आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानवी दिल्ली- अमरनाथ येथील गुहेत दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिलेल्या नसल्याबद्दल व गुहेच्या आजूबाजूची अवस्थाही मोडकळीस आल्यावरून अमरनाथ श्राइन बोर्डाला राष्ट्रीय हरित लवादाने (एनजीटी) फटकारले आहे. एनजीटीने सर्वाेच्च न्यायालयाने २०१२ मध्ये दिलेल्या निर्देशांचे पालन न केल्याबद्दल नाराजीही व्यक्त केली आहे. इतक्या वर्षांत या संदर्भात कोणते निर्णय घेतले, अशी विचारणा लवादाने केली आहे. हिमस्खलन रोखण्यासाठी व अमरनाथ गुहेचे मूळ स्वरूप कायम ठेवण्यासाठी गुहेच्या आसपास सायलेन्स झोन घोषित करण्यावर व गुहेत भाविकांना नारळ व प्रसाद घेऊन जाण्यास बंदी घालण्याची सूचना केली आहे. पुढील सुनावणी ५ डिसेंबर रोजी होत आहे.
एनजीटीचे मुख्य न्यायमूर्ती (निवृत्त) स्वतंत्रकुमार यांच्या अध्यक्षतेखालील पीठाने म्हटले, तुम्ही मंदिराच्या मार्गातील रस्त्यावर आजूबाजूला दुकाने उघडण्याची परवानगी दिलीत. येथे स्वच्छतागृहांची योग्य व्यवस्था करण्यात आलेली नाही. ही असुविधा महिलांच्या दृष्टीने किती लाजिरवाणी बाब आहे, याची तुम्हाला कल्पना आहे का? तुम्ही भाविकांना कोणत्या प्रकारच्या मूलभूत सुविधा देत आहात? मंदिराचे पावित्र्य राखले गेले पाहिजे. पण तुम्ही भाविकांना शिवलिंगाचे दर्शन घेण्यापासून रोखूही शकत नाही. तत्पूर्वी एनजीटीने सोमवारी जम्मू-काश्मीरमध्ये माता वैष्णोदेवी मंदिरात दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची संख्या ५० हजारांवर आणली आहे.
विशेष समितीची स्थापना, योजनेची आखणी
एनजीटीने पर्यावरण व वन मंत्रालयातील अतिरिक्त सचिवांच्या अध्यक्षतेखाली तज्ज्ञांची एक समिती स्थापन केली आहे. सर्व पाहणी केल्यानंतर यात्रेकरूंना देण्यात येणाऱ्या सुविधांवर ही समिती योजना सादर करेल. ही समिती योग्य रस्ते, गुहेच्या आजूबाजूला सायलेन्स झोन घोषित करणे, मंदिर परिसरात स्वच्छता राखणे व इको -फ्रेंडली शौचालये उभारणे यावर प्रस्ताव सादर करेल. ज्यायोगे यात्रेकरूंना या सुविधा उपलब्ध करुन दिल्यानंतर शिवलिंगाचे व्यवस्थित दर्शन घेता येईल. यासाठी गुहेच्या आतील लोखंडी सळया हटवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
सुप्रीम कोर्टाच्या पीठाने २०१२ मध्ये दिले निर्देश
- बाबा बर्फानीच्या दर्शनासाठी जाणारे सर्व रस्ते एकेरी वाहतुकीचे असावेत. येण्याचा रस्ताही वेगळा असावा.
- पंचतरणीपासून गुहेपर्यंत जाणारा रस्ता सिमेंटच्या प्री-फॅब्रिकेटेड टाइल्सपासून तयार करण्यात आलेला असावा.
- पहलगाम व बालटालच्या गुहेपर्यंत अर्धा किमी दूर भाविकांसाठी मूलभूत सुविधा असाव्यात.
- रस्त्यांच्या आजूबाजूला लोखंडाची साखळी किंवा खांब रोवून रेलिंग तयार करा.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.