आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Arvind Kejriwal Meet President, Request To Deny Chance To Bjp For Forming Government In Delhi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिल्लीत सत्तास्थापनेसाठी भाजपला संधी देऊ नका, केजरीवाल यांचे राष्ट्रपतींना साकडे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फोटो - अरविंद केजरीवाल यांनी शनिवारी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची भेट घेतली. त्यांच्यासमवेत पक्षाचे नेते मनीष सिसोदियादेखील होते.


नवी दिल्ली - आमआदमी पार्टीच्या (आप) सत्ता त्यागानंतर रिक्त असलेल्या दिल्ली विधानसभेचे तख्त काबीज करण्यासाठी भारतीय जनता पक्ष आमदारांची फोडाफोडी करून आकड्यांचा खेळ जुळवू पाहत असल्याचा आरोप दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केला आहे. नायब राज्यपालांनी कोणत्याही परिस्थितीत भाजपला सत्तास्थापनेसाठी आमंत्रित करू नये, अशी विनंती राष्ट्रपतींना करण्यासाठी पक्षाच्या शिष्टमंडळाने शनिवारी सायंकाळी राष्ट्रपती मुखर्जी यांची भेट घेतली.

दिल्लीत भाजपला सत्ता स्थापन करावयाची असेल, तर आमदारांची खरेदी करावी लागेल. वेळप्रसंगी पैशाच्या बळावर वीस-वीस कोटी देऊन आमदार फोडले जातील, असे केजरीवाल म्हणाले. उपराज्यपालांनी दिल्लीत सत्तास्थापनेसाठी भाजपला आमंत्रित केले जाऊ शकते, असे वक्तव्य केले आहे. कोणत्या आधारे भाजप बहुमत सिद्ध करू पाहत आहे, असा प्रश्न केजरीवाल यांनी उपस्थित केला. उपराज्यपाल नजीब जंग यांच्यावर काँग्रेस आणि आम आदमी पार्टी सध्या प्रचंड नाराज आहे. बहुमत नसताना भाजपला आमंत्रित करणे म्हणजे खरेदीला प्रोत्साहन आहे. म्हणून राष्ट्रपतींनी हस्तक्षेप करायला हवा.

त्यांचे बोलणे रेकॉर्ड करा
केजरीवाल यांनी म्हटले आहे की, पाठिंब्यासाठी कोणी संपर्क साधलाच तर त्याला टाळू नका. त्यांचे बोलणे रेकॉर्ड करून ठेवा. कुणी राजीनामा द्यावयास सांगितले तरी सरळ मान्य केल्यासारखे दाखवा, अशा सूचना आपण आम आदमी पार्टीच्या आमदारांना केल्या असल्याचेही केजरीवाल यांनी म्हटले आहे.

नव्याने निवडणूक घ्या
दिल्ली विधानसभेत केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील आम आदमी पार्टीचे २८ आमदार आहेत. भाजप-आघाडीचे ३२, काँग्रेसचे तर इतर आमदार आहेत. साध्या बहुमतासाठी ३५चे संख्याबळ आवश्यक आहे. काँग्रेसच्या पाठिंब्यावर आपने स्थापन केलेले सरकार केजरीवालांच्या राजीनाम्यानंतर पडले. या स्थितीत आता नव्याने निवडणूक घेतली जावी, अशी आपची मागणी आहे.