नवी दिल्ली - गुजरात दौर्यावर असलेले आम आदमी पार्टीचे संयोजक अरविंद
केजरीवाल यांचा ताफा रोखल्यामुळे संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी दिल्ली आणि लखनऊमध्ये भाजप कार्यालयासमोर निदर्शने केली. भाजप मुख्यालयाची तोडफोड आणि पोलिसांच्या कामात अडथळा आणल्याच्या आरोपाखाली आपच्या नेत्या शाजिया इल्मी, आशुतोष आणि प्रोफेसर आनंद कुमार यांच्यासह 14 कार्यकर्त्यांवर दिल्लीच्या संसद मार्ग पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुत्रांच्या माहितीनुसार प्रोफेसर आनंदकुमार यांना रात्रभर पोलिस स्टेशनमध्येच बसवून ठेवण्यात आले होते. शाजिया इल्मी आणि आशुतोष यांच्यावर गुन्हा दाखल झाला असल्याने त्यांच्या अटकेची शक्यता आहे. दुसरीकडे, आप नेत्यांविरोधात एफआयआर दाखल झाल्यानंतर प्रशांत भुषण म्हणाले, पक्ष या प्रकरणी निवडणुक आयोगाकडे तक्रार करणार आहे. पोलिसांची कारवाई एकतर्फी आणि पूर्वग्रह दुषित आहे. त्यांनी फक्त आपच्या कार्यकर्त्यांवरच गुन्हे दाखल केले आहेत. त्यांच्यावर दगडफेक करणार्यांना आणि आपच्या कार्यकर्त्यांचे हात-पाय मोडणार्यांविरोधात पोलिसांनी कारवाई केलेली नाही. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होताच देशातील राजकीय पारा वाढला आहे.आम आदमी पार्टीचे नेते
अरविंद केजरीवाल हे गुजरात दौर्यावर असून बुधवारी त्यांनी रोड शो केला. त्या वेळी त्यांना ताब्यात घेण्यात आले. अध्र्या तासानंतर सोडण्यातही आले. परंतु केजरीवाल यांना ताब्यात घेतल्याचे कळताच संतप्त आप कार्यकर्त्यांनी दिल्ली आणि लखनऊमध्ये भाजप कार्यालयासमोर निदर्शने केली. या वेळी दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी तुफान दगडफेक केली. जोरदार धुमश्चक्री उडाली. सायंकाळी कच्छनजीक केजरीवाल यांच्या ताफ्यावरही हल्ला झाला.
मनीष सिसोदिया, संजयसिंह आणि इतर नेत्यांसोबत केजरीवाल यांचा बुधवारपासून चार दिवसांचा गुजरात दौरा सुरू झाला. केजरीवाल म्हणाले, या दौर्यात नरेंद्र मोदींच्या गुजरात विकासाच्या दाव्यांमधील सत्य शोधण्यात येणार आहे. मोदी त्यामुळेच घाबरले असून त्यांनी पोलिसांची मदत घेतली आहे. मोदींच्या सांगण्यावरूनच चार-सहा जागी काळे झेंडे दाखवण्यात आले. मात्र आम्ही त्यांना भीक घालणार नाही.