नवी दिल्ली - गुडघेदुखीच्या समस्येने हैराण असणार्या भारतीय लोकांना आता अमेरिका व युरोपमधील रुग्णांची प्रकृती लक्षात घेऊन तयार करण्यात आलेल्या कृत्रिम गुडघ्यावर अवलंबून राहावे लागणार नाही. कारण भारतीय रुग्णांना होणार त्रास व त्यांच्या पायाची रचना लक्षात घेऊन विशिष्ट प्रकारचे कृत्रिम गुडघे विकसित करण्यात आले आहेत. हे कृत्रिम गुडघे ‘एशियन नी’ या नावाने भारतात उपलब्ध झाले आहेत.
मुंबईचे ऑर्थोपेडिक सर्जन डॉ. नीलेन शहा यांनी सांगितले की, ‘भारतीय रुग्ण, विशेषत: ऑर्थरायटिसने गस्त असलेल्या महिलांचे जोड पश्चिमी देशातील लोकांच्या तुलनेत छोटे असतात. याशिवाय भारतात उठण्या - बसण्याची जीवशैली व कामे जास्त प्रमाणात करावी लागत असल्याने गुडघे अधिक वेळा दुमडावे लागतात. तसेच बसण्याच्या शैलीमुळे ऑर्थरायटिससारखी गुडघ्याची समस्या रुग्णांमध्ये मोठय़ा प्रमाणात निर्माण होते. इतकेच नव्हे तर बसण्याच्या शैलीमुळे गुडघ्याची रचनाही बदलली गेली आहे. या स्थितीत भारतीय रुग्णांची पायाची रचना लक्षात घेऊन तयार केलेले हे गुडघे त्यांचा त्रास कमी करतील. तसेच ऑर्थोपेडिकना रुग्णांवर उपचारात त्याची मदत होईल.’