आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘कलमा’वरून कल्ला, मोदींच्या कलम 370 च्या चर्चेवर घणाघाती हल्ले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणा-या 370 कलमासंदर्भात केलेल्या वक्तव्यावरून वादंग निर्माण झाले आहे. 370 कलमाचा आढावा घेण्यास काश्मीरमधील विविध पक्षांनी विरोध दर्शवला आहे. मोदींच्या विधानातून भाजपने आपले पारंपरिक धोरण ‘कलम’ केल्याचा इन्कार त्या पक्षाच्या नेत्यांनी केला आहे.
मोदी यांनी रविवारच्या जम्मूतील सभेत जम्मू-काश्मीरमध्ये महिलांबाबत भेदभाव केला जात असल्याचा उल्लेख केला होता. राज्याबाहेरील व्यक्तीसोबत विवाह केल्यास काश्मिरी महिलेचे नागरी अधिकार संपुष्टात येत असल्याचा दाखला त्यांनी दिला होता.
मोदी यांच्या कलम 370 वर चर्चा करण्याच्या मागणीतून भाजप या मुद्द्यावर मवाळ झाल्याचे म्हणणे चुकीचे आहे, असे भाजप नेते अरुण जेटली आणि सुषमा स्वराज यांनी सांगितले. 370 कलमामुळे जम्मू-काश्मीरला खरेच फायदा झाला का, असा सवाल मोदी यांनी उपस्थित केला होता.
जम्मू-काश्मीरमधील विविध राजकीय पक्षांनी व फुटीरतावादी नेत्यांनी यावर आक्षेप नोंदवला. मोदी यांनी या मुद्द्यावर तर्कसंगत चर्चा होणे आवश्यक असल्याचे मत सोमवारी व्यक्त केले. कलम 370 सोबत जम्मू-काश्मीरमधील अन्य मुद्द्यांवर चर्चा होणे आवश्यक असल्याचे ट्विट त्यांनी केले. या वक्तव्यानंतर सोशल मीडिया, टीव्ही कार्यक्रम आणि लोकांमध्ये कलम 370 वर चर्चा झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला. नॅशनल कॉन्फरन्स, पीडीपी आणि सीपीआयएम या पक्षांनी मोदी यांनी विघटनवादी मुद्दा उपस्थित केल्याबद्दल टीका केली. राज्यघटनेमध्ये 370 कलमाचे स्वरूप ‘कायमस्वरूपी’ प्रकारात मोडते, त्यामुळे या कलमाची दुरुस्ती होऊ शकत नाही, असा पवित्रा संबंधित पक्षांनी घेतला आहे.
काँग्रेसचा पलटवार
370 कलमाबाबत सत्ताधारी पक्षाचे धोरण स्पष्ट आहे. त्यामुळे मोदी यांनी संघ परिवाराशी या मुद्द्यावर चर्चा करावी, असे सांगत कॉँग्रेसने मोदींचा प्रस्ताव धुडकावला. मोदी सतत वक्तव्य बदलत असतात, त्यामुळे त्यांचे म्हणणे गांभीर्याने घेण्याची गरज नाही. मोदी यांना इतिहास माहीत नाही. अनेक विषयात त्यांनी खोटी मते नोंदवली आहेत. कलम 370 कायमस्वरूपी आहे. घटनेलाही ते रद्द करण्याचा अधिकार नाही. भाजपच्या पंतप्रधानपदाच्या उमेदवाराला घटनेची माहिती अपुरी आहे, असे काँग्रेसने म्हटले आहे.
नितीश कलमाच्या बाजूने
नरेंद्र मोदी यांनी कलम 370 चा मुद्दा उकरून काढल्याबद्दल बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी हा दृष्टिकोन विघटनवादी असल्याचे म्हटले आहे. जम्मू-काश्मीरला विशेष परिस्थितीमध्ये 370 कलमानुसार विशेष राज्याचा दर्जा देण्यात आला आहे. घटनेतील 370 कलमाला माझा पाठिंबा आहे. कलमाची दुरुस्ती अथवा त्यावर चर्चा करण्याची आवश्यकता नाही, असे नितीश यांनी जनता दरबारानंतर सांगितले. काही शक्ती भावनात्मक मुद्द्यांना हात घालत वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करत असल्याचे ते म्हणाले.
मोदींना राज्यघटनेचे ज्ञान नाही : पीडीपी
जम्मू । नरेंद्र मोदी यांना राज्यघटनेचे ज्ञान अपुरे आहे. त्यांच्या वक्तव्यामुळे जम्मू-काश्मीरमधील लोकांमध्ये दरी निर्माण होईल, अशी भीती पीडीपीने व्यक्त केली आहे. पीडीपीचे नेते मुफ्ती मोहंमद सईद यांनी जम्मू-काश्मीरसाठी 370 कलमाला घटनेत कायमस्वरूपी स्थान आहे. त्याची दुरुस्ती करण्याचा संसदेलाही अधिकार नाही, असे सईद म्हणाले.
मोदींची मानसिकता हुकुमशहाची : दिग्विजय सिंह
कॉँग्रेसचे सरचिटणीस दिग्विजयसिंह यांनी महिला हेरगिरी प्रकरणात गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर पुन्हा टीका केली आहे. या प्रकरणी गुजरात सरकारचा तपास म्हणजे आरोपीनेच न्यायनिवाडा करण्याचा प्रकार आहे. यातून हुुकूमशहाची प्रवृत्ती दिसून येते. गुजरातमध्ये महिलेवर हेरगिरीचे प्रकरण समोर आल्यापासून दिग्विजयसिंह मोदींवर टीकास्त्र सोडत आहेत. स्वत: चौकशी हाती घेणारे आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल आणि मोदी सारखेच आहेत, असे दिग्विजयसिंह म्हणाले.