवनात ‘साहेबां’ना खूपच रस
त्या महिला वास्तुविशारदाचे खासगी जीवन, तिच्या हालचाली आणि तिच्या संबंधांत ‘साहेबां’नी खूपच रस घेतला होता, असा दावा गुलैलने केला आहे.
15 नोव्हेंबर रोजी कोब्रापोस्टने पहिल्यांदा हे प्रकरण चव्हाट्यावर आणले होते तेव्हा एका ‘साहेबां’च्या सांगण्यावरून अमित शहांनी त्या महिलेच्या हेरगिरीचे आदेश दिले होते. ते साहेब मुख्यमंत्री नरेंद्र मोदीच असल्याचा आरोप आहे.