आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनुज सक्सेना न्यायालयात शरण, वरिष्ठ सनदी अधिकारी बी. के. बन्सल कुटुंबीयांचे आत्महत्या प्रकरण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - टीव्ही कलावंत अनुज सक्सेना याने एका भ्रष्टाचार प्रकरणात गुरुवारी दिल्ली न्यायालयासमोर शरणागती पत्करली. या प्रकरणातील सहआरोपी आणि वरिष्ठ सनदी अधिकारी बी. के. बन्सल, त्यांची पत्नी आणि मुलांनी गेल्या वर्षी आत्महत्या केली होती.विशेष न्यायाधीश गुरदीपसिंग यांच्यासमोर १७ फेब्रुवारीपर्यंत शरणागती पत्करावी, असे आदेश दिल्ली उच्च न्यायालयाने १३ फेब्रुवारीला सक्सेनाला दिले होते. त्यानुसार त्याने शरणागती पत्करली.
 
या प्रकरणात सक्सेनाला लाभ झाल्याचे दिसत असल्याने त्याला जामीन मंजूर करणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले होते. त्यानंतर सक्सेनाच्या वकिलाने अटकपूर्व जामीन अर्ज मागे घेतला होता.  

सक्सेनाने सुमारे २४ हजार गुंतवणूकदारांकडून अवैधरीत्या १७५ कोटी रुपये जमा केले, काही निधी परदेशातील कंपन्यांत वळवला आणि प्राप्तिकर रिटर्न वेळेत दाखल केले नाही, असे आरोप होते. या आरोपांची  एसएफआयओद्वारे तपासणी करण्याचे आदेश न देण्यासाठी बन्सल यांना लाच देण्यात सक्सेनाची थेट भूमिका होती, असा सीबीआयचा आरोप होता. औषध कंपनीकडून लाच घेताना बन्सल यांना १६ जुलै २०१६ रोजी अटक झाली होती. या प्रकरणात जामीन मिळाल्यानंतर बन्सल यांनी २६-२७ सप्टेंबर २०१६ रोजी मुलासह निवासस्थानी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. सीबीआयच्या छळामुळे आपण आत्महत्या करत आहोत, अशी सुसाइड नोट त्यांनी लिहिली होती. 

त्यानंतर तीन दिवसांनी बन्सल यांची पत्नी सत्यभामा (५८) आणि मुलगी नेहा (२८) यांनीही पूर्व दिल्लीतील मधू विहार येथील त्यांच्या अपार्टमेंटमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली होती.
बातम्या आणखी आहेत...