आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Arvind Kejriwal Cheerful With Delhi Election Exits Polls Invite For Oath Ceremony

निकालाआधीच केजरीवालांचे शपथविधीसाठी निमंत्रण, अनेक नातेवाईकांना बोलावले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी शनिवारी मतदान झाले. त्यानंतर प्रसिद्ध झालेल्या एक्झिट पोलमध्ये आम आदमी पार्टी (आप) बहुमताने विजयी होत असल्याचे अंदाज वर्तविल्याने पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांचा विश्वास वाढला आहे. त्यामुळेच की काय त्यांनी 10 तारखेला होणार्‍या मतमोजणीची वाट न पाहाता, मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीसाठी नातेवाईकांना निमंत्रण देण्यास सुरुवात केली आहे.

एका वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, केजरीवालांच्या एका नातेवाइकाने त्यांना शपथविधी सोहळ्याचे निमंत्रण मिळाल्याचे मान्य केले आहे. रविवारी केजरीवाल यांचे नातेवाईक त्यांच्या भेटीसाठी आले होते.
दरम्यान, दुपारी तीन वाजता 'आप'च्या वरिष्ठ नेत्यांची बैठक बोलावण्यात आली आहे. मतदानाच्या दिवशी पक्षाची रणनीती काय असेल हे ठरविण्यासाठीची ही बैठक असल्याची चर्चा आहे. 'आप' नेते मनीष सिसोदिया यांनी आज (रविवार) सकाळीच त्यांची भेट घेतली.
'आप'ला इव्हीएमच्या सुरक्षेची काळजी
मतमोजणीला अजून दोन दिवस बाकी आहेत. अशात 'आप'ला इव्हीएम मशीनच्या सुरक्षेची काळजी लागून राहिली आहे. 'आप' नेते आशुतोष यांनी पक्षाचे कार्यकर्ते 24 तास इव्हीएम मशीनवर नजर ठेवून असतील, असे ट्विट केले आहे. ज्या स्ट्राँगरूममध्ये इव्हीएम मशीन ठेवण्यात आल्या आहेत तिथे 24 तास लक्ष्य ठेवावे, अशा सुचना 'आप'च्या कार्यकर्त्यांना करण्यात आलेल्या आहेत. आशुतोष यांनी इव्हीएम मशीन सुरक्षीत आहेत का? असा सवाल देखील केला आहे.
सीतारमण यांनी घेतली बेदींची भेट
दिल्लीतील भाजपच्या मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार किरण बेदी यांनी पक्षाच्या जय-पराजयाची जबाबदारी आपली राहील याची आधीच घोषणा केली आहे. आज सकाळी केंद्रीय मंत्री निर्मला सीतारमण यांनी त्यांची भेट घेतली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना सीतारमण म्हणाल्या, 'एक्झिट पोल, ओपिनियन पोल यांचे आपापल्या ठिकाणी वेगळे महत्त्व असते. आम्ही निकालाची वाट पाहात आहोत. आम्हाला विश्वास आहे, की निकाल आमच्या बाजूनचे लागेल.' व्हिजन डॉक्यूमेंट उशिरा प्रसिद्ध केल्याने पक्षाची हानी झाली का? या प्रश्नावर त्या म्हणाल्या, 'हा पक्षाचा निर्णय आहे. लोकसभा निवडणुकीवेळी देखील आम्ही शेवटी घोषणापत्र जाहीर केले होते. त्याने काहीही फरक पडत नाही. पक्षांतर्गत अनेक फॅक्टर असतात त्याच्या आधारावर व्हिजन डॉक्यूमेंट किंवा घोषणापत्र जाहीर करण्याचा निर्णय घेतला जातो.'
दरम्यान, अशीही बातमी आहे की दिल्ली निवडणुकीतील भाजप उमेदवारांची पक्षातील वरिष्ठ नेते भेट घेणार आहेत. दिल्ली प्रदेशाध्यक्ष सतीश उपाध्याय आणि पक्षाचे प्रभारी प्रभात झा पुढील रणनीती निश्चित करणार आहेत. पक्षांतर्गत केलेल्या सर्वेक्षणाचीही समीक्षा केली जाणार आहे. दुसरीकडे, भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी ट्विट केले आहे, की एक्झिट पोलचे अंदाज खरे ठरले तर, पक्षाला आपल्या धोरणांवर नव्याने विचार करावा लागेल.