आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'मुजफ्फरनगरचे गोध्रा होऊ देणार नाही\', भाजपच्या आठ आमदारांना अटक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली/लखनौ/बागपत - उत्तरप्रदेशातील मुजफ्फरनगर, बागपत येथे पेटलेल्या दंगलीची तुलना गुजरातमधील गोध्राशी केली जाऊ शकत नाही, असे समाजवादी पक्षाचे प्रमुख मुलायमसिंह यादव यांनी म्हटले आहे. पक्षाचे नेते आणि राज्याचे मंत्री आजम खान हे पक्षावर आणि माझ्यावर नाराज होऊ शकत नसल्याचेही मुलयामसिंह यांनी म्हटले आहे. आग्रा येथे पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक सुरू आहे. यावेळी माध्यमांच्या प्रतिनिधींशी मुलायमसिंह बोलत होते. मुजफ्फरनगर दंगल पीडितांना न्याय मिळेल आणि दोषींवर कडक कारवाई केली जाईल असे आश्वासन त्यांनी दिले.
(पुढील स्लाइडमध्ये वाचा, मुलायमसिंह म्हणाले, आजम खान माझ्यावर नाराज होऊ शकत नाही.)

मुजफ्फरनगर येथे झालेल्या जातिय दंगलीतील जखमींची विचारपूस करण्यासाठी आणि मृतांच्या कुटुंबियाचे सांत्वन करण्यासाठी गेलेले भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते कलराज मिश्र यांच्यासह आठ आमदारांना गाजियाबाद पोलिसांनी अटक केली आहे. आमदार डॉ. महेश शर्मा, रामचंद्र यादव, बब्बनसिंह, रामचरन वर्मा, सुरेश खन्ना, केशव मौर्य, रवि शर्मा या सर्व आमदारांना अटक करण्यात आली आहे.

आमदारांच्या अटकेनंतर त्यांच्या समर्थकांनी राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत समाजवादी पार्टीचे सरकार बर्खास्त करण्याची मागणी केली आहे. अटक केलेल्या आमदारांना गाजियाबाद पोलिस लाईन येथे ठेवण्यात आले आहे. दंगलग्रस्त भागात जाण्यासाठी भाजपचे नेते आणि आमदारांची रांग लागली आहे तर, पोलिस आणि प्रशासनाने त्यांना तिथे जाण्यास अघोषित बंदी घातली आहे. भाजपचे विधिमंडळ पक्षनेते हकिमसिंह आणि आमदार संगीत सोम यांच्यासह भाजप नेत्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याआधी चार दिवसांपूर्वी राष्ट्रीय लोकदलाचे नेते आणि केंद्रीय मंत्री अजित सिंह आणि त्यांचे चिरंजीव जयंत चौधरी यांनाही गाजियाबाद पोलिसांनी ताब्यात घेतले होते. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि खासदार रवि शंकर प्रसाद यांना गाजियाबाद पोलिसांनी उत्तरप्रदेशमध्ये प्रवेश केल्याबरोबर ताब्यात घेतले होते.

उत्तर प्रदेश सरकारमधील ज्येष्ठ मंत्री आणि समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांच्याबद्दल पक्षाने कडक भूमिका घेण्याचा निर्णय घेतला आहे. आग्रा येथे बुधवारी झालेल्या पक्षाच्या महत्त्वपूर्ण बैठकीस आझम खान यांनी दांडी मारली, यावर पक्षाचे ज्येष्ठ नेते रामगोपाल यादव यांनी पक्षशिस्त मोडणा-यावर कडक कारवाई केली जाईल असे सुनावले आहे. आझम खान यांना हा इशारा समजला जातो.

दुसरीकडे, आरएलडीचे प्रमुख अजित सिंह यांनी मुलायमसिहं यांच्यावर निशाणा साधला आहे. मुजफ्फरनगरमधील दंगल उत्तरप्रदेश सरकारने पेटवलेली आहे, त्यांनी ती थांबवली नाही. मुलायमसिंह उत्तरप्रदेशचे मोदी बनत आहेत असा खळबळजनक आरोप त्यांनी केला. सोशल नेटवर्किंग साइट ट्विटरच्या माध्यमातून त्यांनी हा हल्ला केला आहे.

दरम्यान, मुजफ्फरनगर आणि आसपासच्या परिसरातली परिस्थिती नियंत्रणात येत आहे. जिल्हा प्रशासनाने गुरुवारी सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजता पर्यंत संचारबंदी शिथील करण्याचा निर्णय घेतला आहे.

मुजफ्फरनगर येथील हिंसा आटोक्यात आली असली तरी, शेजारील बागपत येथे बुधवारी हिंसा भडकली. बागपतच्या किरठल या गावात बुधवारी दुपारी अचानक परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली. दोन समुह एकमेकांसमोर आले आणि त्यांनी दगडफेक आणि गोळीबार सुरु केला. घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांसमोरही दगडफेक सुरुच होती. यात दोन पोलिस कर्मचारी जखमी झाले. मुजफ्फरनगर दंगलीमध्ये आतापर्यंत 40 जणांचा मृत्यू झाला आहे.