आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Arun Jeitley Said Naredra Modi Was On Target From 2002

नरेंद्र मोदींनी नेहमीच सहन केलीय विरोधकांची असहिष्णुता : अरुण जेटली

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - धार्मिक असहिष्णुतेच्या वातावरणात अडकलेल्या केंद्र सरकारचे अर्थमंत्री अरुण जेटली यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पाठराखण केली आहे. मोदी स्वत: वैचारिक असहिष्णुतेचे सर्वाधिक वेळा शिकार बनले आहेत, असे त्यांनी फेसबुकवरील एका पोस्टमधून लिहिले आहे.
भारतीय जनता पक्ष सत्तेत आहे, ही गोष्ट देशातील अनेक लोकांना वैचारिकरीत्या पचनी पडलेली नाही. ही एकप्रकारे पंतप्रधान आणि भारतीय जनता पक्षाविरोधातील वैचारिक असहिष्णुता आहे. देशाला असहिष्णू राष्ट्राच्या रूपात जगासमोर आणण्यासाठी हा सुनियोजित दुष्प्रचार सुरू असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. यामागे काँग्रेस आणि डाव्या पक्षातील विचारवंतासोबतच त्यांचे कार्यकर्तेही सामील आहेत. या लोकांनी उलटसुलट िवधान करत वातावरण अधिकच बिघडवले असून विकासात अडथळा निर्माण केला आहे, असा आरोपही जेटली यांनी केला आहे.

जेटली पुढे म्हणाले, पंतप्रधानांविरोधात हा दुष्प्रचार २००२ पासूनच सुरू आहे. मोदींविरोधात वातावरण निर्माण करण्याची ही दुतर्फा रणनीती आहे. पहिले म्हणजे, संसदेतील कामकाजात अडथळा निर्माण करून ज्याचे श्रेय मोदी सरकारला मिळू शकते, असे विधेयक अडवून धरणे आणि दुसरे म्हणजे सुनियोजितपणे दुष्प्रचार करणे. त्यामुळे लोकांना वाटेल की भारतातील वातावरण िबघडत आहे. राजकीय पटलावर आपण जिंकू शकणार नाही म्हणून दुष्प्रचार करण्याचा विरोधकांचा डाव असल्याचेही ते म्हणाले.
भाजप खासदाराचा सरकारला घरचा आहेर
जम्मू | भाजपचे खासदार उदित राज यांनी असहिष्णुतेवरून आपल्याच सरकारविरोधात आवाज उठवला आहे. मोदी सरकारच्या कार्यकाळात असहिष्णुता आणि असंवदेनशीलता वाढली असून ही देशासाठी घातक आहे. त्यामुळे सरकारने यावर प्रतिबंध घालावा, असे त्यांनी म्हटले आहे.
दादरी : दोषींना शिक्षा देऊ
दादरी हत्याकांड ही एक आकस्मिक घटना असली तरी दुर्दैवी व निंदनीय आहे. यातील गुन्हेगारांना नक्कीच शिक्षा मिळेल, असे जेटली यांनी म्हटले आहे. भारताने नेहमीच असहिष्णुता फेटाळून लावली आहे. त्यांनी पक्षातील काही वाचाळवीर नेत्यांना इशारेवजा सल्ला दिला आहे. विरोधकांना संधी मिळेल, असे कोणतेही विधान किंवा काम करू नका, असे त्यांनी सांगितले.