आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिल्‍ली सरकारची \'टीम केजरीवाल\' ठरली; मनिष सिसोदिया, राखी बिर्लांना मंत्रिपद

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली- दिल्‍लीत कॉंग्रेसने विनाअट पाठींबा दिल्‍यानंतर आम आदमी पार्टीने सरकार स्‍थापन करण्‍याचा निर्णय घेतला आहे. यावरुन भारतीय जनता पक्षाने 'आप'वर कडाडून हल्‍ला चढविला आहे. 'आप' म्‍हणजे कॉंग्रेसची 'बी' टीम असल्‍याची टीका भाजपने केली आहे. त्‍यावर केजरीवाल यांनीही प्रत्‍युत्तर दिले असून त्‍यांनी एक व्हिडिओ सोशल माध्‍यमातून प्रसारित केला आहे. 'आप'चे सरकार कॉंग्रेसच्‍या पाठींब्‍यावरुन नव्‍हे तर अल्‍पमतातील सरकार राहणार आहे, असे केजरीवाल यांनी स्‍पष्‍ट केले.

दरम्‍यान, अरविंद केजरीवाल यांच्‍या मंत्रिमंडळातील नावे निश्चित झाली असून मनिष सिसोदिया, सोनाथ भारती, सौरभ भारद्वाज, सत्‍येंद्र जैन, राखी बिर्ला, गिरिश सोढी यांचा त्‍यात समावेश होणार आहे. हे सर्व कॅबिनेट दर्जाचे मंत्री राहणार आहेत.

सरकार स्‍थापन करण्‍यावरुन भाजपचे नेते सुधांशू मित्तल यांनी केजरीवाल यांच्‍यावर टीका करताना म्‍हटले होते, की स्‍वतःच्‍या मुलाची घेतलेली शपथ केजरीवाल विसरले आहेत का? कॉंग्रेस किंवा भाजपच्‍या पाठींब्‍यावर सरकार स्‍थापन करणार नाही, असे स्‍वतः केजरीवाल यांनी मुलाची शपथ घेऊन सांगितले होते. भाजपचे नेते रामेश्‍वर चौरासिया यांनी केजरीवाल यांना राजकीय धोकेबाज म्‍हटले आहे.

या टीकेवर केजरीवाल यांनी पाच भाषांमध्‍ये फेसबुकवर एक व्हिडिओ प्रसारित करुन उत्तर दिले आहे. (या बातमीत तुम्‍ही हिंदी भाषेतील व्हिडिओ पाहू शकता.) त्‍यांनी त्‍यात स्‍पष्‍ट केले, की कोणात्‍याही पक्षासोबत आघाडी करुन आम्‍ही सरकार स्‍थापन करत नाही. आमचे सरकार अल्‍पमतातील सरकार आहे. 'आप'च्‍या सरकारचा कॉंग्रेससोबत काहीही सबंध नाही. भ्रष्‍टाचाराच्‍या प्रकरणात कॉंग्रेसच्‍या नेत्‍यांचीही चौकशी होणार आहे. आम्‍ही भाजप किंवा कॉंग्रेसबाबत विचार करत नाही. आम्‍ही फक्त 'आम आदमी'चा विचार करतो. जनतेच्‍या समस्‍या सोडविणे, हेच आमचे ध्‍येय आहे.