आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिल्ली असुरक्षित : ममता बॅनर्जी भडकल्‍या, दौरा अर्धवट सोडून परतल्‍या

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली/ कोलकाता - एसएफआय कार्यकर्त्यांनी मंगळवारी पश्चिम बंगालचे अर्थमंत्री अमित मित्रा यांचे कपडे फाडल्याच्या घटनेनंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी तीन दिवसांचा दौरा अर्धवट सोडला. त्यांनी पंतप्रधान मनमोहन सिंग व अर्थमंत्री पी. चिदंबरम यांची भेटही रद्द केली. दिल्ली सुरक्षित ठिकाण राहिले नाही, अशी उद्विग्न प्रतिक्रिया देत कोलकात्याची वाट धरली.

अर्थमंत्री पी. चिदंबरम यांच्यासोबत माझी बैठक होती. मात्र, कालच्या घटनेमुळे मी अस्वस्थ झाल्याने कोलकात्याला परतत आहे. मी पुन्हा येथे येईन, मात्र दिल्ली सुरक्षित ठिकाण राहिले नाही, असे ममता बॅनर्जी म्हणाल्या. ममता आणि मित्रा मंगळवारी नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष माँटेकसिंग अहलुवालिया यांच्याकडे जात होत्या. त्या वेळी नियोजन भवनबाहेर एसएफआय कार्यकर्त्यांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. यानंतर ममता यांनी पंतप्रधान व राज्यपाल एम. के. नारायणन यांच्याशी संवाद साधला. आपण पंतप्रधानांना भेट घेऊ शकत नसल्याचे सांगितले, त्यावर त्यांनी कालच्या प्रकाराबद्दल खेद व्यक्त केल्याचे ममता म्हणाल्या. दिल्लीत अशा प्रसंगाला त्यांना पहिल्यांदाच सामोरे जावे लागले.

दिल्ली पोलिस अपयशी : तृणमूलचा आरोप
योजना भवनाबाहेर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी व अर्थमंत्री अमित मित्रा यांच्याविरोधात आक्रमक आंदोलन करणा-या एसएफआय कार्यकर्त्यांचा ममता यांना ठार मारण्याचा उद्देश होता, असा आरोप तृणमूल कॉँग्रेसने केला आहे. एसएफआय कार्यकर्ते लोखंडी रॉडने मुख्यमंत्र्यांना मारण्याचा प्रयत्न करत होते. फिरहाद हकीम यांनी त्यांना थोपवण्याचा प्रयत्न केला नाही. ममता यांना त्या वेळी गंभीर इजा झाली असती, असे पंचायत राजमंत्री सुब्रता मुखर्जी म्हणाले. ममतांना सुरक्षा पुरवण्यात दिल्ली पोलिस कमी पडल्याचा आरोप त्यांनी केला.

हिंसाचार थांबवण्याचे माकपचे आवाहन
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि त्या राज्याचे अर्थमंत्री अमित मित्रा यांच्याविरुद्ध एसएफआय कार्यकर्त्यांनी केलेल्या वर्तनाचा निषेध करत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने बंगालमधील हिंसाचार थांबवण्याचे आवाहन केले आहे. माकपच्या पॉलिट ब्युरोची बुधवारी बैठक झाली. त्यात कालच्या घटनेमागच्या कारणांचा शोध घेण्याचे ठरले. पश्चिम बंगालमध्ये माकपच्या कार्यालयांची तोडफोड करण्यात आली व कार्यकर्त्यांवर हल्ले करण्यात आल्याचा आरोप माकपने केला आहे.

माकपकडून 55 हजार बळी
पश्चिम बंगालमध्ये डाव्या पक्षांच्या कार्यकर्त्यांना लक्ष्य केले जात असल्याच्या वृत्ताचा त्यांनी इन्कार केला आहे. तृणमूलचे कार्यकर्ते शांत आहेत. माकपच्या कार्यकर्त्यांकडून हिंसाचार केला जात आहे. माकपने आतापर्यंत 55 हजार लोकांना मारल्याचा आरोप त्यांनी केला. माकप सरकारच्या कार्यकाळात आमच्या सरकारपेक्षा शंभरपट अधिक चकमकी झाल्या. गेल्या वर्षभरात राज्यात दहा राजकीय चकमकी उडाल्या. त्यामध्ये तृणमूलच्या सहा कार्यकर्त्यांचा मृत्यू झाला, असे ममता म्हणाल्या.