आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘आप’चे चलो वाराणसी अभियान!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - दिल्ली आणि हरियाणातील मतदान आटोपल्यानंतर आम आदमी पार्टीच्या नेत्यांनी त्यांचा मोर्चा उत्तर प्रदेशकडे वळवला आहे. वाराणसी आणि अमेठी या जागा आम आदमी पार्टीने प्रतिष्ठेच्या केलेल्या आहेत. वाराणसी येथे अरविंद केजरीवाल हे उद्या मंगळवारपासून प्रचाराला सुरुवात करणार आहेत.

वाराणसीमध्ये मोदींना आव्हान देण्यासाठी अरविंद केजरीवाल उद्यापासून प्रचार सुुरू करणार आहेत. अमेठीतील प्रचाराचे दिवस वगळता तिथे तळ ठोकून बसणार आहेत. वाराणसी येथे नरेंद्र मोदींना आव्हान देणे विशेष कठीण नसल्याचे सांगत आम आदमी पार्टी या ठिकाणी पूर्ण शक्ती लावत आहे. यासाठी मनीष सिसोदिया, गोपाल रॉय, आशुतोष, संजय सिंग, शाजिया इल्मी, राखी बिडलान यांच्यासह दिल्ली विधानसभेत निवडून आलेले सदस्य वाराणसी येथे जात आहेत. हे सर्व कार्यकर्ते वाराणसीच्या चौकाचौकांत सभा घेणार आहेत.

भाजपचे मुरली मनोहर जोशी यांच्याकडून 2009 मध्ये केवळ 17 हजार मतांनी पराभूत झालेले मुख्तार अन्सारी हे या वेळी निवडणूक लढवणार नाहीत. त्यामुळे त्याचा थेट फायदा अरविंद केजरीवाल यांना मिळू शकतो. आम आदमी पार्टीने अन्सारी यांचा पाठिंबा मागितला नसून त्यांच्या संपर्कात नसल्याचाही खुलासा केला आहे. तरीसुद्धा नरेंद्र मोदी यांना पराभूत करण्यासाठी केजरीवाल अन्सारीचा वापर करण्याची शक्यता आहे. आम आदमीचे काही नेते अन्सारी यांचे समर्थन घ्यावे या मताचे असले तरी अद्याप यावर निर्णय झालेला नाही.

राहुल गांधींना आव्हान देणे अवघड
अमेठी येथे राहुल गांधी यांना आव्हान देणारे आपचे कुमार विश्वास यांच्या प्रचारासाठी आपची फौज तोकडी पडत आहे. राहुल गांधी यांना आव्हान देणे अवघड असल्याचेही या पक्षातील नेत्यांच्या लक्षात आले आहे. कुमार विश्वास हे या मतदारसंघात एकटे पडले आहेत. त्यांना मदत म्हणून अरविंद केजरीवाल अमेठीला जाणार असून या मतदारसंघातील प्रत्येक विधानसभा क्षेत्रात ते रॅली करणार आहेत.

भाजपमध्ये अस्वस्थता
केजरीवाल यांच्या वाराणसी येथील उमेदवारीमुळे भाजप अस्वस्थ आहे. पंतप्रधानपदाचे उमेदवारच जर पराभूत झालेत तर नरेंद्र मोदींचा आलेख खाली येईल याची भीतीही भाजपला आहे. त्यामुळे केजरीवाल वाराणसी येथे पहिल्यांदा जाऊन आले तेव्हा त्यांच्यावर अंडे आणि शाई फेकण्याचे प्रकार करण्यात आले. केजरीवाल यांच्यावर भाजप हल्ले चढवू शकतो अशी भीती आम आदमी पार्टीला असल्याने ते प्रचारात हा मुद्दा प्राथमिकतेने घेऊन भाजप व कॉँग्रेसला धारेवर धरत आहेत.