आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Andhra Pradesh Cm Kirankumar Reddy Resign As A Cm & Leave A Congress Party

आंध्रचे मुख्यमंत्री किरणकुमार रेड्डींचा राजीनामा, काँग्रेस पक्षालाही सोडचिठ्ठी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री किरणकुमार रेड्डी यांनी आज आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देत काँग्रेस पक्षालाही रामराम ठोकला. रेड्डी यांनी आमदारकीचाही राजीनामा दिला असून, ते नविन पक्ष स्थापण्याच्या तयारीत असल्याचे सांगण्यात येत आहे. आंध्र प्रदेशचे विभाजन केल्यामुळे सीमांध्र व रायलसीमा भागातील अनेक खासदार, आमदार किरणकुमार रेड्डी यांच्या साथीला जाण्याची शक्यता आहे.
सीमांध्रच्या नेत्यांकडून तीव्र विरोध होत असतानाही आंध्र प्रदेश विभाजनाचे विधेयक मंगळवारी लोकसभेत मंजूर करण्यात आले. त्यामुळे तेलंगण राज्यनिर्मितीचे कट्टर विरोधक असलेले आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. किरणकुमार रेड्डी हे राज्य विभाजनाच्या निषेधार्थ काँग्रेसमधून बाहेर पडून नवीन राजकीय पक्ष स्थापणार असल्याच्या चर्चेने जोर मागील काही दिवसापासून धरला होता. सीमांध्रच्या नेत्यांनी तेलंगण निर्मितीला तीव्र विरोध करूनही काँग्रेस हायकमांडने त्याची दखल न घेता पुढे जाण्याचा निर्णय घेतल्याने रेड्डी यांनी राजीनामा घेण्याचा निर्णय घेतला आहे.
रेड्डी यांच्यामागे सीमांध्र व रायलसीमा भागातील किमान 50 आमदार व 12-13 खासदार असल्याचे सांगितले जात आहे. कोणत्याही परिस्थितीत केंद्र सरकार तेलंगण निर्मिती करणारच, हे लक्षात आल्यामुळे आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. किरणकुमार रेड्डी यांनी रविवारी रात्रीपासूनच सीमांध्र व रॉयलसीमा भागातील काँग्रेस मंत्री, आमदार, विधान परिषद सदस्य आणि खासदारांशी व्यापक चर्चा सुरू केली होती. या बैठकीनंतर रेड्डी यांच्यामागे ठाम उभे राहण्याचा या भागातील नेत्यांनी घेतल्यानंतर त्यांनी राजीनामा देऊन नवीन पक्ष स्थापण्याचा निर्णय घेतला असल्याचे काँग्रेसमधील नेत्यांनी म्हटले आहे.
मागील आठवड्यात अभूतपूर्व गोंधळात तेलंगण निर्मितीचे विधेयक लोकसभेत मांडण्यात आले होते. त्यावेळी झालेल्या गोंधळानंतर काँग्रेस पक्षाने आपल्या पक्षातील सीमांध्रमधील 18 पैकी 15 खासदार निलंबित केले होते. आंध्र प्रदेशचे विभाजनास सत्ताधारी कॉंग्रेससह सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी तीव्र विरोध केला आहे. तेलगू देसम पक्ष आणि जगनमोहन रेड्डी यांच्या वायएसआर कॉंग्रेस पक्षानेही या विधेयकाचा जोरदार विरोध केला आहे. मात्र, यूपीए सरकारने कोणाचेही ऐकून न घेता, अखेर एक घाव दोन तुकडे केले. त्यामुळेच भारतीय लोकशाहीतील हा काळा दिवस असल्याचे मत जगनमोहन रेड्डी यांच्यासह सीमांध्रमधील नेत्यांनी व्यक्त केले आहे. यूपीए सरकारचा हा निर्णय लोकशाहीसाठी घातक असल्याचे सांगत जगन यांनी सरकारच्या या निर्णयाविरोधात आज (बुधवारी) आंध्र प्रदेश 'बंद'ची हाक दिली आहे. त्याला सीमांध्र भागात मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे.

पुढे वाचा, किरणकुमार रेड्डींचा राजीनामा ही काँग्रेसचीच खेळी....