आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

३७० जागा येऊ द्या, ३७० वे कलम रद्द!, पत्रकार परिषदेत अमित शहांचे वक्तव्य

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - केंद्रात दोनतृतीयांश बहुमत येऊ द्या, मग पाहा राम मंदिर आणि जम्मू- काश्मीरमधील ३७०वे कलम रद्द करण्यासारखे इतर महत्त्वाचे मुद्दे सहज सुटतील, असा विश्वास भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केला. केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला मंगळवारी एक वर्ष पूर्ण झाले. या निमित्ताने निवडणूक काळात भारतीय जनता पक्षाने दिलेल्या आश्वासनांची पूर्ती करण्यात सरकारला कितपत यश आले, या पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर शहा बोलत होते.

आजही अनेक महत्त्वाचे मुद्दे आहेत. मात्र, यांची सोडवणूक करण्यासाठी संसदेत भाजपला ३७० जागा हव्या आहेत. एवढ्या जागा आल्या तर ३७० वे कलम आिण इतर मुद्द्यांवर सहज मार्ग निघेल, असे शहा म्हणाले. गेल्या ३० वर्षांत प्रथमच एखाद्या पक्षाला केंद्रात बहुमत मिळाले आहे. या निवडणुकीपूर्वी लोकांना पंतप्रधानांवर आणि पंतप्रधानांचा मंत्रिमंडळावरच विश्वास नव्हता. मोदी सरकारने अविश्वासाचे हे वातावरण संपवले आणि विकासाचा मार्ग स्वीकारून लोकांमध्ये विश्वास संपादन केला. आज लोक केंद्र सरकारकडे अत्यंत आशेने आणि विश्वासाने पाहत आहेत. केंद्राच्या निर्णयांबद्दलही त्यांना आता शंका राहिलेली नाही, असे शहा यांनी नमूद केले.

भ्रष्टाचारावरही भाष्य
दहा वर्षांत सबंध देश भ्रष्टाचारात अडकला होता. धोरणच राहिले नव्हते. आज ही संभ्रमावस्था दूर झाली आहे. या दुष्टचक्रातून देशाला बाहेर काढण्यात मोदी सरकारला यश आल्याचा दावा शहा यांनी केला. भ्रष्टाचार आणि एकामागे एक उघडकीस आलेल्या घोटाळ्यांमुळे देशाची प्रतिमा जागतिक पातळीवर मलिन झाली होती. भाजप सरकारच्या काळात भ्रष्टाचाराचा एकही डाग देशावर पडला नाही. हेच केंद्राचे खरे यश असल्याचे शहा म्हणाले.

भारताकडून खूप आशा...
नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रात सरकार स्थापन झाल्यानंतर जगाला भारताकडून खूप आशा आहेत. त्या दिशेने भाजप वाटचाल करत आहे. वर्षभरापूर्वी या देशाची अर्थव्यवस्था अक्षरश: खिळखिळी झाली होती. आज वर्षानंतर अर्थव्यवस्थेची गाडी रुळांवर आली असल्याचा दावाही शहा यांनी केला. आगामी काळात विकासाचे नवे पर्व या देशात दिसून येईल, असेही ते म्हणाले. केंद्राच्या इतर योजनांचेही त्यांनी या वेळी गुणगान केले.

हे आहे संवेदनशील मुद्दे
भाजपच्या अजेंड्यावर सुरुवातीपासूनच असलेले जे संवेदनशील मुद्दे आहेत त्यात अयोध्येत राम मंदिराची उभारणी, जम्मू-काश्मीरमध्ये लागू असलेले ३७० कलम रद्द करणे आणि देशात समान नागरी कायदा लागू करणे यांचा समावेश आहे. वर्षभरात या तिन्ही मुद्द्यांवर भाजपने ठोस भूमिका मांडलेली नाही. यामुळे हे सर्वच मुद्दे भाजपने अडगळीला टाकल्याचा आरोप होत आहे.

काळा पैसा
यूपीए सरकारने काळ्या पैशाला अटकाव करण्यासाठी काय केले? असा प्रश्न उपस्थित करून शहा यांनी मोदी सरकारने पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत विशेष तपास पथक नेमल्याचे सांगितले. नियोजन आयोग बरखास्त करून नीती आयोगाची केलेली स्थापना व इतर अनेक मुद्द्यांना शहा यांनी पत्रकार परिषदेत स्पर्श केला.

गरिबांसाठी सारे काही
काँग्रेस पक्ष जेव्हा जेव्हा सत्तेत आला त्या त्या वेळी देशातील सकल उत्पादनाचा दर घसरला आहे. याउलट भाजप सत्तेत आल्यानंतर तो कायम वाढत गेला असल्याचा दावा शहा यांनी केला.