नवी दिल्ली - पश्चिम बंगालच्या एका कलाकाराने बिकनीमधील गोपिकांसोबत श्रीकृष्ण उभा असल्याचे चित्र काढले असून त्याच्यावर सोशल मीडियामधून जोरदार टीका होत आहे. कोलकाता आणि गुवाहाटी येथील काही प्रकाशकांनी हे चित्र प्रकाशित केले आहे. त्यानंतर सोशल मीडियावर लोकांनी त्याला विरोध सुरु केला आहे. कलाकाराविरुद्ध आसामच्या सिलचर येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चित्रकाराचे नाव अकरम हुसैन असून त्याने गुवाहाटीच्या रवींद्र भवन येथील स्टेट आर्ट गॅलरीमध्ये रविवारी चित्र प्रदर्शन आयोजित केले होते. प्रदर्शनात ठेवलेले कृष्ण-गोपिकांचे चित्र प्रेक्षकांना रुचले नाही. त्यांनी त्यावर तिखट प्रतिक्रिया दिल्या. त्यानंतर ते चित्र प्रदर्शनातून काढून टाकण्यात आले. मात्र सोशल मीडियावर त्यावर चर्चा सुरु झाली आणि लोक
आपला संताप व्यक्त करु लागले.
काय म्हणाले सोशल मीडिया युजर्स
सोशल मीडियावर एका युजरने लिहिले आहे, की कला आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली कोणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा तुम्हाला अधिकार नाही. तर, काही युजर्सनी माध्यमांवरच राग व्यक्त केला. त्यांचे म्हणणे होते, की 'पेड न्यूज'चा बाजार मांडलेल्या माध्यमांकडे अशा बातम्या दाखवण्यासाठी वेळ नाही.