आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Anti Shikh Riots Is Failure Of Government, Minority Commission Chairman Habibullah

शीखविरोधी दंगली हे सरकारचे अपयश, अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष हबिबुल्लाह यांचे स्पष्टीकरण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - 1984 मध्ये सरकार पूर्णत: कोसळलेले होते आणि तेव्हा उसळलेला हिंसाचार हे सरकारचे ‘मोठे अपयश’ होते, असे राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाचे मावळते अध्यक्ष वजाहत हबिबुल्लाह यांनी म्हटले आहे. विशेष म्हणजे देशात शीखविरोधी दंगली उसळल्या, तेव्हा हबिबुल्लाह हे पंतप्रधान कार्यालयातच होते.
मात्र, शीखविरोधी दंगली काँग्रेस सरकारच्या संगनमताने घडवण्यात आल्या, हा आरोप त्यांनी फेटाळून लावला. 2002 मध्ये झालेल्या गुजरात दंगलीच्या वेळी मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांचे राज्यावर संपूर्ण नियंत्रण होते, असे सांगत त्यांनी मोदींना या दंगलींसाठी जबाबदार धरले. 1984 मध्ये पंतप्रधानांची (इंदिरा गांधी) हत्या करण्यात आली होती. केंद्र सरकार पूर्णत: कोसळले होते. सरकार कार्यरतच नव्हते.... ते (दंगली) सरकारचे मोठेच अपयश होते; पण त्याला काहीही कारण नव्हते. आम्ही शिखांची हत्या करावी म्हणून कोणीही कट रचलेला नव्हता, असे हबिबुल्लाह यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले.
इंदिराजींच्या मृत्यूमुळे केंद्र सरकार कमालीचे गोंधळलेले होते. संचालक श्रेणीचा सर्वात ज्येष्ठ अधिकारी म्हणून दोन दिवस पंतप्रधान कार्यालयात मी एकटाच होतो. बाकीचे त्यांच्या अंत्यविधीच्या तयारीत गुंतलेले होते. सरकारमधील काहीजणांना राजधानीत उसळलेल्या दंगलीची क्रूरता ध्यानात आली होती, असे हबिबुल्लाह म्हणाले. शीखविरोधी दंगली काँग्रेस सरकारनेच घडवल्याचा आरोप भाजप आणि काही शीख गट नेहमीच करत आले आहेत, त्याबाबत विचारले असता हबिबुल्लाह म्हणाले, ‘अजिबात नाही.’ काही लोकांनी कायदा हाती घेतला असण्याची शक्यता आहे, पण शिखांचा बदला घ्यायला त्यांना सरकारने अजिबात सांगितलेले नव्हते. आईला नेमके काय झाले, ही राजीव गांधींच्या मनाला भेडसावणारी पहिली चिंता होती. नंतर त्यांनी पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतली. काही दिवसांतच या दंगलींमधील नृशंसता सरकारच्या ध्यानात आली, पण तोपर्यंत दंगली ओसरलेल्या होत्या, असे त्यांनी सांगितले.
1984 आणि 2002 च्या दंगलीत मोठा फरक
1984च्या शीखविरोधी दंगली आणि 2002 च्या गुजरात दंगलींमध्ये मोठा फरक आहे. 84 मध्ये एका ‘सबळ कारणासाठी’ सरकार पूर्णत: कोसळलेले होते. मात्र, 2002 मध्ये गुजरात सरकारच्या कोसळण्याचे कोणतेच पुरावे नाहीत. गुजरात पेटले, तेव्हा मुख्यमंत्री बैठक घेत होते. बैठक कशाची होती, हा वादाचा मुद्दा होऊ शकतो; पण बैठक सुरू होती हे नक्की, असे हबिबुल्लाह म्हणाले.