आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लष्कराकडे युद्धासाठी 10 दिवसांपुरताच दारूगोळा, इशारा देऊनही काहीच उपाययोजना नाही

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- भारतीय लष्कराकडे अत्यंत कमी प्रमाणात दारूगोळा शिल्लक असल्याचा इशारा शुक्रवारी नियंत्रक व महालेखापालने (कॅग) दिला. आज युद्ध करण्याची वेळ आलीच तर लष्कराच्या भात्यातील दारूगोळा व शस्त्रे दहा दिवसही चालणार नाहीत, असे कॅगने म्हटले आहे. ७० टक्के रणगाडे आणि ४४ टक्के तोफगोळ्यांचा साठा केवळ दहाच दिवस पुरेल, असेही अहवालात नमूद आहे. वास्तविक नियमानुसार कोणत्याही क्षणी युद्ध पेटले तर लष्कराकडे किमान ४० दिवस पुरेल एवढा दारूगोळा असला पाहिजे. मे २०१५मध्ये कॅगने भारतीय लष्कराच्या भात्यातील कमी होत चाललेल्या दारूगोळ्याबाबत सविस्तर अहवाल दिला होता. सध्या भारतीय सीमेवर चीन व पाकिस्तानचे आव्हान पाहता हा अहवाल धोक्याची घंटी ठरणारा आहे.

कॅगने शुक्रवारी संसदेत हा अहवाल सादर केला. यात म्हटले आहे की, भारतीय लष्कर वापरत असलेली विविध शस्त्रे व दारूगोळ्यांचा ८० टक्के साठा ४० दिवस पुरेल इतकाही सक्षम नाही. याबाबत आपण पहिला अहवाल देऊन तीन वर्षे उलटली तरी आवश्यक दारूगोळ्याच्या साठ्याबाबत काहीही सुधारणा झाली नसल्याचे कॅगने म्हटले आहे.

लष्करातील सज्जतेचा अहवालात अत्यंत बारकाईने अभ्यास...
 
लष्कराबाबत पूर्वीच दिला होता अहवाल
कॅगने यापूर्वी २००८-०९पासून २०१२-१३पर्यंत याबाबत ऑडिट केले होते. यात १७० प्रकारच्या शस्त्रांचा समावेश होता. जानेवारी २०१७मध्ये कॅगने फॉलोअप ऑडिट केले. यात एप्रिल २०१३पासून सप्टेंबर २०१६पर्यंतची आकडेवारी होती.

तोफांचे फ्यूज अजूनही ८३ टक्के कमी
लष्कराकडे तोफांमध्ये वापरले जाणारे फ्यूज अत्यंत कमी आहेत. कोणतीही पर्यायी व्यवस्था न करता लष्कराने इलेक्ट्रॉनिक्स फ्यूज वापरण्याचा निर्णय घेतला होता. २०१५मध्ये हे ८९ टक्के फ्यूज कमी होते. तीन वर्षांनंतर आजही ८३% फ्यूज कमी आहेत.

प्रशिक्षणातच संपेल ८८% दारूगोळा
युद्धकाळासाठी नव्हे, तर भारतीय जवानांना प्रशिक्षण द्यावयाचे म्हटले तरी पाच दिवसही सध्याचा दारूगोळा पुरणार नाही. २०१५मध्ये असा ९१% दारूगोळा पाच दिवसांपुरताही नव्हता. आता ते प्रमाण ८८% टक्के आहे. म्हणजेच फार फरक पडलेला नाही. 
बातम्या आणखी आहेत...