(फोटो : राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्याकडून पुरस्कार स्वीकारताना संगणक शास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर)
नवी दिल्ली - भारतीय चित्रपटसृष्टीत मोलाचे योगदान देणारे महानायक
अमिताभ बच्चन, युवराज करीम आगा खान यांना बुधवारी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते देशाचा दुसरा सर्वोच्च नागरी सन्मान पद्मविभूषण, तर प्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर यांना पद्मभूषणने सन्मानित करण्यात आले. संगीतकार तथा गायक रवींद्र जैन आणि कला क्षेत्रातून शेखर सेन यांना पद्मश्रीने गौरवण्यात आले.
राष्ट्रपती भवनाच्या दरबार हॉलमध्ये बुधवारी ५ पद्मविभूषण, ७ पद्मभूषण आणि ३८ पद्मश्री या पुरस्कारांचे वितरण राष्ट्रपतींच्या हस्ते करण्यात आले. उपराष्ट्रपती हमीद अन्सारी, पंतप्रधान
नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह, अर्थमंत्री अरुण जेटली आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद
केजरीवाल यांच्यासह मान्यवर व्यक्ती या वेळी उपस्थित होत्या. देशातील एकूण १०४ मान्यवरांना विविध क्षेत्रांतील उल्लेखनीय योगदानासाठी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कार घोषित झाले होते. पुरस्कार वितरणाच्या दुसर्या टप्प्यात बुधवारी पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री असे एकूण ५० पुरस्कार प्रदान करण्यात आले.
महानायकाचा महागौरव
अमिताभ बच्चन यांनी १९६९ मधे ‘सात हिंदुस्तानी’ चित्रपटापासून हिंदी चित्रपटसृष्टीत अभिनेता म्हणून पदार्पण केले. चार दशकांच्या चित्रपटसृष्टीतील कार्यकाळात त्यांनी जवळपास २०० चित्रपटांमध्ये अभिनय केला. ‘कौन बनेगा करोडपती’ या कार्यक्रमातून त्यांनी देशभरातील जनतेच्या मनावर गारूड घातले. त्याचबरोबर त्यांनी ‘स्वच्छ भारत अभियान’, दमा रोग निवारण कार्यक्रमाचे ब्रँड अॅम्बेसेडर, मुलींच्या आरोग्य व शिक्षणासाठी जगभर राबवण्यात आलेल्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या जागरूकता कार्यक्रमाचे अॅम्बेसेडर म्हणून कार्य केले आहे. १९९९ मधे बीबीसी ऑनलाइन पोलद्वारे घेण्यात आलेल्या पाहणीनुसार अमिताभ बच्चन यांना ‘शतकातील महानायक’ हा सन्मान प्राप्त झाला होता.
प्रकृती अस्वास्थ्यामुळे दिलीप कुमार अनुपस्थित
पद्म पुरस्कार २०१५ साठी महाराष्ट्रातून २ मान्यवरांची पद्मविभूषण, १ पद्मभूषण, तर ६ मान्यवरांची पद्मश्री पुरस्कारांसाठी निवड झाली होती. त्यापैकी पहिल्या टप्प्यात २ पद्मश्री पुरस्कार महाराष्ट्रातील मान्यवरांना प्रदान करण्यात आले, तर दुसर्या टप्प्यात १ पद्मविभूषण, १ पद्मभूषण आणि २ मान्यवरांचा पद्मश्री पुरस्काराने सन्मान करण्यात आला. प्रसिद्ध अभिनेते दिलीप कुमार हे प्रकृती अस्वास्थ्यामुळे कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाहीत. त्यांना पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे.
संगणकीय योगदानाची दखल
डॉ. विजय भटकर हे नामवंत संगणकतज्ज्ञ म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांची ख्याती आंतरराष्ट्रीय स्तरावर आहे. देशाच्या सुपरक़ॉम्प्युटिंग क्षेत्रातील अग्रणी शास्त्रज्ञ म्हणून त्यांचे योगदान अतुलनीय आहे. भारतातील २२ राजभाषांसाठी १० लिप्या तयार करून संगणकीय भाषांमधील अडचण दूर करण्यासाठी त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे. महाराष्ट्र आणि गोवा राज्यांच्या ई-गव्हर्नन्स समितीचे अध्यक्ष म्हणून त्यांनी कार्य केले आहे. डॉ. भटकर यांनी विज्ञान-तंत्रज्ञान क्षेत्रातील योगदानाच्या माध्यमातून केलेल्या देशसेवेसाठी पद्मभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला.
संगीत क्षेत्रातील कामगिरी
रवींद्र जैन यांचा संगीतकार व गायक म्हणून लौ
किक आहे. त्यांनी २०० हून अधिक चित्रपटांना संगीत दिले आहे. दूरदर्शनवरील ‘रामायण’ मालिकेतील संगीत, गीतरचना व गायनामुळे त्यांनी भारतीयांच्या मनावर अधिराज्य केले. शेखर सेन हे प्रतिष्ठित गायक, संगीतकार, गीतकार आणि अभिनेते म्हणून प्रसिद्ध आहेत.