आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केजरीवाल, अमरिंदर यांची ट्विटरवर शाब्दिक चकमक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष अमरिंदरसिंग यांच्यात सोमवारी ट्विटरवर शाब्दिक चकमक उडाली. अमरिंदरसिंग हे आपल्या प्रचारासाठी अमली पदार्थांच्या व्यवसायातून येणारा पैसा (ड्रग मनी) वापरत असल्याचा आरोप केजरीवाल यांनी केल्यानंतर हा प्रकार घडला. पंजाब विधानसभेची निवडणूक जवळ येत असताना दोन्ही नेत्यांमधील शाब्दिक युद्धाला आता जोर चढला आहे.

केजरीवाल यांनी ट्विटरवरून अमरिंदरसिंग यांच्याविरोधात शाब्दिक युद्ध छेडले. त्यांनी ट्विट केले की, ‘सर, तुम्ही (विक्रमसिंग) मजिठिया यांचा ड्रग मनी तुमच्या प्रचारात वापरत आहात, असे पंजाबमधील लोक म्हणत आहेत. हे खरे आहे का? तीन वर्षांपूर्वी तुम्हीच त्यांना सीबीआय चौकशीपासून वाचवले होते.’ मजिठिया हे पंजाबचे महसूलमंत्री आहेत.

अमरिंदर यांनी या टि्वटला तत्काळ प्रत्युत्तर देताना केजरीवाल यांच्यावर हल्ला चढवला. त्यांनी ट्विट केले की, ‘ज्या गोष्टी अस्तित्वातच नाहीत त्याबाबत तुम्ही बोलत आहात. तुम्ही भरदिवसा तारे मोजत आहात.’ पंजाबमध्ये सत्ताधारी अकाली दल आणि काँग्रेस यांच्यात जवळीक आहे, असा आरोप केजरीवाल सातत्याने करत आहेत. अमरिंदरसिंग हे दोन्ही पक्षांचे ‘मुख्यमंत्रिपदाचे संयुक्त उमेदवार’ आहेत, अशी टिप्पणी केजरीवाल यांनी यापूर्वी केली होती.
अमृतसर विकास ट्रस्टच्या जमीन घोटाळा प्रकरणातील कथित भूमिकेबद्दल पंजाब दक्षता विभागाने अमरिंदरसिंग यांना क्लीन चिट दिली होती. त्याचा उल्लेख करून केजरीवाल यांनी रविवारी ट्विट केले होते. त्यात म्हटले होते की, ‘बादल यांनी निवडणुकीच्या काही महिनेच आधी तुमच्या विरोधातील भ्रष्टाचाराची प्रकरणे बंद केली आहेत. तुमच्यात काय डील झाली? असे पंजाबचे लोक विचारत आहेत.’ त्याला प्रत्युत्तर देताना अमरिंदरसिंग यांनी म्हटले होते की, पंजाबमध्ये काम करण्याआधी तुम्ही तुमचे स्वत:चे घर आधी सांभाळा.
बातम्या आणखी आहेत...