आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Amitabh, Amir Show Will Be Swachh Bharat Central Government Wish

अमिताभ, आमिरचे दोन शो 'स्वच्छ भारत'साठी व्हावेत - केंद्र सरकारची इच्छा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या "स्वच्छ भारत अभियाना'ला दोन प्रसिद्ध ब्रँड अ‍ॅम्बेसेडर मिळण्याची शक्यता आहे. अमिताभ बच्चन यांचा "कौन बनेगा करोडपती' आणि आमिर खानचा "सत्यमेव जयते' या दोन्ही प्रसिद्ध दूरचित्रवाणी कार्यक्रमांत या अभियानाला समर्पित दोन विशेष भाग प्रसारित केले जावेत, अशी इच्छा सरकारने व्यक्त केली आहे. केंद्रीय पाणीपुरवठा, स्वच्छता मंत्रालयाच्या सचिव विजयलक्ष्मी जोशी यांनी याबाबत माहिती व प्रसारण मंत्रालयाला पत्र लिहिले आहे. दैनिक "भास्कर' समूहाकडे या पत्राची प्रत उपलब्ध आहे. १५ ऑक्टोबरपर्यंत या अभियानाच्या प्रसारणाशी संबंधित आराखडा सादर करण्याची सूचना या पत्रात करण्यात आली आहे. कौन बनेगा करोडपती, सत्यमेव जयतेसारख्या अन्य लोकप्रिय टीव्ही मालिकांच्या मदतीने पंतप्रधानांची ही योजना घरोघरी पोहोचवली जाऊ शकते, असे सचिवांनी म्हटले आहे. अन्य मालिकांमध्ये कॉमेडी नाइट्स विथ कपिल, तारक मेहता का उलटा चश्मा, जिंदगी या मालिकांचा समावेश या अभियानासाठी करता येईल.
स्वच्छतेबाबत टॉक शोचा सल्ला : प्रमुख वाहिन्यांवरील प्रसिद्ध निवेदकांच्या माध्यमातून स्वच्छतेबाबत टॉक शो आयोजित केले जावेत तसेच मीडिया हाऊसच्या मदतीने यावर सेमिनारचेही आयोजन केले जावेत, असा सल्ला पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्रालयाने दिला आहे. उघड्यावर शौचास गेल्याने उद्भवणा-या समस्या, शौचालयाचा वापर इत्यादींसंबंधी जनजागृती करण्यासाठी वाहिन्यांनी विशेष कार्यक्रमांचे आयोजन करावे, असेही मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे. अशाप्रकारच्या कार्यक्रमांच्या प्रसारणासाठी वाहिन्या तसेच निर्मात्यांवर कोणत्याही प्रकारचे दबाव टाकले जाणार नसून आम्ही फक्त सल्ला देत असल्याचे माहिती आणि प्रसारण मंत्रालयातील एका वरिष्ठ अधिका-याने सांगितले आहे. यावर अंमलबजावणी करावी की नाही, हा संबंधीत वाहिनी आणि निर्मात्यांचा निर्णय असेल. जर त्यांना वाटले की अशाप्रकारचे चांगले कार्यक्रम तयार होऊ शकतात तर त्यांनी यावर नक्की अंमलबजावणी करायला हवी, असे मंत्रायाकडून सांगण्यात आले आहे.