आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Analysis Of Exit Polls For Jammu Kashmir And Jharkhand Election

ANALYSIS : एक्झिट पोलचे निकाल खरे ठरल्यास अशी असतील राजकीय समीकरणे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - जम्मू काश्मीर आणि झारखंडमध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांसाठीची मतदान प्रक्रिया संपल्यानंतर विविध वाहिन्यांचे एक्झिट पोल समोर आले आहेत. त्यापैकी बहुतांश वाहिन्यांनी झारखंडमध्ये भाजपचे सरकार स्थापन होण्याचे तर काश्मीरमध्ये त्रिशंकु स्थिती निर्माण होण्याचे अंदाज वर्तवले आहेत. जर हे अंदाज खरे ठरले तर त्याचे काय राजकीय परिणाम होऊ शकतात, याचा घेतलेला हा आढावा.

काश्मीर : काँग्रेस आणि पीडीपी एकत्र येण्याची शक्यता
एक्झिट पोलमध्ये जम्मू-काश्मीरमध्ये सर्वात मोठा पक्ष म्हणून पीडीपीला मते मिळाल्यास पीडीपीला सत्ता स्थापनेची सर्वाधिक संधी असेल. मात्र, त्यासाठी पीडीपीला दुस-या पक्षाच्या सहकार्याची मदतही लागेल. राजकारणात वेगळे मार्ग निवडलेल्या काँग्रेस आणि नॅशनल कॉ़न्फरन्स पुन्हा एकत्र आले तरी त्यांना आकड्यांची मोडतोड करणे शक्य होणार नाही. तर भाजप नेते अरुण जेटली यांनी कोणत्याही प्रादेशिक पक्षाबरोबर हातमिळवणी करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र त्याचवेळी कोणी देशाहितासाठी सोबत येऊ इच्छित असेल तर त्यांना सोबत घेऊन चालणार असल्याचेही ते म्हणाले आहेत. स्थानिक पक्ष भाजपबरोबर जाण्याची शक्यता कमीच आहे. राज्यातील कट्‌टर राजकीय विरोधक पीडीपी आणि नॅशनल कॉन्फरन्स एकत्र येण्याच्या शक्यताही अत्यंत नाममात्र आहेत. अशा स्थितीत काँग्रेस आणि पीडीपी एकत्र येण्याच्या सर्वाधिक शक्यता आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सैफुद्दीन सोज यांनी नॅशनल कॉन्फरन्सशिवाय कोणत्याही पक्षाबरोबर कायमस्वरुपी संबंध तोडले नसल्याचे वक्तव्य केल्याने या शक्यतांना अधिक बळ मिळत आहे.

जम्मू-काश्मीरमध्ये प्रथमच भाजप विरोधी पक्षाच्या भूमिकेत
मुस्लिम बहुल लोकसंख्या असलेल्या या राज्यात भाजपला 25 ते 30 जागा मिळण्याचा अंदाज आहे. हिंदु बहुल भागांमध्ये मिळणा-या जोरदार यशाच्या जोरावर भाजप ही बाजी मारू शकते. पीडीपीनंतर सर्वात मोठा दुसरा पक्ष म्हणून भाजप समोर येणार असल्याचे अंदाज सर्वच एक्झिट पोलमधून व्यक्त करण्यात येत आहेत. त्यामुळे जम्मू-काश्मीरमध्ये भाजप प्रथमच विरोधी पक्षाच्या भूमिकेत दिसून येईल. राजकीय दृष्ट्या अत्यंत संवेदनशील असणा-या या राज्यात भाजपला मिळालेली ही संधी राष्ट्रीय दृष्ट्या मोठी भूमिका ठरवणारी असू शकते.

दिल्ली निवडणुकांसाठी लाभदायक
हे एक्झिट पोल खरे ठरले तर देशात अजूनही मोदी लाट कायम असल्याचे सिद्ध होईल. मोदींबाबत जनतेमध्ये क्रेझ आहे आणि त्याचा परिणाम लोकसभा आणि त्यानंतरच्या काही राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकांत पाहायला मिळाला आहे. त्यामुळे लवकरच होणा-या दिल्ली विधानसभा निवडणुकांतही भाजपला मोदींच्या लोकप्रियतेचा फायदा मिळण्याची शक्यता आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत अवघ्या काही जागांसाठी भाजपला सत्तेपासून दूर राहावे लागले होते. त्यामुळे यावेळी भाजपसाठी ही स्थिती सकारात्मक असू शकते.

नितीश लालूंचा परीणाम नाही, राजदचे वजन घटणार
झारखंडच्या निवडणुकीतील स्थिती पाहता जदयू आणि राजदचे एकत्र येणे, दोघांसाठीही फायद्याचे ठरत नसल्याचे चित्र आहे. राजकीय तज्ज्ञांना असे वाटत होते की, लालू आणि नितीश यांची जोडी गेमचेंजर ठरणार पण एक्झिट पोलनंतर हे दोघे एकत्रितपणे मतदारांना आकर्षित करण्यात अपयशी ठरल्याचे समोर येत आहे. त्यामुळे आगामी वर्षात बिहारमध्ये होणा-या विधानसभा निवडणुकीत राजदची राजकीय उंची आणखी कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आघाडीनंतर लालू जदयू सरकारवर चांगलीच नजर ठेवत आहेत. पण अशीच स्थिती राहिल्यास हा प्रभावही कमी होण्याची शक्यता आहे.

नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेसला फटका
एक्झिट पोलच्या अंदाजांनुसार जम्मू काश्मीरच्या राजकारणातून नॅशनल कॉन्फरन्सचा प्रभाव कमी होणार आहे. तर लोकसभा निवडणुकांनंतर हरियाणा आणि महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत मोठ्या पराभवानंतर काँग्रेसची स्थिती आणखी वाईट होण्याची शक्यता आहे. त्यात अमित शाह अध्यक्ष बनल्यानंतर भाजपने हरियाणा आणि महाराष्ट्राच्या निवडणुकांत यश मिळवले. त्यात आता झारखंडमध्येही सत्ता आळी तर मोदींचे मार्गदर्शन आणि अमित शाह यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब होणार आहे.