आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Arvind Kejriwal To Be Sworn In As Cheif Minister Of Delhi Today

आजपासून दिल्‍लीत लाचखोरी बंद- मुख्‍यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा नारा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली- दिल्‍लीत आजपासून (शनिवार) 'आम आदमी'चे राज्‍य सुरु होणार आहे. आम आदमी पार्टीचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी मुख्‍यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्‍यांच्‍यानंतर मनीष सिसोदिया यांनी शपथ घेतली. केजरीवाल आणि त्‍यांचे सर्व सहकारी रामलीला मैदानावर दाखल झाले आहेत. सकाळी सुमारे 11.40 वाजता ते रामलीला मैदानात पोहोचले. सर्वजण सर्वसामान्‍य जनतेप्रमाणे मेट्रोनेच दाखल झाले.

केजरीवाल यांच्‍या मंत्रिमंडळाचे खातेवाटप निश्चित झाले आहे. केजरीवाल यांच्‍याकडे उर्जाखाते राहणार आहे. याशिवाय गृह आणि अर्थ ही महत्त्वाची खातीही केजरीवाल यांच्‍याकडे राहणार आहेत. मनीष सिसोदिया यांच्‍याकडे सार्वजनिक बांधकाम आणि शिक्षण खाते सोपविण्‍यात आले आहे. राखी बिर्ला यांच्‍याकडे महिला आणि समाजकल्‍याण खाते आहे. सत्‍येंद्र जैन यांना आरोग्‍य विभाग देण्‍यात आला आहे. गिरीश सोनी यांच्‍याकडे पर्यावरण तसेच अनुसूचित जाती-जमाती खाते आहे. परिवहन खाते सौरभ भारद्वाज यांना देण्‍यात आले आहे.

शपथविधीनंतर केजरीवाल यांनी दिल्‍लीकरांना कधीही लाच न देण्‍याची आणि न घेण्‍याची शपथ दिली. कोणीही लाच देणार नाही आणि लाच घेणार नाही. कोणत्‍याही अधिका-याने लाच मागितल्‍यास त्‍याला लगेच नाही म्‍हणू नका. त्‍याच्‍यासोबत बोलून घ्‍या आणि ही संपूर्ण माहिती एका फोन क्रमांकावर कॉल करुन द्या. हा क्रमांक लवकरच जाहीर करण्‍यात येणार आहे. अशा भ्रष्‍ट अधिका-यांना रंगेहाथ पकडू, असे केजरीवाल यांनी सांगितले.

केजरीवाल म्‍हणाले, ही तर सुरुवात आहे. खरा संघर्ष आता सुरु झाला आहे. हा संघर्ष फक्त माझा किंवा माझ्या मंत्र्यांचा नाही. सर्व जनतेचा हा लढा आहे. आम्‍ही एकट्याने हा लढा जिंकू शकत नाही. आमच्‍याकडे सर्व समस्‍यांवर तोडगा आहेच, असे नाही. पण, सर्वांनी सहकार्य दिल्‍यास प्रत्‍येक समस्‍येवर तोडगा निघू शकतो. आजचा दिवस ऐतिहासिक आहे. अण्‍णांनी सांगितले होते की राजकारण चिखल आहे. परंतु, आम्‍ही आता राजकारण स्‍वच्‍छ करणार आहोत. सर्वजण मिळून दिल्‍लीचे सरकार चालवू. आपण भ्रष्‍टाचार आणि जातीयवादाला आव्‍हान दिले होते. हे लोक शांत बसणार नाहीत. आपल्‍या मार्गात अनेक अडचणी निर्माण करतील. परंतु, त्‍यांचा एकत्रपणे सामना करु. दिल्‍लीत काही अधिकारी भ्रष्‍ट आहेत. परंतु, अनेक अधिकारी स्‍वच्‍छ असून त्‍यांना देशाची सेवा करायची आहे. आम्‍ही जनतेची सेवा करण्‍यासाठी याठिकाणी आलो आहोत. विश्‍वासमताची आम्‍हाला चिंता नाही. जोडतोड करुन आम्‍हाला सत्ता का‍बिज करायची नाही. आम्‍ही स्‍वच्‍छ मनाने काम करण्‍याची इच्‍छा ठेवतो. इतर पक्षांमध्‍ये आम्‍हाला विश्‍वासमत मिळू नये, यासाठी कारस्‍थाने सुरु आहेत, असे केजरीवाल म्‍हणाले.

ज्‍येष्‍ठ समाजसेवक अण्‍णा हजारे यांनी अरविंद केजरीवाल यांना पत्र पाठवून शुभेच्‍छा दिल्‍या आहेत. प्रकृती अस्‍वस्‍थ असल्‍यामुळे ते केजरीवाल यांच्‍या शपथविधीला गेले नाही.

शपथविधी सोहळा आम जनतेसाठी खुला होता. त्‍यामुळे सकाळपासून दिल्‍लीतील नागरिक रामलीला मैदानावर पोहोचू लागले. हळूहळू मैदानावर गर्दी झाली.

शपथविधीनंतर केजरीवाल यांनी महात्मा गांधी यांचे समाधीस्थळ "राजघाट"ला जाऊन त्यांचे आशिर्वाद घेतले. त्‍यानंतर त्‍यांनी कॅबिनेटची बैठक घेतली.