आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Arvind Kejriwal Vinod Kumar Binny Rebel Hunger Strike

दिल्लीत ‘आप’लेच बिनसले; विनोदकुमार बिन्नींचे जंतर-मंतरवर तीन तास धरणे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - आम आदमी पार्टीचे बडतर्फ आमदार विनोदकुमार बिन्नी यांनी सोमवारी अरविंद केजरीवाल सरकारविरुद्ध पुकारलेले धरणे आंदोलन केवळ तीन तासांतच गुंडाळले. केजरीवाल सरकारने 10 दिवसांमध्ये जनलोकपाल कायद्यासह अन्य आश्वासने पूर्ण न केल्यास पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा बिन्नी यांनी दिला आहे.

बिन्नी यांना रविवारी रात्री आपमधून काढून टाकण्यात आले होते. यानंतर त्यांनी सोमवारी सकाळी नायब राज्यपाल नजीब जंग यांची भेट घेऊन चर्चा केली. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या समाधीचे दर्शन घेतले. दुपारी 12.00 वाजता त्यांनी धरणे आंदोलनास सुरुवात केली आणि 3.00 वाजता त्यातून माघार घेतली. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आणि नजीब जंग यांच्या सल्ल्यानुसार धरणे सोडल्याचे त्यांनी जाहीर केले.

बिन्नी यांनी महिला सुरक्षा दल स्थापन करणे, वीज बिलात 50 टक्क्यांची कपात आणि प्रत्येक कुटुंबाला 700 लिटर पाणी देण्याची मागणी केली आहे. केजरीवाल सरकारने 10 दिवसांमध्ये आश्वासने पूर्ण न केल्यास 6 फेब्रुवारीपासून देशात आपविरोधात आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. आप सरकारला मुद्द्यांवर आधारीत पाठिंबा देत असून सरकारचे समर्थन मागे घेतले नसल्याचे बिन्नी यांनी स्पष्ट केले.

पाठिंबा काढण्याची घाई नाही : काँग्रेस
आप सरकारच्या पाठिंब्यावर फेरविचार करण्याची घाई नाही, असे सांगत कॉँग्रेसने सरकारच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केलेल्या भाषणावर कायदामंत्री सोमनाथ भारती यांनी टीका केल्याबद्दल कॉँग्रेसने नाराजी व्यक्त केली आहे. आम्ही सद्य:स्थितीत संयम बाळगून आहोत, अशी प्रतिक्रिया कॉँग्रेसचे प्रवक्ते मुकुल वासनिक यांनी दिली.

काढण्याआधी लोकांना का विचारले नाही?
बिन्नी म्हणाले, माझ्यासोबत 3-4 आमदार आहेत. त्यांना गप्प करण्यासाठी माझ्यावर कारवाई केली. मला पक्षातून काढण्याआधी लोकांचे म्हणणे ऐकून घ्यावयाचे होते. केजरीवाल मुख्यमंत्री झाल्यानंतर हुकूमशहा झाले आहेत. सर्व निर्णय स्वत: घेत आहेत. त्यांनी माझ्याऐवजी कायदामंत्री सोमनाथ भारतींवर कारवाई करायला हवी होती. त्यांनी मध्यरात्री आफ्रिकी महिलांशी गैरवर्तन केले आहे.

भारती यांना हटवण्यासाठी भाजप आमदारांचे धरणे
कायदामंत्री सोमनाथ भारती यांना हटवण्याच्या मागणीसाठी भाजप आमदारांनी सचिवालयाबाहेर धरणे धरले. खिडकी एक्सटेंशनमध्ये रात्री धाड टाकल्याबद्दल भारती वादात अडकले आहेत. भाजप आमदारांनी यावरून त्यांच्याविरुद्ध घोषणाबाजी केली. भाजप नेते हर्षवर्धन म्हणाले, भारती यांना हटवल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. यानंतर केजरीवाल यांनी मनीष सिसोदिया यांच्यासह भाजप आमदारांशी चर्चा केली. हर्षवर्धन यांनी केजरीवाल यांना निवेदन सादर केले. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

डीटीसी कर्मचारी आणि कंत्राटी शिक्षकांचे धरणे
केजरीवाल सरकारविरुद्ध डीटीसीमध्ये रोजंदारीवर काम करणारे कर्मचारी व कंत्राटी शिक्षकांनी धरणे धरले. त्यांनी सरकारकडे नोकरीत कायम करण्याची मागणी केली.