आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Home Ministry Calls For Report After Alleged Attack On Another Delhi Church Attack

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिल्लीतील चर्चमध्ये तोडफोड, तीन महिन्यांत पाचवा प्रकार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - देशाच्या राजधानीतील राजकीय वातावरण सध्या प्रचंड तापलेले आहे आणि विधानसभा निवडणुकीचा प्रचारही अंतिम टप्प्यात आहे. मात्र, दुसरीकडे राजधानीतील चर्चमध्ये तोडफोड करण्याच्या घटनांवर नियंत्रण मिळत नसल्याचे दिसत आहे. अशातच, वसंत कुंज भागातील सेंट अल्फोन्साज चर्चमध्ये सोमवारी काही अज्ञात समाजकंटकांनी तोडफोड केली. दुपारी एक वाजेच्या सुमारास ही घटना घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून चर्चच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची चौकशी सुरू आहे. दरम्यान, पोलिसांनी म्हटले तरी प्रकरण चोरीचे नसून समाजकंटकांनी चर्चमधील अनेक पवित्र वस्तूंची तोडफोड केली आहे. त्यामुळे या प्रकरणाची योग्य दिशेने चौकशी केली जावी, असे अल्फोन्साज चर्चचे फादर व्हिन्सेंट साल्व्हातोर यांनी म्हटले आहे. मागच्या वर्षी नोव्हेंबर महिन्यापासून आतापर्यंत दिल्लीतील विविध भागांतील चर्चमध्ये तोडफोड केल्याची ही पाचवी घटना आहे.

गृहमंत्रालयाने मागवला अहवाल
चर्चमध्ये तोडफोड करण्यात आल्याच्या घटनेचा अहवाल केंद्रीय गृहमंत्रालयाने मागवला आहे. सोबतच राजधानीतील धार्मिक स्थळांवरील सुरक्षेच्या स्थितीबाबतही माहिती देण्यास सांगितले आहे. शिवाय यापूर्वी घडलेल्या अशा प्रकारच्या घटनांमध्ये पोलिसांनी केलेल्या कारवाईचा तपासही गृहमंत्रालयाकडून मागवण्यात आला आहे.